संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Wednesday, October 13, 2010

निकिताची चॉकलेट स्टोरी (माझा छंद, माझा व्यवसाय)

''असावा सुंदर चॉकलेटचा बंगला'' असं स्वप्न लहानपणी सगळेच बघतात. पण त्यातली एखादीच निकिता असते, जी वयाच्या पंधराव्या वर्षापासून ह्या स्वप्नातल्या चॉकलेट्सना मूर्त स्वरूप देऊ लागते, छंद म्हणून चॉकलेट्स बनवता बनवता केवळ सतरा वर्षे वय असताना चॉकलेट्सचे आणि फक्त चॉकलेट्सचे दुकानही सुरू करते! ज्या वयात इतर मुले-मुली कॉलेजला बुट्ट्या मारून स्वच्छंद जगणे, पार्ट्या, मित्रमैत्रिणी यांच्यात मश्गुल असतात त्या वयात अवघ्या एकोणिसाव्या वर्षी निकिता आपल्या तिसऱ्या ''चॉकलेट स्टोरी''च्या दुकानाचे मोठ्या दिमाखात अनावरण करते!!

निकिता मल्होत्रा. वय वर्षे एकोणीस. चुळबुळी, उत्साही, तडफदार आणि कल्पक! मित्र- मैत्रिणींने घेरलेली, आपल्या बिनधास्त स्वभावामुळे लोकप्रिय, सतत काही ना काही करत राहणारी, कधी सेवाभावी कार्यात भाग घेऊन आपला आनंद चिमण्या जीवांबरोबर वाटणारी. घरात असताना आपल्या लाडक्या चॉकलेट्सवर प्रयोग करून बघणे, नव्या रेसिपीज करून पाहणे हा छंद जोपासणारी!

मी तिला तिच्या व्यवसायाविषयी प्रश्न विचारणार म्हटल्यावर तिने अगदी टिपीकल टीन-एजरप्रमाणे ह्या अगोदर प्रसिद्ध झालेल्या तिच्या वेगवेगळ्या मुलाखतींच्या लिंक्सच मला इ-मेलने धाडून दिल्या. त्यातून मला बरीच माहिती मिळाली. तरीही माझं समाधान होत नव्हतं. मग तिला पुन्हा काही प्रश्न विचारले ज्यांची तिने तिच्या शैलीत मस्त बिनधास्त, सडेतोड उत्तरे दिली. ह्याच प्रश्नोत्तरांचा सारांश तुमच्यासमोर सादर करत आहे.

निकिताला तिचे चॉकलेट्सचे स्वप्न प्रत्यक्षात आणायला प्रेरणा दिली ती तिच्या केटरिंग व्यवसायात असलेल्या वडिलांनी! तिला सुरुवातीपासून नवनव्या प्रकारची चॉकलेट्स बनवून, त्यांचे वेधक आकर्षक पॅकिंग करून आपल्या मित्रपरिवाराला, स्नेह्यांना ते भेटीदाखल द्यायची अतिशय आवड होती. वडिलांनी ही आवड हेरली आणि तिला केवळ चॉकलेट्स विकणारे एक दुकानच सुरु करण्याचे सुचवले. कल्पना खूपच आगळी होती. तेव्हा निकिताचे वय होते फक्त सतरा! वडिलांनी सुरुवातीचे भांडवल उभे केले. परिवारातील बाकीचे सदस्य भक्कमपणे तिच्या पाठीशी उभे राहिले. भावाने सहजच ''चॉकलेट स्टोरी'' हे नाव सुचवले आणि साकार झाले निकिताचे स्वप्न! त्याबरोबर तिची मेहनत, प्रयत्न आणि जिद्द तर होतीच! वडिलांनी तिला सांगितले, ''फक्त विचारच करत बसण्यापेक्षा निर्णय घे आणि स्वतःच्या चुकांमधून शीक. ''

कल्याणीनगर, पुणे येथे २००८ साली पहिल्या दुकानाची सुरुवात तर केली. पण चॉकलेट्सच्या दुकानाची ही कल्पनाच इतकी अभिनव, शिवाय फक्त चॉकलेट्ससाठी एवढा खर्च करायचा की नाही, ह्याविषयीही लोक साशंक असायचे! पण हळूहळू निकिताच्या चॉकलेट्सचा दर्जा आणि चव ह्यांनी खवय्यांच्या व चॉकलेट-रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण केले. तिच्या चॉकलेट्सच्या कल्पक वेष्टणांमुळेही त्यांची मागणी वाढू लागली. गिऱ्हाईकांच्या फर्माइशीनुसार विविध प्रकारची, डिझाइनची व सुंदर वेष्टनांतील चॉकलेट्स ही निकिताची व तिच्या दुकानांची खासियत ठरली. सुरुवातीला हाताखाली काम करणाऱ्या लोकांना हाताळतानाही तिला प्रश्न आलेच! कल्पना करा, सतरा वर्षांच्या मुलीला चॉकलेट्सची गुणवत्ता, चव, पॅकेजिंगपासून एका व्यवसायाशी संबंधित असलेले सर्व प्रकारचे निर्णय आपले आपण घ्यायचे होते! इथे तिचा आत्मविश्वास आणि कुटुंबाचा भरभक्कम आधार खूपच कामी आला.

दोन वर्षांमध्ये निकिताने तीन स्टोअर्स उघडली. सुरुवातीला तिच्या हाताखाली तीन लोक कामाला होते, आज त्यांची संख्या सतरा आहे. हे लोक तिच्या स्टोअरमध्येही मदत करतात व तिच्या चॉकलेटच्या कारखान्यातही काम करतात. कारखाना? हो, हो, तुम्ही बरोबरच वाचत आहात! आज निकिताचा स्वतःचा चॉकलेट्सचा कारखानाही आहे, जिथे ती वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स व डेझर्टस बनवत असते!

तिच्या कारखान्यात बारा प्रकारची ट्रफल्स बनवली जातात. त्यांच्या फ्लेवर्सविषयी निकिता सांगते, ''डच, कॉफी, हेझल नट, ब्राऊनी, स्ट्रॉबेरी, नट बकेटस, बिटर बाँब्ज याशिवाय आम्ही ऑर्डरप्रमाणे शुगर-फ्री म्हणजेच शर्करामुक्त ट्रफल्सही बनवतो. डार्क चॉकलेट्स व व्हाईट चॉकलेट्सच्या व्यतिरिक्त आमची खासियत म्हणजे चॉकलेट बुकेज व चॉकलेटचे कारंजे आहे. खिशाला परवडणारी किंमत आणि डिझाईनर पॅकेजिंग ह्यामुळे तरुणाईत ही चॉकलेट्स अल्पावधीत प्रिय झाली आहेत. त्यांना फ्रीजमध्ये फक्त उन्हाळ्यात ठेवावे लागते. आणि किमान सहा महिने ती टिकतात.''

निकिताच्या चॉकलेट्सचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे अप्रतिम सुंदर सादरीकरण! बेबी अनाऊन्समेंटस, डोहाळजेवणांसाठी ती चॉकलेट्सना छोट्या छोट्या बाबागाड्यांमध्ये आणि इवल्या इवल्या बुटांमध्ये पॅक करते; लग्न आणि साखरपुड्यांसाठी चॉकलेट्सची आकर्षक चमचमत्या तबकांमध्ये मांडणी करते; लहान मुलांच्या वाढदिवस पार्ट्यांना तिची चॉकलेट्स रंगवण्याच्या खडूंच्या रूपात येतात तर आय. पी. एल. चाहत्यांसाठी झूझू जोडप्याच्या रूपात तिची चॉकलेट्स अवतरतात. दिवाळी, राखी इत्यादी सणांसाठीही ती खास चॉकलेट्स बनवते व त्यांना त्या त्या प्रकारचे पॅकिंग करते. त्याची तबके तुम्ही आगाऊ नोंदणी करून किंवा दुकानाला समक्ष भेट देऊन खरेदी करू शकता.

काही खास ग्राहकही असतात, ज्यांच्यासाठी हौसेला मोल नसते आणि त्यांना त्यांच्या पसंतीच्या आकारात, स्वरूपात चॉकलेट्स हवी असतात. एका मुलीने तिच्या मित्राला त्याच्या वाढदिवसाला एकवीस वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स ऑर्डर देऊन खास बनवून घेतली. आयुष्याच्या प्रत्येक वर्षासाठी वेगवेगळ्या आकारात चॉकलेट्स बनवली होती. पहिल्या वर्षासाठी दुधाच्या बाटलीच्या आकाराचे चॉकलेट, दुसऱ्या वर्षासाठी चमच्याच्या आकारातील चॉकलेट, तिसऱ्या वर्षासाठी बुटांचा जोड, चौथ्यासाठी टेडी बेअर, पाचव्या वर्षासाठी रंगीत खडू असे करत करत एकविसाव्या वर्षासाठी शँपेनच्या बाटलीच्या आकारातील चॉकलेट असा तो संच त्या मुलीने आपल्या खास दोस्तासाठी निकिताकडून बनवून घेतला होता.

तिची चॉकलेट स्टोरीची वेगळी वेबसाइट तर आहेच, शिवाय फेसबुक आणि ट्विटरवरही चॉकलेट स्टोरीचे वेगळे अकाउंट आहे. एकदा जोडलेल्या ग्राहकांच्या संपर्कात राहण्यासाठी ती एस. एम. एस., ईमेल इत्यादी तंत्रज्ञान वापरते व वैयक्तिक संपर्कावरही अवश्य भर देते.

निकिताला व्यवसायात येणाऱ्या अडचणींविषयी विचारल्यावर ती चक्क खळाळून हसते! '' व्यवसाय म्हटल्यावर अडचणी ह्या असणारच! त्याशिवाय तो व्यवसाय वाटणारच नाही! मलाही येतात ना अडचणी... बऱ्याचदा हाताखाली काम करणाऱ्या लोकांशी संबंधित किंवा इतर छोट्या मोठ्या अडचणी असतात... पण त्यातूनच मार्ग काढण्यात थ्रिल आहे असं मला वाटतं! ''

मला उत्सुकता होती ती वेगळीच! एका व्यवसायात एवढ्या खोलवर गुंतल्यावर निकिताला तिचं कॉलेज लाईफ अजून वेगळ्या प्रकारे जगता आलं असतं, इतर मुलामुलींसारख्या जबाबदारीतून मुक्त जीवनशैलीला आपलंसं करता आलं असतं असं वाटत नाही का?

निकिता मात्र स्पष्टपणे सांगते की जे तिने स्वीकारलंय ते स्वतःच्या आवडीतून स्वीकारलंय! त्यामुळे कधी, कशाला व किती अग्रक्रम द्यायचा हे तिला तीन वर्षांच्या अनुभवानंतर पुरते कळून चुकले आहे. आजही तिचा दिवस ती सकाळी कॉलेजला जाऊन सुरू करते. दुपारी तिच्या वेगवेगळ्या कल्पनांना आकार देणे, नवनवीन डिझाइन्स बनविणे ह्यात जातो आणि सायंकाळी ग्राहकांच्या भेटी-गाठी, सोशल व्हिजिटस, इतर कार्यक्रमांसाठी राखीव असतात. मात्र सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण या वेळांना निकिता आपल्या कुटुंबासाठी राखीव ठेवते. जर ऑर्डर्स, मागणी व कामाचा व्याप जास्त असेल तर त्याप्रमाणे तिचेही वेळापत्रक बदलते. पण तरीही आपल्या स्वतःच्या मर्जीनुसार, तिला हवे असेल तेव्हा ती कॉलेज-लाईफचा आनंद लुटते आणि कॉफीचा आस्वाद कधी मित्रमंडळींबरोबर घेता आला नाही तरी क्लाएंटसबरोबर नक्कीच घेते! शिवाय टीन-एजर म्हटल्यावर तिलाही घरातून बंधने ही आहेतच!

चॉकलेट स्टोरीचा तिचा अनुभव बघताना मला कुतूहल होतं ते तिच्या व्यावसायिक प्रशिक्षणाविषयी! इथेही ती आश्चर्याचा धक्का देते.तिने चॉकलेट्स बनवण्याच्या शिक्षणाव्यतिरिक्त कोणतेही खास व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेले नाही. प्रारंभी घरातून सुरू केलेल्या ह्या व्यवसायात तिने स्वतःच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या जोरावर पदार्पण केले आणि त्यानंतरही सगळ्या पायऱ्या शिकताना तिला व्यवहारच कामी आला. ''हा माझा बिझनेस आहे, '' ह्या भावनेतून बघितल्यावर त्याविषयी सगळे काही जाणून घेणे, त्यातील खाचाखोचा समजावून घेणे हे ओघाने येतेच असे निकिताला वाटते. पुस्तकी ज्ञानाला व्यवहाराच्या मुशीतून तावून सुलाखून काढल्यावरच त्याचा तुमच्या व्यवसायासाठी वापर करता येतो, मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत प्रत्यक्ष व्यवहारात तसाच्या तसा वापरून चालत नाही ह्याचा पुरेपूर अनुभव निकिताने आपल्या व्यवसायात घेतला आहे.

मी तिला विचारले, एवढे कमी वय असण्याचा तुला व्यवसायात काही तोटा जाणवला का? तर तिचे उत्तर होते, ''सुरुवातीला तरी असेच वाटले होते की मला फार कोणी सीरियसली घेणार नाही! पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे घडले अगदी उलट! आता तर माझ्या नव्या कल्पना व डिझाइन्स यांचीही काही मंडळी चक्क नक्कल देखील करतात!''

ह्या सर्व अनुभवातून तिला एक व्यक्ती म्हणून आणि एक व्यावसायिक म्हणून खूप काही शिकायला मिळाल्याचेही निकिता आनंदाने सांगते. चॉकलेट्सच्या व्यवसायाबद्दल तर तिच्या ज्ञानात भर पडली आहेच; शिवाय रोज वेगवेगळ्या ग्राहकांना हाताळल्यामुळे अनुभव मिळत आहे. ग्राहकांशी सौहार्दपूर्ण व्यवहार राखत निकिताने स्वतःला वेगवेगळ्या माध्यमांतून एक यशस्वी स्त्री व्यावसायिक म्हणून सिद्ध केले आहे.

पुढच्या काळातील तिच्या स्वप्नांविषयीही निकिता भरभरून बोलते. सध्या ती बी. कॉम च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. अजून आयुष्यात तिला बरंच काही करायचं आहे! आतापर्यंत तिने रेडियो जॉकिंग, सूत्रसंचालन, अभिनय केलाय... स्वतःचे कपडे डिझाइन केलेत, साल्सा नृत्य शिकले आहे. भविष्यात तिला फॅशन डिझाईनर बनायचंय, लेखन करायचंय, बॅकपॅकिंग करायचंय, मेक-अप आर्टिस्ट बनायचंय आणि जमला तर स्वतःचा फूड-शो देखील करायचा आहे! तिचा मेसेज देखील असाच सुटसुटीत छान आहे : आयुष्य खूप छोटं आहे, जे काही करायचं ते आताच करायला हवं!

इतक्या लहान वयात कमालीचं यश मिळवूनही जमिनीवर आपली पावले घट्ट रोवून भविष्याला कवेत घेण्याची स्वप्ने उरी बाळगणारी ही निकिता मला भावली तशीच तुम्हालाही भावली का ते अवश्य कळवा!

कल्याणीनगर, औंध व कोरेगाव पार्क येथील तिच्या शॉप्सच्या पत्त्यासाठी व ईमेल, फोन संपर्क ह्यांसाठी तिची वेबसाइट अवश्य पाहा : www.chocolatestory.co.in


--- अरुंधती

nikita and his chocolatestory's photos