कोजागिरी पौर्णिमा
आश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी रात्री इंद्राची पूजा करतात. पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वी वर उतरते व 'को जागर्ति?' 'कोण जागं आहे?' असा प्रश्न विचारते जो जागा असेल त्याला जी धनधान्य देते. यावरून कोजागिरी पौर्णिमा असे नांव पडले.
आश्विन महिन्यात पावसाळा संपतो. त्यामुळे आकाश निरभ्र असते व स्वच्छ चांदण असते अशा चांदण्यारात्री इष्टमित्रांसह मौजमजा करण्याच्या दृष्टीने हा उत्सव साजरा करतात. राजस्थान मध्ये स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र धारण करून चांदीचे अलंकार घालण्याची प्रथा आहे.
ज्ञानोबा माऊली सृष्टीतील प्रत्येक उत्तमात उत्तम गोष्टीचा दृष्टान्तासाठी मोठ्या गुणग्राहक रसिकतेने उपयोग करुन घेतात. अमृत, परीस, सोने, कल्पवृक्ष, कामधेनू, गंगा, समुद्र, सूर्य, चंद्र या त्यांपैकी काही.
पौर्णिमा ही ज्ञानोबांना आवडणारी अशीच एक गोष्ट. चौदाव्या अध्यायात अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण देहात सत्त्वगुणाची वृद्धी झाल्यावर काय होते ते सांगतात. ती सत्वगुणवृद्धी केवळ बुद्धी आणि इंद्रियांमध्येच दिसून येते असे नाही तर ज्ञानाच्या प्रांतातही तिचा संचार झालेला दिसतो, असे सांगतात. हे सांगताना,
अगां पुनवेचां दिवशीं।
चंद्रप्रभा धांवे आकाशीं।
ज्ञानी वृति तैसी।
फाके सैंघ।।
पौर्णिमेच्या रात्री ज्याप्रमाणे चंद्रप्रकाश आकाशात सर्वत्र पसरतो तशीच ज्ञानातदेखील सत्त्ववृत्ती सर्वत्र पसरते, असा दृष्टान्त देतात. सतराव्या अध्यायात भगवंतांचे बोलणे, उपदेश अर्जुन अगदी तल्लीन होऊन ऐकत होता. त्या वेळी त्याची ती कृष्णाशी झालेली तद्रूपता कशी होती? ज्ञानदेव वर्णन करतात,
हरपला चंद्रु जैसा।
चांदिणेनि।।
पुढे अठराव्या अध्यायात सर्व प्राणिमात्रांशी समत्वदृष्टीने वागणार्या भक्ताचे अज्ञान नाश पावल्यावर तो माझ्या स्वरूपी येतो आणि मग माझ्याशी एकरुप झाल्यावर त्याचे उरलेसुरले अज्ञानही नाहीसे होते ते कशाप्रमाणे ? हे अर्जुनाला नीट कळावे म्हणून भगवान पुन्हा पौर्णिमेच्या पूर्णचंद्राचा दृष्टान्त देतात.
हें ना आपुलें पूर्णत्व भेटे।
जेथ चंद्रासी वाढी खुंटे।
तेथ शुक्लपक्षु आटे।
नि:शेष जैसा।।
पौर्णिमेच्या चंद्राला आपले पूर्णत्व मिळते. साहजिकच त्यामुळे चंद्राचे वाढणेही थांबते. परिणामी शुक्लपक्ष संपूर्णपणे नाहीसा होतो. हा मनोज्ञ आशय नेमक्या शब्दांत येथे व्यक्त केला आहे. याच अठराव्या अध्यायात आर्त-जिज्ञासू-अर्थार्थी या तिन्ही भक्तींतील अज्ञान परमेश्वराला दृश्य करते, भेद दर्शविते. पराभक्ती ही चौथी भक्ती मात्र या तिन्ही भक्तींपेक्षा वेगळी आहे. ही पराभक्ती म्हणजेच ज्ञानभक्ती. ही ज्ञानभक्ती अभेदभावाने अज्ञान नाहीसे करते. साहजिकच या ज्ञानभक्तीमुळे देवाला निश्चित स्वरूपात जाणता येते. येथे ज्ञानदेव पुन्हा एकदा पौर्णिमेच्या चंद्राचा दृष्टांत देतात. ते सांगतात,
हां गा पूर्णिमेअधीं कायी।
चंद्रु सावयवुचि नाहीं।
परी तिये दिवशीं भेटे पाहीं।
पूर्णता तया।।
पौर्णिमेच्या आधी चंद्र अस्तित्वात नसतो काय? त्याला काय अवयव नसतात? तेव्हाही त्याला कला असतात, तो कलेकलेने वाढत असतो. हे जर खरे तर मग पौर्णिमेला नक्की काय होते? तर त्याला पूर्णता येते. तो पूर्ण होतो.
ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत पौर्णिमेचे, चंद्राचे, चांदण्याचे जे कौतुक केले आहे, ते सारे आनंदाने आठवत कोजागिरी मनोमनी साजरी करू या.
- ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर