प्रांतोप्रांतीची दिवाळी
अविनाश बिनीवाले , शनिवार , ६ नोव्हेंबर २०१०
दिवाळी हा सण भारतातल्या सगळ्याच प्रांतांमध्ये साजरा केला जातो. घरासमोर दररोज सकाळ-संध्याकाळ नव्यानं काढली जाणारी रांगोळी हे दिवाळीचे अखिल भारतीय वैशिष्टय़ आहे. या सणासाठी बनविल्या जाणाऱ्या गोडधोड आणि तिखट पदार्थात मात्र वेगळेपण आढळते. दीपावली हा भारतीय उपखंडातला अत्यंत महत्त्वाचा, अतिशय आनंदाचा सण. तो जवळजवळ सर्वच ठिकाणी अतिशय उत्साहानं साजरा केला जातो, यात काही संशय नाही. हा सण प्राचीन काळापासून इतका महत्त्वाचा आहे, लोकांच्या अक्षरश: रक्तात भिनलेला आहे, की नंतरच्या काळात भारतात आलेल्या काही इतर विचारधारेच्या लोकांनाही ‘दीपावलि’ साजरी करण्याचा मोह दूर ठेवता आला नाही.. येत नाही.
अशी ही दिवाळी अखिल भारतीय आहे! भल्या पहाटे उठून घरासमोर रांगोळी काढण्याची परंपरा देशातल्या सर्वच प्रांतांत आहे. फरक असतो तो तिच्या आकारात, रंगात किंवा रांगोळी म्हणून वापरायच्या पदार्थात! काश्मीर व हिमाचल प्रदेशात खूप मोठमोठय़ा रांगोळ्या काढल्या जातात. पंजाब-राजस्थानातही त्या तशा मोठय़ा असतात. परंतु महाराष्ट्र नि उत्तर कर्नाटकातली रांगोळीची परंपरा किंचित वेगळी आहे. ठिपके काढून ते जोडणारी लहान, पण रेखीव नि कलात्मक रांगोळी या प्रांतांमध्ये काढली जाते. आंध्र प्रदेशात किंवा आणखी दक्षिणेत तांदळाच्या पिठाचा उपयोग रांगोळी काढण्यासाठी होतो. साधं पीठ घेऊन किंवा तांदळाच्या पिठाच्या खडूसारख्या कांडय़ा करून त्यानं रांगोळी काढली जाते. घरासमोर रोज- किंबहुना दररोज सकाळ-संध्याकाळ नव्यानं काढली जाणारी रांगोळी हे अखिल भारतीय वैशिष्टय़ आहे.
फराळाचे पदार्थही खरं तर अखिल भारतीय स्वरूपाचेच आहेत. त्यात असते ती किरकोळ प्रादेशिकता आणि किंचित फेरबदल. उदाहरणार्थ- आपल्याकडे कडा मुडपण्यावरून ‘करंजी’ आणि ‘कान्होला’ असा किंचित फरक आहे. पण उत्तर भारतात असा भेद नाही. कशीही असली तरी तिला ‘गुजिया’च म्हणतात नि त्यातलं सारणही आपल्याकडच्यासारखंच असतं. अनारसा हा पदार्थही खूप ठिकाणी होतो. उदाहरणार्थ बिहारमध्येही अनारसा असतो, पण त्याचा आकार खूप वेगळा असतो. गोलसर लाडवासारखा नि त्यात मुख्य घटक खवा असतो. तो खसखशीत घोळलेला असतो नि त्याची पारीही आपल्या अनारशासारखीच असते. आपल्याकडे खूपशी साखर किंवा गूळ घालून शंकरपाळे केले जातात. तर काश्मीरमध्ये पिठात फारसा गूळ घालत नाहीत, पण नंतर ते पाकात घोळवून कौशल्यानं कोरडे करतात. या पाकातल्या शंकरपाळ्यांना तिकडे ‘तोशे’ म्हणतात. साधे नि गोड चिरोटे, रवा, रवा-बेसन (म्हणजे राघवदास), फक्त बेसन, बुंदी, मोतिचूर असे लाडवांचे अनेक प्रकार नि आकारही! आकार केवळ छोटे-मोठे एवढंच नाही तर गोल, किंचित चौकोनीकडे झुकणारे.. असे बरेच प्रकार. अनेक ठिकाणी बेसनाच्या लाडवात सढळ हातानं साजूक तुपाचा वापर केलेला असतो. परिणामत: तसा खूप तुपाचा, खरपूस भाजलेला (मस्त) लाडू थाळीत ठेवल्यावर मात्र जरा ढेपाळतो. पण काहीही बिघडत नाही. मस्त लागतो! अधूनमधून तोंडात टाकायला, किंवा विशेषत: चहाबरोबर तोशे छान वाटतात. गुजिया म्हणजे करंज्यासुद्धा लहान-मोठय़ाच नाही, तर विविध प्रकारचं सारण भरलेल्या असतात. महाराष्ट्रात ओल्या नारळाच्या करंज्यांचं खूपच कौतुक असतं. पण उत्तरेत ओला नारळच जरा अवघड असल्यामुळे तिकडे सामान्यत: करंज्या कोरडय़ा खोबऱ्याच्याच असतात. आसाममध्ये मात्र ओल्या नारळाचा उपयोग ज्यात त्यात केलेला दिसतो. आसाममध्ये खोबऱ्याचा चिवडा करतात. ओलं खोबरं किसणीवर लांब लांब किसायचं. (खवायचं नाही.) मग ते ओलं खोबरं पिठीसाखरेत घोळायचं आणि हळूहळू कोरडं करायचं. कोरडं झाल्यावर त्यात वेलदोडय़ाची पूड पेरायची- की खोबऱ्याचा गोड चिवडा तयार! (आता हा प्रकार करताना त्यात आपण काजू, बेदाणे वगैरे घालायला हरकत नाही. मुळातच खोबरं किसून झाल्यावर त्यावर केशराचं पाणी शिंपडलं तर त्याला सुंदर केशरी रंग येतो नि केशराचा वासही छान येतो. या दिवाळीत करून पाहा. टिकाऊपणासाठी केशराचं पाणीच वापरा, दुधात मिसळलेलं केशर नको.)
या विविध गोड, गोडसर पदार्थाच्या जोडीनं अनेक प्रकारच्या चकल्या, शेवेचे अनेक प्रकार, गाठियाचे अनेक आकार नि चवी, कडबोळी, चिवडे, खमण (खमणाचा एक गोड प्रकारही असतो- मिठू खमण. महाराष्ट्रात तो फारसा कुठे दिसत नाही, पण गुजरातमध्ये सर्वत्र असतो.), मध्य प्रदेशात तिखट नि तिखटजाळ शेवेचे अनेक प्रकार आढळतात. या तिखट- नमकीन पदार्थाचेही किती किती प्रकार आहेत! त्यांची मोजदाद करणंही एक मोठं काम आहे!
अखिल भारतीय परिप्रेक्ष्यात दिवाळीचा विचार केला की, आपल्या पूर्वजांचं खरोखर; कौतुक वाटतं. आपले सगळ्यांचे पूर्वज नक्कीच एक असले पाहिजेत. त्याशिवाय इतक्या गोष्टी समान झाल्याच नसत्या!
दिवाळीच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे उठून अभ्यंगस्नान करून मस्त फराळ केल्यावर (लगेच किंवा दोन-तीन तासांनी) दही-पोहे खायची पद्धतही सर्वत्र आहे. (याला केवळ योगायोग म्हणता येईल का?) दही-पोहे सर्वत्र असले तरी त्यात चवीला आणखी काय घालायचं, यात फरक दिसतो. महाराष्ट्रात दही-पोह्याला जिऱ्याची तुपातली फोडणी घातली जाते नि चवीला किंचित साखर घालतात. (यात हिरवी मिरचीही छान लागते.) काहीजण दही-पोह्यात साखर अजिबातच घालत नाहीत. पण उत्तरेत दही-पोह्यात भरपूर साखर घातली जाते. गंगा-यमुनेच्या संगमापुढच्या प्रदेशात- म्हणजे उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात, बिहार, झारखंड, पूर्व नि पश्चिम बंगाल, आसाम वगैरे सर्व ठिकाणी दही-पोह्यात गोडीसाठी गूळ घातला जातो. उत्तर प्रदेश, बिहार भागात दही-पोह्यात उसाचा गूळ घालतात. बंगाल-आसाम भागात सर्वसामान्य लोक ताडगूळ घालतात, तर श्रीमंत मंडळी खजुरीचा गूळ घालतात.
दिवाळीच्या चार दिवसांत नवनवे कपडे घालून दिवसभर मस्त मस्त पदार्थ खाणं (त्याला ‘चरणं’ म्हणणं अधिक योग्य ठरेल.) हाच महत्त्वाचा कार्यक्रम असतो. दक्षिणेत या काळात (खरं तर प्रत्येक सणालाच) देवळात जाणं फार महत्त्वाचं- किंबहुना सर्वात महत्त्वाचं असतं. उत्तर भारतात, विशेषत: गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागांत दिवाळीत पैसे लावून पत्ते खेळण्याची परंपरा आहे. उत्तर प्रदेशात नि बिहारमध्येही जुगार खेळण्याची पद्धत दिसते. महाराष्ट्रात मात्र सुदैवानं ती नाही. पण अलीकडे काही लोक असलं काहीतरी करायला लागले आहेत असं दिसतं. उत्तर भारतात बहुतेक ठिकाणी लक्ष्मीपूजनानंतरच्या प्रतिपदेला नवं वर्ष (विक्रम संवत्) सुरू होतं.
बंगालमध्ये मात्र दिवाळीचा थाट जरा कमी असतो. तिकडे दिवाळीच्या अगोदरच्या पंधरवडय़ात प्रतिपदा ते विजयादशमी हा दहा दिवसांचा काळ ‘पूजा’ म्हणून साजरा होतो. आपल्याकडे दिवाळी अंक निघतात तसे तिकडे पूजा विशेषांक निघतात. आपण दिवाळीत जे करतो ते सगळं बंगालमध्ये पूजाकाळात केलं जातं. ओरिसातही पूजा उत्सव खूप महत्त्वाचा असतो, पण दिवाळीही असतेच. बिहार, झारखंड वगैरे भागांत दिवाळीचा कालखंड आणखी थोडा पुढे सरकतो नि तिथे षष्ठीला साजरा होणारा ‘छटपूजा’ हा दिवस खूपच महत्त्वाचा असतो. (खरं तर हा दिवाळीचाच एक भाग आहे. यानिमित्तानं काही गैरप्रकार होत असतील तर त्याला जरूर विरोध करावा, पण छटपूजेलाच विरोध करणं मात्र समजू शकत नाही! मराठी माणसानं प्रथम समजून घेतलं पाहिजे की, छटपूजा हा दिवाळीचाच एक भाग आहे!)
केरळ नि तामिळनाडू हे प्रदेश मात्र या दिवाळीपासून जरा वंचित राहिलेले दिसतात. त्याला कदाचित भौगोलिक कारण असावं. आपल्याकडे पावसाळा संपून स्वच्छ आकाशाचा, सुखद थंडीचा ऋतू सुरू झालेला असतो नि नेमक्या याच वेळी केरळ-तामिळनाडूत ईशान्य मोसमी वाऱ्यांचा पावसाळा सुरू होत असतो. मग ऐन पावसात दिवे कसे लावणार? दीपोत्सव कसा साजरा करणार? तिकडे दिवाळीचं काही महत्त्व नाही, असं काहीजण म्हणतात. तर यानिमित्तानं ‘आमची संस्कृती वेगळी आहे,’ असं काही फुटीरवादी म्हणतात. पण हे खरं नाही. हा फरक भौगोलिक आहे. तेही आपलेच आहेत. त्यांची दिवाळी तिकडच्या ऋतूंनुसार होते.
दिवाळी हा फक्त हिंदूंचा सण आहे, हेही तितकंसं खरं नाही. भारतातल्या ख्रिश्चनांचा नाताळ किंवा मुसलमानांची ईद पाहा. काय वेगळं असतं त्यात? दिवाळीच असते ती! आपल्याकडे आपण नाही का कधी कधी टिळक पंचांगाची दिवाळी वेगळी साजरी करतो? जुन्या पंचांगाची दिवाळीही साजरी करतो! तशीच डिसेंबरात येते ती येशूची दिवाळी असते नि ईदला येते ती मुसलमानांची दिवाळी! तेच फराळाचे पदार्थ (अधिक वाटल्यास केक किंवा चिकन/ मटण वगैरे), घरावर तोच आकाशकंदील आणि तीच रोषणाई, घरासमोर कागदावरची तयार रांगोळी.. तेलाचे दिवे नसले तरी विजेचे दिवे असतातच. म्हणजे भारतात खरं तर दरवर्षी तीन- तीन दिवाळ्या साजऱ्या होत असतात!