संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Wednesday, November 3, 2010

चला करू या प्रकाशपर्वाचे स्वागत


शुभांगी कात्रेला

दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार... असं म्हणत आपण लहानाचे मोठे होतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. दिवाळी हा सण मोठा विलक्षण, भुरळ घालणारा. दर वर्षी तितकाच नवा वाटणारा आणि व्यापून परत मागे उरणारा हा सण स्नेहाचा, मायेचा, ज्योतीने ज्योत तेवण्याचा, प्रकाशवाटेने पुढे जाण्याचा...

माणसाच्या हातांना शुभंकरतेचा उत्तरस्पर्श मुळातच लाभलेला असतो. या शुभंकराततून साकरलेली समृद्धी निसर्गात दाटून आलेली असतानाच, दीपावलीची पावले घरावाड्यांशी, शेतीभाताशी थबकतात. भरलेले माप ओलांडून दीपावली येते आणि आसमंत उजळून टाकते.


दिवाळी सांगते, उठा, जागे व्हा, ताजेतवाने व्हा. दाटलेल्या उजेडाची पूजा बांधा. या पूजेने मनाचा कणा ताठ होऊन जाईल. दृष्टीच्या कक्षा विशाल होतील. भलीमोठी हिंमत उराशी बांधली जाईल आणि आपल्या सोबत अष्टौप्रहर वावरणारी अंधकाराची भीती दूर होईल. प्रकाश म्हणजे आयुष्यात उभारीने ठाम राहण्याची हिंमत देणार प्रसाद. प्रकाशाच्या पूजेने तो मनाच्या ओंजळीत येतो.


असे म्हणतात, की आफ्रिकेच्या जंगलात दूर कोठेतरी पक्ष्यांची एक जमात आहे, पहाटपक्ष्यांची. हा पक्षी रात्र जागवितो. पहाट फटफटू लागली की झाडाच्या उंच शेंड्यांशी जातो. तृषार्त असतो. प्रकाशकिरणांची प्रतीक्षा करीत असतो. पहिला किरण चोचीत झेलतो, न चुकता. अगदी एखादा क्षणभरच. तेवढ्यानने त्यांची तृष्णा शांत होते. मग तो त्याच झाडाच्या अंधारलेल्या ढोलीच गाढ झोपी जातो. त्याचा सारा दिवस तेथेच जातो. सायंकाळ होते. अंधार भरभरून येतो.अंधाराशी रात्रभर झगडण्याचे बळ त्याला पहिल्या प्रकाशकिरणाच्या प्राशनाने मिळते. केवळ एका क्षणाच्या अवकाशात त्याने आनंदाचा पूर्ण चंद्र ओंजळीत झेलून घेतलेला असतो!


रात्री भरून आलेला अंधार आपल्याला जाणवतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे, की तो केवळ रात्रीपुरताच असतो. आजच्या धकाधकीत, मानसिक ताणतणावात अंधार दाटून येण्याचे प्रसंग केव्हाही येतात. अशा वेळी आपल्याला या आफ्रिकन पहाटपक्ष्याच्या वाटेवरून जाता यायला हवे. त्यासाठीच आपण प्रकाशपर्वाचे मन:पूर्वक स्वागत केले पाहिजे आणि निर्मळ मनाने त्याची पूजा बांधली पाहिजे.

राम, कृष्ण, बुद्ध, महावीर या सगळ्यांच्या आयुष्यातल्या संस्मरणीय घटनांशी दिवाळीचा अतूट ऋणानुबंध जोडलेला आहे. आपण सूर्याच्या जवळ जाऊ शकत नाही. तसेच या माणसांच्या कर्तृत्वाच्या जवळपासही आपण जाऊ शकत नाही, पण स्वत:ची कुवत आपण निश्‍चित ओळखू शकतो. जशी मातीच्या इवल्या पणतीने ओळखली होती आणि अस्ताला जाणाऱ्या सूर्याला अभिवचन दिलं होतं, "अंधारात मी पळेन आणि माझ्या शक्तीनुसार प्रकाशाचे हात देऊन अंधाराला परतून लावेन'. तसेच अभिवचन आपले आपणच स्वत:ला देऊ शकतो, "मी भ्रष्ट परिस्थितीशी, अंधारलेल्या भवितव्याशी, भयाण दहशतवादाशी लढेन. माझ्या शक्तीनुसार सकारात्मक विचारांच्या प्रकाशाचे हात पसरेन आणि हा अंध:कार नाहीसा करेन...' एवढा संकल्प जरी या दिवाळीत करता आला, तरी चैतन्याच्या दिवाळीची खरी ज्योत लावल्याचे समाधान मिळेल.