संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Tuesday, October 12, 2010

चैत्रांगणातून संस्कृती शिक्षण

रांगोळी हा विषयच असा आहे की तो शब्द जरी कानावर पडला तरी मराठी माणसाच्या चेह-यावर स्मितरेषा उमटतेच. पुण्या-मुंबईकडे ठिपक्यांच्या पण आधुनिक रांगोळ्या काढण्याची पद्धत आहे. त्यांना आपल्या संस्कृतीत विशेष असे महत्व दिसत नाही. अशाच रांगोळ्या अगदी अमेरिकेत पण काढण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सांगली जिल्हा व उत्तर कर्नाटक म्हणजे बेळगाव जिल्हा या ठिकाणी दरवर्षी चैत्र महिन्यात रोजच तुळशीवृंदावनापुढे चैत्रांगण काढायची पद्धत आहे. वसंत ऋतूत थंडी संपून धरतीमाता नवे हिरवे वस्त्र धारण करू लागलेली असते. तिचे स्वागत करण्यासाठी बायका आपले अंगण या रांगोळ्यांनी सजवतात.
चैत्रांगणात बहुतेककरून पारंपारिक रांगोळ्या रेखाटण्याची प्रथा आहे. शंख, चक्र, गदा, पद्म, चंद्र, सूर्य, गोपद्म व स्वस्तिक या रांगोळ्या काढण्याची प्रथा भारतभर दिसून येते. शंख, चक्र, गदा, पद्म ही विष्णूची चार आयुधे. एखादे युद्ध पुकारायचे असल्यास त्याची शत्रूला ग्वाही देण्यासाठी शंख वाजवण्याची प्रथा रामायण, महाभारत काळात होती. चक्र म्हणजे सुदर्शन चक्र व गदा ही शत्रूशी युद्ध करतांना वापरावयाची शास्त्रे होत. कमळ हे माणसाच्या मनाच्या शुद्धतेच द्योतक आहे. आकाशातील चंद्र तारे व सूर्य हे पृथ्वीचे रक्षक व पोशक आहेत. पृथ्वीवर होणारे असंख्य उल्कापात चंद्र झेलतो. त्यामुळे पृथ्वी सुरक्षित रहाते. सूर्यामुळे पृथ्वीवरचे जीवन शक्य होते. स्वस्ति हा शब्द सु आणि अस्ति अशा दोन शब्दांनी बनलेला आहे. त्याचा अर्थ 'चांगले असो' असाच आहे. स्वस्तिक म्हणजे चांगले करणारा. गोपद्म म्हणजे गाईची पावले. हिंदू धर्मात गाईचे महत्व असायचे कारण म्हणजे हिंदू संस्कृती ही शेतीप्रधान होती. शेतीसाठी बैल लागतात. गायीचे रक्षण केले तरच बैल निपजू शकतात.
चैत्रातील शुद्ध तृतीयेपासून ते वैशाखातील अक्षयतृतीयेपर्यंत तुळशीवृंदावनासमोर चैत्रांगण काढायची पद्धत असते. त्यात चैत्रगौरीचा पाळणा, पंखे, प्रवेशद्वार, नागफूले यांचा प्रामुख्याने समावेश असतो असा पाळणा काढायची पद्धत काही वन्य जमातीतही आढळते. चैत्रगौर म्हणजे धरणीमाता. हिवाळ्यातील बोचरी थंडी संपून आता चैत्र महिन्यात झाडांना हिरवी पालवी फुटू लागलेली असते. चैत्रगौरी बरोबर तिची मैत्रीणपण काढायची पद्धत आहे. दोघीजणी हिरवे वस्त्र लेऊन नटल्या आहेत. पार्वतीला चैत्रगौर म्हणतात. तेव्हा तिच्याबरोबर तिची सखी हवीच. वसंत ऋतूपासून हवा गरम होऊ लागते. त्यांना गरम होणा-या हवेत थंडावा देण्यासाठी दोन्ही बाजूला दोन वाळ्याचे पंख काढायचीपण पद्धत आहे. दोन्ही पंखे समान मापाचे पण त्याचबरोबर एकमेकांचे आरशातील प्रतिबिंब असावेत, तसे काढण्यात कौशल्य असते.
 शिवाय मोर, हत्ती, मासा, हंस, तुळशी वृंदावन, शंकराची पिंड, गाय-वासरू, गरुड वगैरे गोष्टी काढायची पण प्रथा दिसून येते. माणसाने राजहंसाप्रमाणे असावे असे म्हणतात. हंस जसा त्याच्यासमोर दूध व पाणी मिसळून ठेवले असता फक्त त्यातील दुध पितो व पाणी वगळतो असा समज आहे, त्याप्रमाणे माणसाने नेहमी चांगल्याची निवड करावी अशी हिंदू धर्मात शिकवण आहे. पोपटाचे पण महत्व गीता-ज्ञानेश्वरीत सांगितलेले आहे. पोपट जसा एखाद्या नळीवर बसला व चुकून त्याचे खाली डोकं वर पाय झाले तर त्याला जग कसे सगळे उलटे दिसेल, त्याच प्रमाणे माणसाला या जगाविषयी भ्रम असतो, असे म्हटले आहे. तसच सरस्वतीचे वाहन मोरच का? मोराच्या पिसात विलक्षण ज्ञान भरलेले आहे. त्याचा खरा रंग कसा असतो. परंतु भोतीकशास्त्रातील डिफ्रॅक्शन म्हणून ही गोष्ट असते त्याच्या कारणाने सूर्यप्रकाश पिसावर पडला की त्याच्या विभाजनाने रंगांचा विलोभनीय आकृतिबंध दिसतो. हत्तीला गजलक्ष्मी म्हटलेले आहे. ज्याला हत्ती पाळणे शक्य असते, त्याच्याकडे संपत्ती असणे साहजिकच आहे.
खालील ठिपक्यांच्या रांगोळीत मी खास पारंपारिक मराठी रांगोळ्या असे म्हणते. नारळ, स्वरस्वती, बिल्वपत्र व चक्रव्यूह या रांगोळ्या महाराष्ट्राशिवाय इतर ठिकाणी दिसत नाहीत. कोयरी, कासव, नाभिकमळ व ज्ञानकमळ या रांगोळ्या महाराष्ट्रात व कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू यांच्या हद्दीवर दिसतात.
नारळ: ही खास कोकणची रांगोळी. नारळाचे आपल्या संस्कृतीतले महत्व सुपरीचीतच आहे. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. त्याचा प्रत्येक भाग हा उपयोगी असतो. देवासमोर नारळ फोडणे म्हणजे आपला अहं मोडणे होय.

सरस्वती: विद्येची देवता म्हणून सर्वांनाच माहित असते.

लक्ष्मी: धनाची देवता म्हणून सर्वांनाच माहित असते.

कोयरी: कैरी या शब्दाचा हा अपभ्रंश किंवा कोकणातील आंब्याच्या कोयीचे हे चित्रण.

बिल्वपत्र: बेलाचे पान शंकरला वाहतात. त्याला तीन दले असतात. तसेच तीन भाग बिल्वपत्र या रांगोळीत असतात.

कासव: कासवाचे महत्व भारतीय संस्कृतीत असण्याचे करण म्हणजे विष्णूच्या दहा अवतारांपैकी कासव हा दुसरा अवतार. ते पाण्यात तसेच जमीनीवर राहू शकते. देवळातून जमीनीवर कासव कोरण्याची म्हणून प्रथा आहे.

नाभिकमळ: यात विश्वाच्या उत्पत्तीचे वर्णन दडलेले आहे. भगवान विष्णूच्या नाभीतून (बेंबीतून) ब्रम्हकमळ उगवले व त्यात ब्रम्हा विराजमान होते. त्यांनीच पुढे सृष्टीची निर्मिती केली आहे अशी पुराणात आख्यायिका आहे.

ज्ञानकमळ: कमळ चिखलात उगवते पण त्याला जसा चिखल लागलेला नसतो ते स्वच्छ असते त्याप्रमाणे माणसाचे ज्ञानही शुद्ध असावे. पुर्वग्रहदुषित नसावे अशी शिकवण आहे.

चक्रव्यूह: महाभारतातील अभिमन्यूची कथा सर्वांनाच माहित असते. या रांगोळीच्या आकारात द्रोणाचार्यानी व्यूह रचला होता. त्यात शिरायचे कसे हे त्याला माहित होते परंतु बाहेर कसे पडायचे ते माहीत नव्हते.
सर्वच रांगोळ्या नजरेला सुंदर दिसतात. त्याचे कारण म्हणजे त्यातील सममिती. काही अपवाद (सुर्य, शंख, सरस्वती व चक्रव्यूह) सोडले तर बहुतेक सर्वच रांगोळ्यात चक्रीय सममिती असते. परंतु ठिपके काढून काढलेल्या पारंपारिक रांगोळ्यांचे आणखी एक वैशिष्ट्य असे की त्या रांगोळ्याचा एक मूळ आकृती बंध असतो. तसच प्रत्येक आकृती बंधात एखादे विशिष्ट गणिती प्रमेय असते. मूळ आकृतीबंधातून मग मोठे आकृती बंध बनवता येतात. या क्रियेला गणितात इटरेशन वा पुनरावृत्ती म्हणतात. अशाप्रकारे रांगोळ्या काढतांना एकीकडे मनाला मिळणा-या आनंदाबरोबर नकळतपणे गणिताचा अभ्यासही होतो.
रोज रांगोळी काढण्याचे बरेच फायदे आहेत. कलात्मकतेबरोबरच, समान अंतरावर ठिपके काढण्यात कौशल्य असते. तसेच मनाची एकग्रता व शिस्त वाढते. रांगोळी काढण्याबरोबर ती पाहणा-यालाही एक प्रकारचा सात्विक आनंद मिळतो. शिवाय आपल्या हिंदू संस्कृतीच्या शिकवणीत त्यातून सतत आठवण रहाते व नकळत गणीती प्रमेयांचा अभ्यास होतो हा तर केवडा मोठा वाटा आहे. सध्याच्या युगांत विशेषत: पुणे-मुंबई ठिकाणी वा अमेरिकेत रोज अंगणात जरी या रांगोळ्या काढणं शक्य नसलं तरी शाळेत चित्रकलेच्या तासाला त्या शिकणं यातून बरच काही साध्य होऊ शकेल.


माधुरी बापट
१६६६ साउथ कॅटस रेन लेन
थॅचर, अँरीझोना.

No comments:

Post a Comment