संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Sunday, October 10, 2010

आवृत्ती दि. 10-10-2010




तुम्ही काय नवीन करणार?





सर्वच शिक्षक शिकवतात.


मात्र अनेकांची शिकवण्याची पद्धत जुनी असते.


सगळं जग जर काळाच्या


पुढे धावताना दिसतंय,


तिथे शिकवण्याची पद्धत जुनी कशी चालेल?





औपचारिक शिक्षणाच्या बरोबरीने येणाऱ्या सततच्या परीक्षा, त्यातही लेखी परीक्षांचं मानगुटीवर बसवलेलं भूत, अभ्यासाची तुलना - स्पर्धा याचा दुष्परिणाम पारच टोकाला जातो आहे. मात्र हे ओझं काही अंशी खाली उतरवण्याचे जोरदार प्रयत्नही चालू आहेत.


खरं तर हा बदल यापूर्वीच व्हायला हवा होता. त्यासाठी बळी जायची वाट बघायची काहीच गरज नव्हती. आताही बदलाचे हे वारे अतिशय धिम्या गतीत वाहताहेत. या बदलांची झुळूक खऱ्या अर्थाने आणि शहरी-ग्रामीण सर्व मुलांपर्यंत पोहोचायला हवी. वरवरचे कोणतेही बदल आता अपेक्षित नाहीत.


शासकीय पातळीवर हे बदल होत आहेत. ते बदल मुलांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी आहे ती शिक्षकांची.


यासाठी शिक्षकांनी मानसिक पातळीवर हे बदल स्वीकारण्याची नितांत आवश्यकता आहे.


अनेक वर्षं मी याच पद्धतीने शिकवलं आता ही कसली नवी पद्धत? असं हिणवून शिक्षकांनी जर नवी पद्धत नाकारली तर बदल होऊनही मुलांना त्याचा काही फायदा होणार नाही.


ही गोष्ट लक्षात घ्यायलाच हवी की आपल्या शिक्षणपद्धतीला बालकेंद्री शिक्षणपद्धत म्हणताच येणार नाही. ती संपूर्णपणे प्रौढांना सोयीची जाईल अशी पद्धत होती. यात मुलांच्या भावभावनांना, आवडी-नावडीला कसलंही स्थान नव्हतं. अगदी पाठ्यपुस्तकांची भाषा, वर्गातली बसण्याची पद्धत इथपासून ते दप्तरांचं वजन- यातलं काहीही मुलांच्या सोयीचं, त्यांना मध्यवर्ती ठेवून आखलेलं नव्हतं. अर्थात आजही नाही.


मात्र या सर्व परिस्थितीत बदल घडवून आणण्याची शिक्षकांची इच्छा असेल तर ते नक्की बदल घडवून आणू शकतात. मुलांना समजून घेणं, त्यांच्या वयाला- वयानुरूप वागण्याला समजून घेणं, त्यांच्यात असलेल्या अतिरिक्त ऊर्जेला योग्य वाट करून देणं, यानंतर मुलांचा रस टिकवून ठेवून सोप्या भाषेत शिकवणं हे खूप अवघड काम आहे का? खरं तर अशीच आहे बालकेंद्री शिक्षणाची पद्धत. मुलांना केंद्रस्थानी ठेवून शिक्षणाची पद्धत आखणं अतिशय आवश्यक आहे.


काही बदल असेही..


निदान शिक्षकाने स्वत:च्या वर्गात, आपल्या विषयाच्या मुलांसाठी बालकेंद्री तासिका आखून बघायला काहीच हरकत नाही. पाठ्यपुस्तकातलाच विषय नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने शिकवून बघायला हवा.


१. खडू-फळा न वापरता कधी गोष्टीचं पुस्तक वाचून,


२. कधी चित्रं, कधी प्रयोगांच्या साहाय्याने.


३. कधी संवाद, नाट्य, नाट्यछटा, नाट्यवाचन यांचा आधार घेऊन.


४. कधी उपलब्ध गाणी - कविता यातून.


५. कधी अभ्यास सहलीला नेऊन.


६. मुलांचे गट करून. त्यांना चर्चेला विषय देऊन.


७. मुलांना प्रश्न विचारायला उद्युक्त करून आणि या प्रश्नांची उत्तरं त्यांनी मिळवावीत यासाठी आवश्यक ती सामग्री पुरवली तर स्वत:च विषय तयार करू शकतील. यासाठी त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे. मात्र मुलं स्वत: शिकत आहेत हे लक्षात घेऊन ती चुकणार हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांच्या चुका स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे.


शिक्षक नव्हेत; प्रयोगकर्ते


यापेक्षा अनेक वेगळ्या आणि चांगल्या कृती शिक्षकाला प्रत्यक्ष काम करताना सुचत असतात. मात्र त्या अंमलात आणल्या जातातच असं नाही. मात्र सुचलेली चांगली कृती शिक्षकांनी मुलांपर्यंत पोहोचवायला हवी. त्यांना अभ्यासात मजा यावी म्हणून. त्यांना विषय जास्त चांगल्या पद्धतीने कळावा म्हणून. हळूहळू विषयाची आणि अभ्यासाची गोडी लागावी म्हणून. अशा अनेक कारणांसाठी शिक्षकांनी आपापल्या वर्गात प्रयोग करत राहिलं पाहिजे.


प्रत्येक शिक्षकासमोर अडचणी असतात, व्यवस्थापनाचे वेगळे दृष्टिकोन आड येतात. कधी वेळेची तर वेळापत्रकाची अडचण असते. अवांतर आणि अतिरिक्त कामाची तर अडचण नेहमीचीच असते. मात्र त्यापलीकडे असलेल्या आपल्या पेशाचा विचार करायला तर हवाच. सर्वच शिक्षक शिकवतात. शिकवण्यासाठीच ते शिक्षक झालेले असतात. मात्र शिकवण्याच्या पद्धती जुन्या असतात. सगळं जग जर काळाच्या पुढे धावताना दिसतंय, तर शिकवण्याची पद्धत तरी जुनीच का असावी?


त्यात काळानुरूप बदल व्हायलाच पाहिजेत आणि ते करणंही केवळ शिक्षकांच्या हातात असलेली गोष्ट आहे, यासाठी नव्या विचाराच्या शिक्षकांनी तयार व्हायला हवं.

No comments:

Post a Comment