संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Monday, October 11, 2010

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती.

जीवनदर्शन घडवा! - शिवाजीराव भोसले (भाग ३)


जगातील सर्व मोठी माणसे कधी तरी लहान असतातच. 'लहानपण देगा देवा' अशी प्रार्थना करण्याचा मोह संतांनाही पडत असे.विवेकानंद पोरवयात स्वप्नरंजनात रमत. हा स्वप्नांचा फुलोरा मोहक होता. दोन परस्परविरोधी आकांक्षा रम्य कल्पनांच्या रूपात आलटून पालटून त्यांच्या डोळ्यांपुढे उभ्या राहत. त्यांच्या मनोराज्यात आपला अंमल गाजवीत आणि मग आपोआप धुक्याप्रमाणे धूसर होत व शेवटी मन निरभ्र होऊन स्वामी निवांतपणे झोपी जात.

एका कल्पनाचित्रात त्यांना उदंड ऐश्वर्याचे दर्शन घडे. आपण सत्ता व संपत्ती यांच्या बळावर सर्व प्रकारचा आनंद अनुभवत आहोत असे भासत असे. या दृश्यात ते कधी भान हरपून जात. याउलट काही क्षण असे येत की, त्यांना आपले विरक्त व सन्यस्त जीवन दिसे. हाती दंड, कमंडलू व नित्य तरुतलवास असा आभास होत असे. विशेष म्हणजे यामधले एक स्वप्न पुढे विरून गेले. न सरता मागे उरले ते विरक्त जीवनदर्शन. तेच त्यांचे जीवनसार ठरले.


या विरक्त जीवनात दोन प्रेरणा प्रबल आणि प्रभावी होत गेल्या. उदंड ज्ञनसंपादन आणि साक्षात ईश्वरदर्शन या त्यांच्या आकांक्षा मनात मूळ धरून वाढत, विस्तारत गेल्या. विवेकानंदांची अभ्यासाची एक बैठक होती. त्याचप्रमाणे ध्यानाची एक जागा होती. अभ्यासाच्या खोलीत ग्रंथाच्या राशी दिसत. जवळच एखादा तंबोरा असे. ध्यानाचा कोपरा निवांत असे. विवेकानंदांनी भारतीय शास्त्रीय संगीताची संथा घेऊन उस्तादांच्या दारी धरणे धरले होते. त्यांचे गीतगायन हे अनेकांच्या जीवनातले एक आकर्षण होते. त्यांची व्यासंगाची एक अढळ बैठक होती. अवघड वाटणारी युक्लीडची भूमिती त्यांनी एकलव्याच्या एकाग्रतेने एकाच सलग बैठकीत आत्मसात केली. त्यांना ध्यानाचा छंद होता. कोणत्याही क्षणी ते डोळे मिटून ध्यानस्थ होत. काही वेळा डोळे उघडे राहत व समोर काही दिसू लागले. पोरवयात त्यांना भगवान बुद्धांचे दर्शन घडले होते. ध्यानस्थ असताना समोरच्या भिंतीतून एक तेजस्वी सन्यस्त एकदम प्रकटल्यासारखे दिसले. स्वामींशी काही हितगूज करण्याचा भाव या सन्यस्ताच्या मुदेवर होता. पोरवयाचे स्वामी भयचकित होऊन खोलीबाहेर पडले. क्षणभर त्यांना वाटले की हे भगवान बुद्ध असावेत. स्वामी परत ध्यानाच्या जागी आले. तेव्हा बुद्ध अंतर्धान पावले होते.


त्यांना वारंवार असे अनुभव येत. पण स्वामी त्यांच्या आहारी जात नसत. त्यांना अढळ सत्य हवे होते. एखाद्या निसरत्या अनुभवाने वेडावून जाणे त्यांच्या वृत्तीत नव्हते. वैज्ञानिकाची जिज्ञासा आणि साशंकता त्यांच्या वृत्तीत होती. देव त्यांना हवा होता. पण त्याच्या अस्तित्वाचा निविर्वाद प्रत्यय येत नव्हता. कोलकात्यात अभ्यासमंडळे होती. ब्राह्मासमाजासारख्या संस्था होत्या. केशवचंद सेनांसारखे समाजधुरीण होते; पण निविर्वाद व निरभ्र जीवनदर्शन घडवू शकणारे कोणी अधिकारी भेटत नव्हते. वय वाढत गेले. वाचन वेगाने घडू लागले. मनात कल्पनांचे कल्लोळ माजू लागले. जीवन नावाचे काव्य ओळी-ओळीने नजरेसमोरून सरकू लागले; पण त्याचा पुरता अर्थबोध घडेना. 'कोणाच्या आधारे करू मी विचार


कोण देईल धीर माझ्या जीवा''


ही तुकाराम महाराजांची अवस्था विवेकानंदांच्या वाट्याला आली.


या अवस्थेत असताना त्यांना रामकृष्ण परमहंस भेटले. त्यांचे सहज दर्शन घडले. पुढे त्यांचा अनुग्रह आणि कृपाप्रसाद लाभणार होता. काळ आपला आराखडा तयार करीत होता.


या जगात विवेकानंद जन्माला यावेत; त्यांना रामकृष्ण परमहंस भेटावेत, या अतूट संबंधातून एक अद्भुतरम्य नाते निर्माण व्हावे हे एक नवल नव्हे काय? त्या दोघांत दोन ध्रुवांचे अंतर होतं. विवेकानंद सुदृढ बांध्याचे होते. रामकृष्ण फाटक्या अंगाचे होते. रामकृष्णांचे शिक्षण सुरुवातीजवळच संपले होते. बंगाली मूळाक्षरांपलीकडे त्यांची पावले पडली नाहीत.


शाळेत जाऊन देवाची भेट होईल का? ती होणार नसेल तर नकोच ती शाळा असे त्यांना वाटे. या उलट त्यांच्या जन्मगावी असणारी एक धर्मशाळा त्यांना फार आवडे. तीर्थयात्रेला निघालेले अनेक पारमाथिर्क व यात्रिक तेथे थांबत. रामकृष्णांचा चिमणा जीव त्यांच्या आसपास घोटाळत असे. त्यांच्या सेवेत रमत असे. आरती करत असे. गाणी म्हणत असे. देवादिकांची नाटके बसवून साधुसंतांना व गावातील भाविकांना रिझवीत असे. त्याला अधूनमधून भास होत असत. त्या भासात देव दिसे.


हा मुलगा आपल्या साधनेच्या बळावर रामकृष्ण परमहंस झाला. त्याला पुढे उपदेशाचा पान्हा फुटला. जे आपण पाहिले, जाणले, अनुभवले ते कोणाला तरी सांगावे असे त्याला उत्कटतेने वाटू लागले; पण सांगणार कोणाला? लोकांना मनोरंजन हवे होते. आर्त निवारण हवे होते. त्यांना जीवनदर्शन नको होते. लोक सुखापायी वेडे होतात. रामकृष्ण देवापायी वेडे झाले होते. आपल्या या वेळात त्यांना कोणीतरी वाटेकरी हवा होता. उत्तम भक्तिगीते म्हणणाऱ्या त्या नरेंदात त्यांना या वेडाची लक्षणे दिसली.


या वेड्यापायी ते स्वत:च वेडे झाले. वारंवार म्हणू लागले : तू दक्षिणेश्वरी येत रहा. मला संसारी माणसांची बोलणी ऐकून वीट आला आहे. तुझी नजर देवाकडे आहे. तू माझ्या नजरेसमोर रहा.

( क्रमश:)


- प्राचार्य शिवाजीराव भोसले

No comments:

Post a Comment