हैद्राबाद मुक्तिसंग्राम भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याचे पर्व
निजामाच्या असफिया घराण्याची राजवट 1724 ते 1948 पर्यंत सुमारे सव्वा दोनशे वर्षे होती. मीर उस्मान अलीखान बहादूर हे असफिया घराण्याचे सातवे राजे, त्यांची महत्वाकांक्षा मोठी होती. तरी पण ते कोणावर फारसा विश्वास ठेवीत नसत. पण भारतात महत्वाच्या ठिकाणी मुस्लिम सत्तेचे अधिराज्य असावे असे त्यांना वाटत होते. त्यांचे या प्रकारचे प्रयत्नही होते, पण या प्रयत्नांना ब्रिटीश गव्हर्नरांच्या नियंत्रणामुळे खो बसत होता. निजामाची भूमिका सदैव तडजोडीची राहिली आहे. हेतू साध्य करण्यासाठी तडजोड करायची व संधी मिळताच प्रयत्नशील रहावयाचे असा निजामाचा स्वभाव होता. मुस्लिम प्रजा सोडली तर अन्य प्रजा निजामाच्या धोरणाविरूद्ध होती.
हैद्राबाद राज्याचे एकूण 16 जिल्हे होते. त्यात आंध्राचे 8, मराठवाड्याचे 5 व कर्नाटकाचे 3 जिल्हे होते. असे तेलगू, मराठी व कानडी भाषिक नागरिकांचे हैद्राबाद संस्थान होते. नागरिकांच्या मातृभाषेला दुय्यम स्थान होते. राज्याची मुख्य भाषा म्हणून उर्दूला स्थान होते. सरकारी माध्यम उर्दू होते. त्यामुळे उर्दू हीच राज्याची भाषा सक्तीची होती. सर्व व्यवहार उर्दू माध्यमाद्वारे होत. प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत उर्दू माध्यमाद्वारे शिक्षण घ्यावे लागत असे. हैद्राबाद संस्थान हे मुस्लिम राष्ट्र व्हावे म्हणून निजामाने भारतातील अरबी, फारशी भाषेच्या विद्वानांना बोलावून त्यांच्या प्रमुख जागी नियुक्त्या केल्या.
हैद्राबादसंस्थानची 85 टक्के प्रजा हिंदू व 15 टक्के मुस्लिम जमातीचे नागरिक होते. राजा मुस्लिम असल्याने शासकीय नोकरीतून 83 टक्के लोक मुस्लिम व 11 टक्के लोक हिंदू व तत्सम लोक शासकीय नोकरीत असत. पण शासनाच्या सर्व खात्यातून अधिकारी वर्ग मुस्लिम असे त्यामुळे हैद्राबाद संस्थानातील हिंदूंना केवळ सामान्य जीवन जगावे लागत होते.
निजामाची राक्षसी महत्वाकांक्षा
निजामाचे धोरण हे दक्षिण भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या संस्थानात पाकिस्तानप्रमाणेच मुस्लिम राष्ट्र निर्माण करावे अशी त्यांची राक्षसी महत्वाकांक्षा होती. त्यामुळे बहुसंख्य हिंदू प्रजेला दाबून ठेवण्यासाठी निर्बंध लादण्यात आले होते.
निजामाच्या काळात हैद्राबाद स्टेट कॉंग्रेसवर वेळोवेळी बंदी घालण्यात आली. त्यामुळे निरनिराळी नावे धारण करुन कार्यकर्त्यांना संघटनेचे कार्य चालू ठेवावे लागे. त्या दृष्टीने आंध्र परिषद, कर्नाटक परिषद व महाराष्ट्र परिषद या नावे कार्य करावे लागे.
राजकीय निर्बधांसोबतच धार्मिक निर्बंध मोठ्या प्रमाणात लादले होते. कोणत्याही धार्मिक कार्यासाठी परवानगी घ्यावी लागे. कोणत्याही ठिकाणच्या मशिदीपुढून कोणत्याही वेळी वाद्य वाजवीत जाता येत नसे. पालखी, दिंडी सारख्या मिरवणुकीवर हल्ले केले जात. अधिकारी मुस्लिमधार्जिणे असल्याने रझाकारांना साथ मिळत असे व अर्जदारांना अन्यायाने शिक्षा भोगावी लागे. या निर्बंधांचा बिमोड करण्यासाठी आर्य समाजाने 1936 साली फार मोठी चळवळ उभी केली. धार्मिकदृष्ट्या हिंदूंवर लादलेली बंधने काढून टाकावीत म्हणून सत्याग्रहाचा अवलंब केला.
आर्य समाजाने सोलापूर व अहमदनगर येथे केंद्र चालू केले होते. या दोन्ही ठिकाणी सत्याग्रहींची नोंदणी करुन ते गुलबर्गा व हैद्राबाद आदि ठिकाणी जावून सत्याग्रह करुन अटक करुन घेत. आर्य समाजाचे कार्यकर्ते पं.नरेंद्रजी, पं. बन्सीलालजी व हुतात्मा श्यामलालजी हे दोघे बंधु, बॅ.विनायकराव विद्यालंकार, ऍड. गोपाळराव एकबोटे, महात्मा आनंद स्वामी या कार्यकर्त्यांनी स्फूर्ती दिल्यामुळे हैद्राबाद संस्थानातील प्रत्येक जिल्ह्यातील तुरुंग सत्यागृहींनी भरले होते. हे कार्यकर्ते तुरुंगात होमहवन करीत व संघटना बलवान व्हावी म्हणून चर्चासत्रे घडवून आणीत. सत्यार्थप्रकाश या ग्रंथाचे अध्ययन करीत. धर्मवीर श्यामलालजी यांचा तुरुंगात मृत्यु झाला.
हिंदूंनी जाती-पाती पाळू नयेत, रोटी-बेटी व्यवहार करावेत, सर्व मानव जात एक आहे, उच्च-नीचता मानू नये असा उपदेश केला जात असे. समाजाच्या दुर्बल घटकातील कार्यकर्त्यांना संघटीत करुन प्रवाहात आणण्याचे कार्य आर्य समजाने मोठ्या प्रमाणात केले आहे.
अखिल भारतीय कॉंग्रेसचे कार्य मोठ्या प्रमाणात देशात चालू होते. कारण कॉंग्रेसचा लढा संपूर्ण राष्ट्राच्या मुक्ततेचा होता. हैद्राबाद संस्थानातील प्रजेला फक्त मिठाचा सत्याग्रह तेवढा करता आला नाही. कारण संस्थानासाठी समुद्र किनाराच नव्हता. मात्र अ.भा. कॉंग्रेसच्या आदेशानुसा रशिंदीची, ताडीची, मोहाची झाडे तोडून जंगल सत्याग्रह असंख्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला. ताडीच्या झाडापासून निजामाला मुबलक प्रमाणात उत्पन्न मिळत होते. महात्मा गांधींनी दिलेल्या असहकाराच्या चळवळीत खादीचा प्रचार, सूतकताई, मातृभाषेतून शिक्षण, राष्ट्रभाषा हिंदीचा प्रचार, राष्ट्रीय विचाराच्या शाळा सुरु करणे, दुर्बल घटकातील कार्यकर्त्यांना संघटनेत वाव देवून अस्पृश्योद्धाराची चळवळ पुढे नेणे आदि कार्यक्रम कॉंग्रेस संघटनेच्यावतीने केले जात असत.
1942 साली महात्मा गांधींनी ब्रिटीशांना 'चले जाव'ची घोषणा करताच मराठवाड्यातील स्टेट कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करुन तुरुंगवास भोगला.
हैद्राबाद संस्थानात वंदे मातरम्वर बंदी घालण्यात आली होती. शाळेत वंदे मातरम् हे गीत म्हणू दिले जात नसे. वंदे मातरम् सत्याग्रहाचा श्री गणेशा औरंगाबाद येथे झाला. ही चळवळ मराठवाड्याच्या प्रत्येक शहरात पोचली. महाविद्यालयाच्या व उस्मानिया विद्यापीठाच्या परिसरात वंदे मातरम् म्हणायचे नाही. याबाबत खूप संघर्ष झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाशीम, वर्धा, नागपूर, जबलपूर येथील महाविद्यालयातून प्रवेश घेतला व शिक्षण पूर्ण करावे लागले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सर्वश्री गोविंदभाई श्रॉफ, आ.कृ. वाघमारे, एस.के. वैशंपायन व रावसाहेब पटवर्धन यांनी केले.
महाराष्ट्र परिषदेचे उल्लेखनीय कार्य
निजामानेहैद्राबाद स्टेट कॉंग्रेसवर बंदी घातल्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र परिषदेच्या नावाखाली मराठवाड्यात चळवळ चालू ठेवली. मराठवाड्यातील कॉंग्रेस संघटनेकडे पूर्ण वेळ काम करणारे 83 कार्यकर्ते होते. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात 22, परभणीत 16, नांदेड 16, बीड 7, उस्मानाबाद 13 व हैद्राबाद- सिकिंद्राबाद या ठिकाणी मराठवाड्यातील 9 कार्यकर्ते संघटनेचे काम करीत असत.
औरंगाबादेत सर्वश्री लाला बिंदा प्रसाद, मनोहरराव लोनदे, भालचंद्र व्यसाहाळकर, वि.रा.जोशी, बद्रीनारायण बारबोले, काशीनाथ कुलकर्णी, नाना जेधे, द्वारकादास पटेल आदी.
परभणी - सर्वश्री गणपतराव चारठाणकर, विनायकराव चारठाणकर, प्रभाकर वाईकर, दिगंबरराव कुलकर्णी, भुजंगराव जैन, किशनराव सवनेकर, श्रीनिवासराव बोरीक, मुकुंदराव पेडगांवकर आदी.
नांदेड- अनंतराव भालेराव, सीताराम पप्पू, रघुनाथ रांजणीकर, लक्ष्मण पाटील, नागनाथ परांजपे, मुंजाप्पा जंगम, शंकरसिंग कुबेर, गंगाराम बेळगे, श्यामरावबोधनकर, गोपाळ शास्त्रीदेव, भगवानराव गांजवे.
बीड - काशीनाथ जाधव, रतनलाल कोटेचा, श्रीनिवास खोत, दिगंबर दिघे, भिकाभाऊ राखे, वसंत देशपांडे आदी.
उस्मानाबाद- रा.श्री. दिवाण, कॅ. व्यं.बा. जोशी, विश्र्वंभरराव हराळकर, देवसिंह चौहाण, बाबुराव कानडे, श्रीनिवास अहंकारी, नरहराव मालखरे, चंद्रशेखर बाजपाई, नारायणराव चाकूरकर, बळवंत नागणे, फूलचंद गांधी, विमलचंद गांधी आदी.
हैद्राबाद- सिकिंद्राबाद या संघटनात्मक कार्याच्या जिल्ह्यातून सर्वश्री एस.के.वैशंपायन, ज.रा. बर्दापूरकर, श्यामराव अपसिंगेकर, पु.गो. पार्डीकर, दामोदरपांगरीकर, मा.रा. परांजपे, प्रतिभा वैशंपायन, माधवराव पाठक आदि कार्यकर्ते काम करीत आहेत.
भारत स्वतंत्र झाला आणि निजामाची महत्वकांक्षा वाढली
15ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. जागतिक दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना दोस्त राष्ट्रांच्या मदतीने विजय मिळाला पण ब्रिटनची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. ब्रिटिशांचा अंमल ज्या राष्ट्रावर होता त्या राष्ट्रात स्वातंत्र्याच्या चळवळी चालू होत्या. आशिया खंडात भारत हे सर्वात मोठे राष्ट्र. भारताला स्वातंत्र्य देत असतानाच ब्रिटिशांनी भारताचे हिंदूस्थान व पाकिस्तान असे विभाजन केले होते. विभाजनामुळे कत्तली झाल्या. निर्वासीतांचे लोंढे भारतात येऊ लागले. भीषण परिस्थिती निर्माण झाली.
पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी लेखणीच्या फटकाऱ्यानिशी भारतातील छोटी, मोठी संस्थान भारतात विलीन करुन टाकली. सर्वात मोठे संस्थान हैद्राबादच्या निजामाचे होते. निजामाने राक्षसी महत्वाकांक्षेपोटी इत्तेहादुल मुसलमीन या जातीय संस्थेच्या आधारे रझाकारांची संघटना सुरु केली होती. लातूरच्या कासिम रझवीने इत्तेहादुल मुसलमीन या संस्थेवर ताबा मिळविला व रझवी प्रमुख बनले.
रझाकार संघटनेने प्रजेवर जुलूम, जबरदस्ती, धाक, दपटशा, स्त्रियांवर अत्याचार करणे, खंडणी वसूल करणे, रझाकारांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे खून करणे आदि कामे सुरु केल्याने हैद्राबाद संस्थानात दहशतीचे वातावरण सुरु झाले होते. स्टेट कॉंग्रेसच्या नेत्यांना अटक करुन तुरुंगात टाकण्यात येत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले पण निजामी राज्य राक्षसी महत्वाकांक्षेने चेकाळले.
16,17 व 18 जून 1947 ला स्टेट कॉंग्रेसचे पहिलेच अधिवेशन होणार होते. यात अधिवेशनासाठी बाहेरून येणाऱ्या पुढाऱ्यांची भडक भाषणे होऊ द्यायची नाहीत असे निर्बंध घालण्यात आले होते. या अधिवेशनात स्वामी रामानंद तीर्थ यांचे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात ''हैद्राबाद सरकारने स्वतंत्र हिंदूस्थानात विलीन व्हावे व सर्व प्रकारचे नागरिक स्वातंत्र्य प्रजेला बहाल करावे. अन्यथा प्रजा क्रांतीचा अवलंब केल्याशिवाय राहणार नाही'', असे रोखठोक सांगितले.
स्टेट कॉंग्रेसच्या अधिवेशनानंतर दडपशाही सुरु झाली. दडपशाहीची सुरुवात होणार याची जाणीव असल्याने व स्वामीजींनी आदेश दिल्यावरून काही कार्यकर्त्यांनी सत्याग्रहाचा व काहींनी भूमिगत राहून कार्य करण्याचा मार्ग स्विकारला.
प्रत्यक्ष संग्रामाची सुरुवात - सरहद्दीवर सशस्त्र लढा
नांदेड जिल्ह्याचे उमरखेड, लोणी, धानोरा आणि शिवालपिंपरी येथे कॅंप्स सुरु झाले. बीडच्या कार्यकर्त्यांनी खेर्डा, पाथर्डी, डोंगर किन्ही, बालम टाकळी, मिरजगांव आणि कडा भागात होते. उस्मानाबाद जिल्ह्यात सोलापूर खेरीज बार्शी,गौंडगाव, चिंचोली, वाघोली, आंबेजवळगा,कौडगांव, वागदरी, मुश्ती या ठिकाणी कॅंप्स उघडले.
मराठवाडा विभागाचे स्टेट कॉंग्रेसचे केंद्र कार्यालय मुंबई येथे व प्रांतिक कार्यालय मनमाड येथे होते. औरंगाबाद जिल्ह्याचे कॅंप्स देऊळगांव राजा, साडेगांव, कोलता टाकळी, वातोडा, शेंदूर्णी, सुरगांव, एरंडगाव, भंगलगांव आणि टोका एवढ्या ठिकठिकाणी होते.
कॅंप्समधील युवक कार्यकर्त्यांनी संस्थानात राज्यकारभार हाकणे कठीण करावे, रझाकार आणि पोलीसांच्या अत्याचारांना पायबंद घालावा, करोडगिरीच्या नाक्यावर हल्ले करावेत व संस्थानात असलेल्या जनतेचे धैर्य खचू देऊ नये याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले होते. उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, जिल्ह्यात करोडगिरीच्यानाक्यावर, पोलीस स्टेशनवर रझाकारांच्या केंद्रावर हल्ले करण्यात आले.
आंदोलक कार्यकर्त्यांनी वाहतूक खंडित करणे, रेल्वेच्या रुळावरून मालगाडीचे डबे पाडणे, रेल्वेरुळ उखडणे अशी कामे केली. आंदोलनाचे प्रथम पर्व कायदेभंग होते. त्यात 1046 खेड्यात सामुदाईक झेंडावंदन घेण्यात आले. 1,22,000 शिंदी, ताडी व मोहाची झाडे तोडण्यात आली. 5588 लोकांना अटक करण्यात आले होते. 550 खेड्यांनी तस्करी कर देण्यास नकार दिला. 270 खेड्यांनी लेव्ही देण्यास नकार दिला. 182 करोडगिरी नाकी उद्ध्वस्त करण्यात आली. 47 पोलीस ठाण्यावर हल्ले करण्यात आले. 165 खेड्यांनी पोलीस व रझाकारांचा प्रतिकार केला. 844 शत्रू ठार केले. 250 खेड्यांनी निजामी सत्ता झुगारुन स्वातंत्र्य पुकारले. लढत असताना स्टेट कॉंग्रेसचे 17 सैनिक धारातीर्थी पडले. शत्रूच्या अमानुष गोळीबारात 30 जण बळी पडले.
सोलापूर येथे बॉंब कारखाना
पू.बाबासाहेब परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथे बॉंबचा कारखाना सुरु करण्यात आला. बी.बी. नागणे व विनयाकराव महाजन यांनी लातूर व औसा येथील युवकांना हाताशी धरून बॉंब तयार करण्याचे काम केले. या कारखान्यात तयार केलेले बॉंब मराठवाड्याच्या बाहेर सरहद्दीवर असलेल्या सर्व कॅंप्सना पुरविले जाऊ लागले. शिवाय मनमाड, पुणे, इंदौर, बेंगलोर, जबलपूरहून हत्यारे मिळत, ती आणून कॅंप्सवर पोचविली जात.
उस्मानाबाद जिल्ह्यात पू. बाबासाहेब परांजपे, फूलचंद गांधी, विमलचंद गांधी, रा.श्री.दिवाण, चंद्रशेखर बाजपाई, शेषराव वाघमारे, विश्वंभरराव हराळकर यांनी यशस्वीपणे लढा दिला. याच काळात उमरी जि. नांदेड येथील सरकारी बॅंकेवर नियोजीत हल्ला करुन कार्यकर्त्यांनी 20 लाख 63 हजार 719 रुपये 15 आणे अशी निजामी रक्कम लुटली व ती बैलगाड्यांतून मध्यप्रदेशात व त्यानंतर सोलापूर येथे आणण्यात आली. या सर्व रक्कमेचा हिशेब भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभाभाई पटेल यांना देण्यात आला आहे.
याआंदोलनात महिलाही आघाडीवर होत्या. लातूरच्या सुशिलाबाई दिवाण, बीडच्या पानकुंवर कोटेचा, जालन्याच्या माई अंबेडकर, सरस्वतीबाई बोरीकर, चंदाबाई जरीवाला, राजकुंवर काबरा, तुंगा बेलुलीकर, गीताबाई चारठाणकर, कुसुम जोशी, शांताबाई पेडगांवकर, दगडाबाई शेळके, शकुंतला चाकूरकर या महिला आघाडीवर होत्या. आंदोलनातील गोवर्धन सराळ्याचे 8 खेड्याचे राज्य समाजवादी कार्यकर्ते विजयेंद्र काबरा व त्यांच्या पत्नी राजकुंवर काबरा यांनी निर्माण केले होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील स्टेट कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मानेगाव व जांबगांव या दरम्यानच्या पट्यातील 65 गावे स्वतंत्र करुन पोलीस ऍक्शन पर्यंत ताब्यात ठेवली होती. या गावांचे मुक्तापूर असे स्वतंत्र राज्य स्थापन करण्यात आले होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी या पट्यात राष्ट्रध्वज उभारून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या भागात कै. व्यं.बा. जोशी, चंद्रशेखर बाजपाई, राजेंद्रदेशमुख, शेषराव वाघमारे, नरहरराव मालखरे, नानासाहेब चिंचोलीकर, वसंत देशमुख यांचे कारभारी मंडळ नियुक्त करण्यात आले होते. त्यांना भगवान तोडकरी, रामभाऊ जाधव, रामचंद्रजी मंत्री, विठ्ठलराव पाटील, एल.बी. जठ्ठेगुरुजी आणि गोपाळदेव यांचे सहाय्य देण्यात आले होते.
पोलीस कारवाई
निजामाशी राजकीय वाटाघाटी केल्या जात होत्या. गृहमंत्री सरदार पटेलांनी सर्व प्रकारचे उपाय सुचवूनही निजामाचा स्वायत्तेचा हट्ट कमी होत नव्हता. देशातील सर्व संस्थानिकांनी आपली संस्थाने भारतात विलीन करुन सर्व नागरिक समान मानले होते. जबाबदार राज्य पद्धतीचे धोरण स्विकारले होते. पण निजामाचे व दक्षिण भारताच्या मध्यवर्ती भागात मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याचे स्वप्न कमी होत नव्हते. निजाम आणि त्यांना साथ देणारी इत्तेहादूल मुसलमीन व रझाकारांचे प्रमुख कासिम रझवी हे अत्याचार वाढवीत होते.
सरहद्दीवरील स्टेट कॉंग्रेसच्या सैनिकांनी सशस्त्रे लढे देवून 274 खेड्यांचा भूभाग ताब्यात घेवून निजामी राजवटीला हादरा दिला होता. जागतिक परिस्थिती निजामाला अनुकूल नव्हती. या संधीचा लाभ घेवून भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैद्राबाद संस्थानाच्या चारही दिशातून पोलीस कार्यवाही केली. 13 सप्टेबर 1948 रोजी पोलीस कार्यवाहीला सुरुवात झाली. सोलापूरहून मेजर जनरल जे.एन. चौधरींच्या मार्गदर्शनाखाली निजामी हद्दीत सैन्य घुसले व 17 सप्टेंबर 1948 रोजी सर्वप्रथम जे.एन. चौधरी सैन्यानिशी हैद्राबादला पोचले. निजामाने शरणागती पत्करली व हैद्राबाद संस्थान मुक्त झाले.
भारतातील सर्व संस्थाने विलीन झाली असताना निजामाचे एकमेव हैद्राबाद संस्थान विलीन झाले नव्हते. स्टेट कॉंग्रेसच्या सशस्त्र लढ्याने व भारत शासनाने पोलीस कार्यवाही केल्यामुळे भारतीय स्वातंत्र्याचे अपूर्ण असलेले पर्व पूर्ण झाले.
हैद्राबाद मुक्ती संग्रामाला आता 62 वर्षे पूर्ण झाली. भारतीय घटनेनुसार आम्ही लोकशाही, जबाबदार, धर्मनिरपेक्ष राज्य पद्धतीचा अवलंब करुन जीवन जगत आहोत. भारतीय घटनेने सर्वांना मतदानाचे अधिकार दिले आहेत. प्रत्येकाला मूलभूत अधिकरानुसार जगण्याचा व अडथळा आल्यास न्याय पद्धतीचा अवलंब करण्याचा अधिकार दिला आहे. तेंव्हा हे भारतीय राष्ट्र आर्थिकदृष्ट्या संपन्न कसे होईल हे पाहण्याची गरज आहे. त्यासाठी संघटना बांधणे, संघर्ष करणे व ग्रामीण भागापासून राज्यापर्यंत श्रमदान करुन राष्ट्र अधिक बलवान कसे होईल हे पाहण्याची गरज आहे.
जीवनधर शहरकर, लातूर
No comments:
Post a Comment