संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Sunday, October 10, 2010

आवृत्ती दि. 10-10-2010




तुम्ही काय नवीन करणार?





सर्वच शिक्षक शिकवतात.


मात्र अनेकांची शिकवण्याची पद्धत जुनी असते.


सगळं जग जर काळाच्या


पुढे धावताना दिसतंय,


तिथे शिकवण्याची पद्धत जुनी कशी चालेल?





औपचारिक शिक्षणाच्या बरोबरीने येणाऱ्या सततच्या परीक्षा, त्यातही लेखी परीक्षांचं मानगुटीवर बसवलेलं भूत, अभ्यासाची तुलना - स्पर्धा याचा दुष्परिणाम पारच टोकाला जातो आहे. मात्र हे ओझं काही अंशी खाली उतरवण्याचे जोरदार प्रयत्नही चालू आहेत.


खरं तर हा बदल यापूर्वीच व्हायला हवा होता. त्यासाठी बळी जायची वाट बघायची काहीच गरज नव्हती. आताही बदलाचे हे वारे अतिशय धिम्या गतीत वाहताहेत. या बदलांची झुळूक खऱ्या अर्थाने आणि शहरी-ग्रामीण सर्व मुलांपर्यंत पोहोचायला हवी. वरवरचे कोणतेही बदल आता अपेक्षित नाहीत.


शासकीय पातळीवर हे बदल होत आहेत. ते बदल मुलांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी आहे ती शिक्षकांची.


यासाठी शिक्षकांनी मानसिक पातळीवर हे बदल स्वीकारण्याची नितांत आवश्यकता आहे.


अनेक वर्षं मी याच पद्धतीने शिकवलं आता ही कसली नवी पद्धत? असं हिणवून शिक्षकांनी जर नवी पद्धत नाकारली तर बदल होऊनही मुलांना त्याचा काही फायदा होणार नाही.


ही गोष्ट लक्षात घ्यायलाच हवी की आपल्या शिक्षणपद्धतीला बालकेंद्री शिक्षणपद्धत म्हणताच येणार नाही. ती संपूर्णपणे प्रौढांना सोयीची जाईल अशी पद्धत होती. यात मुलांच्या भावभावनांना, आवडी-नावडीला कसलंही स्थान नव्हतं. अगदी पाठ्यपुस्तकांची भाषा, वर्गातली बसण्याची पद्धत इथपासून ते दप्तरांचं वजन- यातलं काहीही मुलांच्या सोयीचं, त्यांना मध्यवर्ती ठेवून आखलेलं नव्हतं. अर्थात आजही नाही.


मात्र या सर्व परिस्थितीत बदल घडवून आणण्याची शिक्षकांची इच्छा असेल तर ते नक्की बदल घडवून आणू शकतात. मुलांना समजून घेणं, त्यांच्या वयाला- वयानुरूप वागण्याला समजून घेणं, त्यांच्यात असलेल्या अतिरिक्त ऊर्जेला योग्य वाट करून देणं, यानंतर मुलांचा रस टिकवून ठेवून सोप्या भाषेत शिकवणं हे खूप अवघड काम आहे का? खरं तर अशीच आहे बालकेंद्री शिक्षणाची पद्धत. मुलांना केंद्रस्थानी ठेवून शिक्षणाची पद्धत आखणं अतिशय आवश्यक आहे.


काही बदल असेही..


निदान शिक्षकाने स्वत:च्या वर्गात, आपल्या विषयाच्या मुलांसाठी बालकेंद्री तासिका आखून बघायला काहीच हरकत नाही. पाठ्यपुस्तकातलाच विषय नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने शिकवून बघायला हवा.


१. खडू-फळा न वापरता कधी गोष्टीचं पुस्तक वाचून,


२. कधी चित्रं, कधी प्रयोगांच्या साहाय्याने.


३. कधी संवाद, नाट्य, नाट्यछटा, नाट्यवाचन यांचा आधार घेऊन.


४. कधी उपलब्ध गाणी - कविता यातून.


५. कधी अभ्यास सहलीला नेऊन.


६. मुलांचे गट करून. त्यांना चर्चेला विषय देऊन.


७. मुलांना प्रश्न विचारायला उद्युक्त करून आणि या प्रश्नांची उत्तरं त्यांनी मिळवावीत यासाठी आवश्यक ती सामग्री पुरवली तर स्वत:च विषय तयार करू शकतील. यासाठी त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे. मात्र मुलं स्वत: शिकत आहेत हे लक्षात घेऊन ती चुकणार हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांच्या चुका स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे.


शिक्षक नव्हेत; प्रयोगकर्ते


यापेक्षा अनेक वेगळ्या आणि चांगल्या कृती शिक्षकाला प्रत्यक्ष काम करताना सुचत असतात. मात्र त्या अंमलात आणल्या जातातच असं नाही. मात्र सुचलेली चांगली कृती शिक्षकांनी मुलांपर्यंत पोहोचवायला हवी. त्यांना अभ्यासात मजा यावी म्हणून. त्यांना विषय जास्त चांगल्या पद्धतीने कळावा म्हणून. हळूहळू विषयाची आणि अभ्यासाची गोडी लागावी म्हणून. अशा अनेक कारणांसाठी शिक्षकांनी आपापल्या वर्गात प्रयोग करत राहिलं पाहिजे.


प्रत्येक शिक्षकासमोर अडचणी असतात, व्यवस्थापनाचे वेगळे दृष्टिकोन आड येतात. कधी वेळेची तर वेळापत्रकाची अडचण असते. अवांतर आणि अतिरिक्त कामाची तर अडचण नेहमीचीच असते. मात्र त्यापलीकडे असलेल्या आपल्या पेशाचा विचार करायला तर हवाच. सर्वच शिक्षक शिकवतात. शिकवण्यासाठीच ते शिक्षक झालेले असतात. मात्र शिकवण्याच्या पद्धती जुन्या असतात. सगळं जग जर काळाच्या पुढे धावताना दिसतंय, तर शिकवण्याची पद्धत तरी जुनीच का असावी?


त्यात काळानुरूप बदल व्हायलाच पाहिजेत आणि ते करणंही केवळ शिक्षकांच्या हातात असलेली गोष्ट आहे, यासाठी नव्या विचाराच्या शिक्षकांनी तयार व्हायला हवं.

जगदीशचंद्र बोस - बिनतारी विश्वाचे जनक

बिनतारी विश्वाचे जनक?



(10-10-2010 : 11:08:35)



                                                     
                                                          जगदीशचंद्र बोस

              (१८९४ सालच्या नोव्हेंबर महिन्यात कलकत्त्यामध्ये बिनतारी लहरींचा

                                    वापर करून त्यांनी एक घंटा वाजवून दाखवली.

              नंतर दोन वर्षांनी मार्कोनीनं बिनतारी संदेशवहनाचे प्रयोग सुरू केले. )



हेन्रिच हटर्झला पहिल्यांदा सापडलेल्या बिनतारी लहरींचा म्हणजेच रेडिओ वेव्हजचा अभ्यास पुढे आपल्याच जगदीशचंद्र बोस (१८५८-१९३७) यांनी १८९४ साली सुरू केला. त्याच वर्षी दुर्दैवानं अतिशय प्रतिभावान असलेला हटर्झ वयाच्या ३७ व्या वर्षीच मरण पावला होता. बोसनी तीन भिंतींचं अंतर पार करून हे बिनतारी संदेश एकीकडून दुसरीकडे हवेतून जातात हे दाखवूनसुद्धा दिलं. या कामाची रॉयल सोसायटीनं दखल तर घेतलीच; पण त्याचबरोबर लंडन विद्यापीठानं बोसना मानद डॉक्टरेटसुद्धा प्रदान केली. हे सगळं असूनसुद्धा बोसना त्यांचं स्वत:चंच कॉलेज अपमानास्पद वागणूकच द्यायचं, आणि त्यांच्या संशोधनात अडथळे आणायचं !
बोस लहान असताना त्याच्या वडिलांना भारतावर सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटिशांच्या शिक्षणपद्धतीविषयी तिरस्कार वाटायचा. पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या प्रकारे लहान मुलांना शिकवलं जायचं त्याच पद्धतीनं भारतात अगदी एकांगी पद्धतीनं शिक्षण दिलं जातं असं वाटत असल्यामुळे बोसच्या वडिलांनी आपल्या मुलाला एका भारतीय पद्धतीच्या साध्या शाळेत पाठवलं. आपल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमुळे आधी तुरुंगात असलेला आणि आता आपली शिक्षा भोगून बाहेर पडलेला तसंच आपल्या वागणुकीत सुधारणा दाखवत असलेला माणूस त्यावेळी बोसना आपल्या खांद्यावर बसवून सगळीकडे नेत असे. त्या माणसाशी झालेल्या गप्पांमधून बोसना लहानपणापासूनच एकीकडे अतिशय क्रूर असलेल्या त्या माणसात दडलेल्या अतिशय मायाळू आणि संवेदनशील विचारांची ओळख झाली. शाळेत बोसनी इतकी विलक्षण प्रतिभा दाखवली की पुढचं शिक्षण भारतात घेण्यापेक्षा बोसनी इंग्लंडला जावं आणि भारतात इंग्रजांसाठी काम करणारा अधिकारी म्हणून काम करण्यासाठीची परीक्षा द्यावी असं त्याच्या शिक्षकांचं मत होतं. पण बोसच्या वडिलांना हे अजिबात पसंत नव्हतं. आपलं आयुष्य असलं फुटकळ काम करून वाया न घालवता बोसनी संशोधन कार्यात स्वत:ला वाहून घेतलं पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी बोसना लंडनच्या ख्राईस्ट कॉलेजमध्ये शिकायला धाडलं. ते शिक्षण पूर्ण झाल्यावर बोस भारतात परतले आणि त्यांची कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्या काळी हे भारतातलं सगळ्यात चांगलं कॉलेज होतं. पण कुठलाही भारतीय माणूस विज्ञानासंबंधीचं काहीही शिकवायला पात्र असणंच शक्य नाही असं म्हणत या कॉलेजच्या प्राचार्यांनी बोसच्या नेमणुकीवर आक्षेप घेतला. शेवटी ब्रिटिश प्राध्यापकांना दिल्या जाणाऱ्या पगाराच्या अर्ध्या पगारावरच बोसची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे बोसना आपल्या संशोधनासाठी निधीच उपलब्ध झाला नाही. या अपमानास्पद वागणुकीला उत्तर म्हणून बोसनी तीन वर्षं तिथे काम करूनही आपल्या पगाराला हातसुद्धा लावला नाही. त्यामुळे बोसची आर्थिक परिस्थिती खालावली. त्यातच त्यांचे वडील काही कारणामुळे कर्जबाजारी झाले होते. साहजिकच अतिशय अवघड परिस्थितीत बोसनी दिवस काढले. पण त्यांचं अफाट ज्ञान आणि शिकवायची उत्कृष्ट पद्धत यामुळे त्यांच्या तासांना विद्यार्थी अगदी उत्साहानं हजर राहायचे. त्यांचा वर्ग अगदी गच्च भरलेला असे. शेवटी कॉलेजच्या अधिकारी वर्गालाच नमतं घ्यावं लागलं, आणि तीन वर्षांनी का होईना पण बोसची तिथे पूर्णपगारी नेमणूक करण्यात आली.
बिनतारी लहरींच्या बाबतीतलं बोस यांचं मुख्य संशोधन म्हणजे जास्त लांबीच्या लहरींचा प्रत्यक्ष संदेशवहनासाठीच्या अभ्यासासाठी वापर करणं अवघड आहे हे सिद्ध करणं. १८९४ सालच्या नोव्हेंबर महिन्यात कलकत्त्यामध्ये बिनतारी लहरींचा वापर करून बोस यांनी छोट्या प्रमाणातला दारूगोळा दूरवरून उडवून दाखवला, तसंच एक घंटाही वाजवून दाखवली. अशाच प्रकारे बिनतारी लहरींचा वापर करून संदेशवहन करता येईल अशा आशयाचा एक प्रबंधही त्यांनी लिहिला. नंतर दोन वर्षांनी मार्कोनीनं बिनतारी संदेशवहनाचे प्रयोग सुरू केले. त्यावेळी बोस यांनी आर्थिक कारणांसाठी आपल्याला बिनतारी लहरींच्या अभ्यासामध्ये रस नसून त्यासंबंधीचं मूलभूत संशोधन पुढे न्यायचं असल्याचं सांगितलं. नंतरच्या अनेक इतिहासकारांनी बोस यांनाच बिनतारी संदेशवहनाचं खरं श्रेय मिळायला हवं होतं असं नमूद केलं आहे. पण अर्थातच व्यवहारचतुर असलेल्या मार्कोनीनं आपल्या नावावर ते लाटलं असा अनेक जण आरोप करतात.
काही काळानंतर आपले बिनतारी लहरींचे प्रयोग पुढे नेत असताना बोसना काही विलक्षण गोष्टी सापडल्या. ज्याप्रमाणे धातूच्या वस्तू बिनतारी लहरींना आपल्याकडे आकर्षून घेतात त्याच पद्धतीनं जीवसृष्टीमधल्या सजीव गोष्टींनासुद्धा त्यांचं अस्तित्व जाणवतं असं बोसांच्या लक्षात आलं. त्यातही वनस्पतींना या लहरींचं भान असतं आणि त्या लहरींमुळे त्यांच्यात फरक पडू शकतो असंही बोस यांच्या संशोधनात दिसून आलं. तसंच याहून वेगळा प्रयोग म्हणजे जेव्हा वनस्पतींना हरितद्रव्याचा खुराक दिला जातो तेव्हा त्या अगदी माणूस किंवा प्राणी यांच्यासारखेच भूल दिल्यासारख्या वागायला लागतात असं बोस यांच्या लक्षात आलं. हा प्रयोग करताना बोसनी एका अतिशय मोठ्या पाईन वृक्षाला हरितद्रव्य पुरवलं आणि नंतर त्या वृक्षाला नीट कापून दुसरीकडे परत एकदा त्याचं रोपण केलं. सर्वसामान्यपणे जेव्हा एखादं झाड मूळापासून जमिनीतून उपटलं जातं तेव्हा त्याला प्रचंड वेदना होतात. एखाद्या गरीब आणि मुक्या माणसाला किंवा जनावराला खूप त्रास दिल्यावर तो ते नाईलाजानं निमूटपणे सहन करतात पण त्यानं होणारा त्रास त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो तसंच कुठल्याही झाडाच्या बाबतीत होत असतं असं संशोधकांनी वारंवार सांगितलेलं आहे. त्यामुळे या पाईन वृक्षाच्या बाबतीतसुद्धा तेच होणार यात बोसना काही शंका नव्हती. पण गंमत म्हणजे हरितद्रव्याचा पोषक खुराक मिळाल्यावर हा वृक्ष आनंदानं त्याच्यावर ताव मारत होता, आणि त्याची मुळं जमिनीतून उपटल्यावरही त्याला त्याची फिकीर नव्हती. आधी म्हटल्याप्रमाणे जणू त्याला बोसनी भूलच दिली होती!
बोस यांनी आपल्या निरीक्षणांविषयी सात शोधनिबंध लिहून ते रॉयल सोसायटीकडे पाठवले. पण काही काळानं बोस यांच्या संशोधनाविषयी विनाकारण संशय निर्माण करणं तसंच त्यांच्या संशोधनाचं श्रेय स्वत:च लाटायचे प्रयत्न करणं असे प्रकार काही जणांनी सुरू केले. त्यामुळे स्वत:ची इच्छा नसूनही बोस यांना आपल्या संशोधनाविषयी एक पुस्तक लिहिणं भाग पडलं. १९०२ साली 'रिस्पॉन्स इन द लिव्हिंग अँड नॉन-लिव्हिंग' या नावानं ते प्रसिद्ध झालं. विज्ञानाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असलेला एक निष्कर्ष बोसनी काढला तो म्हणजे, झाडांना किती प्रमाणात कार्बन डायऑॅक्साईडची गरज असते या संदर्भातलं संशोधन हा होता. झाडांना अमर्याद प्रमाणात कार्बन डायऑॅक्साईड दिला तरी ती चांगलीच राहतात, तसंच एकदम टवटवीत असतात असं तोपर्यंत मानलं जायचं. पण यात तथ्य नसून प्रमाणाबाहेर कार्बन डायऑॅक्साईड मिळाल्यावर झाडं गुदमरून जातात, आणि ज्याप्रमाणे गुदमरलेल्या अवस्थेमधल्या माणसांना आणि प्राण्यांना पूर्ववत स्थितीमध्ये आणण्यासाठी ऑॅक्सिजन पुरवावा लागतो त्याचप्रमाणे अशा अवस्थेतल्या झाडांनाही ऑॅक्सिजन पुरवावा लागतो असं बोसनी दाखवून दिलं.
१९१५ साली बोस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतरही त्यांनी पाच वर्षं प्राध्यापकाचं काम केलं. १९१७ साली त्यांनी बोस रीसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि त्याच वर्षी त्यांना 'सर' पदवी मिळाली. १९३७ साली वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

- अच्युत गोडबोले, अतुल कहाते

(godbolekahate@gmail.com )