संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Friday, November 5, 2010

दिवाळी करु या... 'सुहितमय'


श्रावणापासूननच आपल्या मनात या सणांच्या आगमनाची प्रतिक्षा असते. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा अशा उत्साहाचे वातावरण निर्माण करणार्‍या सणांचे एकामागोमाग आगमन होते. दिवाळीचा सण म्हणजे आनंदाचा सण. दिव्यांच्या रोशणाईला या सणात अनन्यसाधारण महत्त्व असते. जगातील अंधार दूर सारुन सारे काही प्रकाशित करण्यासाठी आकाशदिवे,पणत्या, दिव्यांच्या माळा लावल्या जातात. प्रत्येक घरात प्रकाश निर्माण होऊन सर्वत्र प्रसन्न आणि आनंददायी वातावरणाची निर्मिती होते. हा आनंद निर्माण करण्यामध्ये सुहित जीवन ट्रस्टच्या मतिमंद शाळेचे विद्यार्थ्यांचाही वाटा आहे.


दिवाळीच्या दिवसांमध्ये आत्मविश्वासाने आपल्या मतिमंदत्वावर, कर्णबधिरतेवर मात करुन परिसर प्रकाशमय करण्याचे स्वप्न सुहित जीवन ट्रस्टच्या 'सुमंगल' या शाळेतील विद्यार्थ्यांनी पाहिले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिवाळीच्या विविध वस्तू स्वहस्ताने बनविल्या आहेत. मंत्रालय परिसरातील सोसायटीच्या आवारात या मुलांनी आपल्या वस्तुंचा स्टॉल लावला आहे. यामध्ये आकाश कंदिल, पणत्या, रांगोळी, दिवे यासारख्या विविध वस्तू विक्रीला ठेवल्या आहेत. साधारणपणे २५ रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतच्या वस्तू येथे उपलब्ध आहेत. या मुलांनी मोठय़ा कल्पकतेने या वस्तू तयार केल्याचे प्रकर्षाने जाणवते. या वस्तूंना पाहिल्यावरच निर्मितीचा आनंद आणि त्या मुलांनी घेतलेले परिश्रम जाणवतात.


दीपज्योती हे चिरंतन सर्वात्मक परमेश्वराचे प्रतिक आहे. आणि या प्रतिकाच्या माध्यमातूनच आपल्या जीवनातील अंधारमय बाजू विसरुन ही मुले सर्वत्र प्रकाश पसरवायचे काम करीत आहे. ही शाळा या मुलांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. रायगड जिल्ह्यातील पेण येथे जून २००४ मध्ये ही शाळा सुरु करण्यात आली आहे. या विशेष मुलांना शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वावलंबी व सक्षम बनवून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहे.


या मुलांचा दर्जा वाढावा, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होताना अडचणी येऊ नये तसेच त्यांची बौद्धीक तसेच शारिरीक क्षमता व गरजा ओळखून त्यांना प्रशिक्षित करुन सक्षमही बनविण्यात येत आहे. संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा पाटील या मुलांच्या विकासासाठी सातत्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. गेली चार वर्ष दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुहितच्या विद्यार्थ्यांनी स्वहस्ताने बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येते. गणेशोत्वाच्या काळातही श्रीगणेशाच्या मुर्ती आणि सजावटीचे साहित्य यांची विक्रीही करण्यात येते. या संस्थेतील मुलींना सक्षम करण्यासाठी त्यांना मेहंदी, शिवणकाम, कलाकुसरीच्या कामाबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे ह्या मुली लग्न, साखरपुडा, मुंज इत्यादी कार्यक्रमात मेहंदी काढून अर्थाजन करीत असतात. अशा या मतिमंद मुला-मुलींनी तयार केलेल्या वस्तूंच्या स्टॉलला एकदा भेट देऊन आपण काहीतरी खरेदी करायलाच हवं याची जाणीव झाली आणि दरवर्षी या मुलांनी बनविलेल्याच वस्तू खरेदी करण्याचा संकल्पही केला.


दिपावलीच्या शुभ मुहुर्तावर हे दिवे, पणत्या आकाश कंदील खरेदी करुन एक दिवा या मुलांसाठीही लावूया. या स्टॉलच्या माध्यमातून ही मुले या दिव्यांप्रमाणेच आपले आयुष्यही ज्ञानप्रकाशात उजळविण्याचे आपल्याला आवाहन करीत आहेत. चला तर मग आपणही या ज्ञानप्रकाशाचे एक घटक होऊ या आणि ही दिवाळी 'सुहितमय' करु या !.

- मनिषा पिंगळे