संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Tuesday, October 19, 2010

फिलाडेल्फिया मधील भारतीय मंदिरात रावण दहनाचा कार्यक्रम

फिलाडेल्फिया -

दसऱ्याच्या दिवशी फिलाडेल्फिया मधील भारतीय मंदिरात सायंकाळी रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंदिराच्या कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या महाकाय रावण प्रतिमेचे दहन करण्यात आले.



आपणा सर्वांमध्ये रावणरूपी अहं, क्रोध, मोह, मद, मत्सर असे विविध दुर्गुण वसलेले असतात. आशा दुर्गुणांचे दहन करून नवचैतन्य, प्रेम,सद्भाव, समाधान, परोपकार, समाजसेवा अशा विविध सद्गुगुणांना अंगिकारण्याचे महत्व या निमित्ताने श्री. मुकुंद कुटे यांनी विषद केले.
अबालवृद्धांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला.


भारताबाहेर राहूनही आपल्या सणसंस्कृतीचे जतन करणाऱ्या या कार्यक्रमाची चित्रफित पहा:
http://www.youtube.com/watch?v=AxYkioJQACE&feature=player_embedded


कार्यक्रमाचे फोटो पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:

http://globalmarathi.com/Tiny.aspx?xA1770WC

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती.

'परमेश्वर' संकल्पनेत सर्व धर्म - प्राचार्य शिवाजीराव भोसले (भाग १४)


रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद हे गुरू-शिष्य म्हणून ओळखले जातात. सतत साडेपाच वषेर् चाललेल्या एका विचारसंगराची समाप्ती या अढळ संबंधाच्या निमिर्तीत झाली. रामकृष्णांनी जे अनुभवले ते विवेकानंदांनी अभ्यासले, आत्मसात केले आणि जगाला ते समजावून देण्याचा प्रयत्न केला.




विवेकानंद हे रामकृष्णमय झाले तरी त्यांच्या ठायी असणारा एक बुद्धिवादी वारंवार आक्रमक पवित्रा घेत असे. ते म्हणत : जो विधवांची आसवे पुसू शकत नाही आणि भुकेकंगालाला घासभर अन्न देऊ शकत नाही, अशा देवाची पूजा कशासाठी करावयाची? भयभीत भक्तापेक्षा निर्भय नास्तिक परवडला, जो निर्भय तो निर्मळ राहू शकतो.


सर्वांना असे ठणकावून सांगणारे स्वामीजी रामकृष्णांच्या स्मरणाने अनेकदा व्याकूळ होत. त्यांचा धावा करीत. ''गुरूदेव, मी निघालो आहे. मी येतोच तुमच्याकडे. हे मानसन्मान, ही व्याख्याने आणि मानपत्रे मला नकोत. मला तुमच्या चरणाजवळ येऊन थांबावयाचे आहे. तेच माझे वैकुंठ आहे.''


रामकृष्णांचा सहवास लाभल्यामुळे विवेकानंदांना मनाची शांती लाभली. या सहवासानंतर त्यांनी आपल्याच मनाशी विचार करून रामकृष्णांच्या जीवनाचे सार संक्षेपाने सांगितले ते कांही प्रमेयांच्या स्वरूपात. ती प्रमेयसूत्रे अशी :


' परमेश्वर' या संकल्पनेत सर्व धर्मांचे सार सामावले आहे. त्याच्या अस्तित्वाचा अनुभव हेच जीवनाचे परमप्राप्तव्य आहे. हाच सर्व धर्मांचा अंतिम निष्कर्ष आहे.


जेव्हा हा दिव्य अनुभव येतो, तेव्हा सर्व चर्चा थांबते. सर्व व्याख्याने, भाषणे व प्रवचने शेवटी शून्यवत ठरतात. या संदर्भात रामकृष्ण दोन दाखले देत. मधमाशीचा गुंजारव मध मिळाल्यावर थांबतो. ती फुलझाडावरच्या फुलांपर्यंत व नंतर फुलातील मधापर्यंत जाऊन पोहोचली की तिची गुणगुण संपते... एखादे रिते भांडे किंवा घागर भरत असताना अनेक आवाज ऐकू येतात. भांडे भरताच आवाज थांबतो. साक्षात्कार घडला की, बोलणे ओसरते.


अनेक विद्वान आणि पंडित सतत बोलतात. आकाशात उंचावर पोहोचूनही गिधाडांचे लक्ष सडलेल्या गोष्टीभोवती घोटाळत राहते. त्याप्रमाणे पंडितांचे मन वासनाविश्वात रेंगाळते. रामकृष्णांचे बोलणे हे एका यतीचे उद्गार होते. ''धर्म अनेक असले तरी त्यांचे अनुभवविश्व एकच असते.'' नदीकाठच्या घाटावर पाणी भरणारा कोणी पाण्याला 'जल' म्हणून संबोधील, कोण 'नीर' हे नाव देईल, कोणी त्याला 'वॉटर' म्हणेल. शेवटी पाणी तेच असणार. तसेच शाक्तांचा शिव, वैष्णवांचा विष्णू, वेदान्ती मंडळींचे ब्रह्मा या भिन्न शब्दांनी सूचित होणारे परमतत्त्व मूळात एकच आहे. मुस्लिमांचा अल्ला तोच आहे. त्याची नावे अनेक; पण रूप मात्र एक.


ज्ञान आणि भक्ती यापैकी कोणत्याही मार्गाने चालत राहिले, तरी शेवटी साधक परमतत्त्वाच्या पंढरीला जाऊन पोहोचतो. मूळ तीर्थक्षेत्र एकच. त्याच्याकडे येणारे मार्ग अनेक दिशांनी येतात; पण शेवटी एकमेकांना मिळतात व संपतात.


विवेक, वैराग्य आणि ज्ञान स्वत: संपादन करण्यापेक्षा देवाचा धावा करावा म्हणजे प्रभुकृपेने सगळेच मिळून जाते. मूल खेळात रमते तेव्हा त्याला विसरून आई आपल्या उद्योगात गुंतून पडते. मुलाचे रडणे कानी पडताच काम सोडून त्याला कडेवर घेते व खाऊ देते. देव भक्ताला असेच कडेवर घेतो; पण भक्त हा अजाण अर्भकासारखा धाय मोकलून धावा करणारा असावा लागतो.


देव सगुण व साकार मानावयाचा की निर्गुण निराकार मानावयाचा? रामकृष्ण म्हणतात : ज्वाला हे झाले अग्नीचे सगुण रूप, उष्णता हे झाले निराकार रूप. ईश्वर हा व्यक्तिगत रूपात प्रकट होतो. कधी तो त्या पलीकडे वेगळ्या रूपात राहू शकतो. वळणे घेत धावणारा साप हे झाले त्याचे सगुण रूप, धावताना दिसणारी त्याची वळणे हे त्याचे मावळणारे रूप होय. परमार्थाच्या क्षेत्रात काथ्याकूट करणारे अनेक असतात. पण त्याची गरज आहे का? आमराईत जाताच आंबे घेऊन खाणारा तो शहाणा माणूस! या उलट झाडांची, फांद्यांची व पानांची गणती करीत बसणे म्हणजे शुद्ध वेडेपणा होय. तहानलेल्या जिवाने ओंजळीने पाणी घ्यावे व प्यावे. तळ्यात एकूण पाणी किती याचा विचार करीत बसू नये. व्यर्थ विचाराने काही लाभ घडत नाही. प्रत्येकाने परमेश्वर प्राप्तीला जीवनात अग्रक्रम दिला पाहिजे. तो परमपुरुषार्थ आहे. समाजकार्य हे तुलनेने दुय्यम होय. परमेश्वरप्राप्ती शक्य व्हावी यासाठी दोन प्रकारच्या वासनांपासून मन मुक्त झाले पाहिजे. पहिली ती विषयवासना आणि दुसरी ती दव्य लालसा. कामिनी आणि कांचन यांचे आकर्षण ओसरत नाही तोपर्यंत प्राप्तीची शक्यता नाही.


परमेश्वर या विषयाच्या संदर्भात अनेक समकालीनांची अनेक मते होती. माणूस हा चुकणारा आहे. तो परमेश्वरापासून दूरच राहणार. असा विचार मांडणाऱ्यांना ते सांगत की, माणूस हे परमेश्वराचे अपूर्ण रूप आहे; अंशावतार आहे. जे कोणी भक्तीचे महिमान गात आणि आश्वासन देत की, ''एकदा भक्तिप्रवाहात उतरलात की थेट परमेश्वर नावाच्या समुदाला जाऊन मिळाल.'' रामकृष्ण म्हणत : व्यवहारी माणूस नदीत बुडी मारतो व पुन्हा काठावर येतो. त्याला नदीबरोबर वाहात जाता येत नाही. प्रापंचिकांची रीत अशीच असावी. घरदार सोडून, मुलेबाळे विसरून, पत्नीला डावलून एकदम देवाशी एकरूप होण्याची आकांक्षा त्याने बाळगू नये. संसार हा एक उत्तम किल्ला आहे, मजबूत गड आहे. माणूस या गडात राहून वासनांचे हल्ले परतवू शकतो. संसारी माणसाने प्रपंचाचा निषेध करू नये.


रामकृष्णांची विवेचनसुलभता बुद्धिमंतांनाही प्रभावित करणारी होती. स्वत: रामकृष्ण मूतिर्पूजेत रमणारे, तसेच निर्गुण निराकारात विरून जाणारे होते. त्यामुळे त्यांनी निरक्षरांचा तिरस्कार केला नाही. पांडित्याचा पुरस्कार करतानाही त्यांना संकोच वाटला नाही. रामकृष्णांच्या घरीदारी विद्वान आणि भाबडे, अधिकारी आणि सामान्यजन, महालात राहणारे, अत्तराचे दिवे जाळणारे कोणी असत. अंधारात काळ काढणारे बेघर भक्त पण असत.


रामकृष्णांच्या पुढे कोणी तरी 'लोकसेवा' हा शब्द उच्चारला. रामकृष्णांनी त्यात दुरुस्ती केली. ते म्हणाले, जीवाची शिवभावे सेवा हा खरा धर्म होय. रामकृष्ण संघाने 'सेवा' या व्रताचा समावेश आपल्या आचारसंहितेत केला. जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले। तोची साधू ओळखावा। देव तेथेची जाणावा।। हा तुकारामांचा उद्गार रामकृष्णांच्या मुखी पुन्हा प्रकट झाला. सेवेत उपकाराची ऐट नसावी. उपासनेची भावना असावी. अनेक विदेशी समाजसेवक 'मिशनरी' म्हणून भारतात आले. रामकृष्ण-विवेकानंदांनी तोच भाव ओळखला व स्वीकारला. ''रामकृष्ण मिशन'' ही संस्था ही एक चळवळ झाली आहे. कोलकात्यापासून किल्लारीपर्यंत रामकृष्ण संघाचे सेवाकार्य चालत असते.


या संघाचे कार्यकतेर् हे कर्मरत विद्वान आहेत. अनेक विषयांवर प्रभुत्व असणारे, उदंड ग्रंथकर्तृत्व दाखविणारे हे रामकृष्ण मिशनचे लोक व्रतस्थ व संन्यस्त आहेत.


विवेकानंदांनी जगभर संचार केला, मानमान्यता मिळविली; पण स्वत:ला रामकृष्णांचे सेवक व पाईक म्हणवून घेतले. त्यांना प्रिय असणारा मंत्र होता : '' ॐ नमो भगवते श्री रामकृष्णाय''

( क्रमश:)
- प्राचार्य शिवाजीराव भोसले