संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Monday, October 11, 2010

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती.

श्रीकृष्णासारखा सारथी हो! - शिवाजीराव भोसले (भाग ५)


स्वामी विवेकानंद हे धर्म आणि राष्ट्र यांचे अभिमानी होते. मात्र या अभिमानात अंधत्वाचा भाग नव्हता. शिकागोच्या सर्व धर्म परिषदेत त्यांनी हिंदु धर्माचे स्वरूप विशद केले. पण त्याच वेळी अन्य धर्मांना अभिवादन केले. आपल्या शेवटच्या व्याख्यानात विश्वधर्माची आवश्यकता व श्रेष्ठता या कल्पनेचे विवरण त्यांनी केले.

आज आढळणारे नानाविध धर्म हे एकाच मूलधर्माचे स्थलकालसापेक्ष आविष्कार होत. नाना रंगरूपाच्या माणसांच्या ठायी आढळणारे 'माणूसपण' हे समान असते. अनेक अन्नपदार्थांत एकच जीवनसत्व असू शकते. त्याप्रमाणे सर्व धर्मांना समान असे जे मूलभूत चिंतन आणि आचरण हेच त्यांचे सत्त्व व सार होय. अशा सारभूत धर्माच्या दिशेने आपली पावले पडली पाहिजेत. या धर्माच्या क्षेत्रात विशिष्ट पोथी, ग्रंथ किंवा गुरू यांची गरज उरणार नाही.

we want to lead mankind to the place where there is neither the vedas, nor the Bible, nor the koram (इंग्लिश खंड 6, पृष्ठ 416)


स्वामीजींच्या विचारांची दिशा अशी होती. धर्माभिमानाला धर्मान्धतेची अवकळा येता कामा नये ही त्यांची उत्कट अपेक्षा होती.


ज्याने त्याने स्वधर्मात राहून आपला उत्कर्ष साधावा आणि अन्य धर्मांचा यथोचित गौरव करावा अशा व्यापक भूमिकेवरून स्वामीजींनी अखिल धर्मजीवनाचा वेध घेतला. ते म्हणत: विज्ञानयुगात धर्म हा विज्ञानाशी विसंगत नसावा. जे प्रयोगसिद्ध आणि निविर्वाद असते ते नाकारणे ही मूढताच होय. धर्मयात्रांच्या नावाने जे प्रदर्शन घडते त्यात धर्म कोठेही नसतो.


अशा प्रकारे विचारमंथन करणाऱ्याने सर्व धर्मांचा मनोभावे व आदरपूर्वक अभ्यास करावयास हवा. त्याचे डोळे उघडे व मन जागे हवे. आरोग्याचे नियम डावलून तीर्थस्थानी गढूळ पाण्यात डुंबत राहणे हा धर्म नव्हे. गोरगरिबांनी घाम गाळून मिळविलेला पैसा दक्षिणेच्या नावाखाली लुबाडणे हा पण धर्म नव्हे.


कोणीही उठून कोणाच्याही भजनी लागणे म्हणजे धर्माचरण नव्हे. एखाद्या सुमार व्यक्तीचे देव्हारे माजवून तिच्या दारी दाटी करणे म्हणजे धर्मनिष्ठ असणे नव्हे. हे प्रतिपादन तसे परखड होते. स्वामीजी हे तत्त्वनिष्ठ व तर्कनिष्ठ होते.


एखाद्या विचारसभेत ते आनंदाने सहभागी होत. पण स्वत:चेच महत्त्व वाढविणारे उत्सव साजरे करण्याचा मोह त्यांना कधी पडला नाही. कोणीही आपला किती वेळ घालवावा आणि इतरांचा किती वेळ घ्यावा याचे भान हरपणे ही धर्मक्षेत्रातली एक विकृती मानावी लागेल. विकृती हा शब्द आरोग्याचा अभाव सूचित करतो.


ज्ञानसंपादन, योगसाधन, समाजसेवा ही परस्परपूरक असावीत. त्यात विरोध नसावा. पूवीर् ऋषी आणि मुनी रानावनांत राहत. शेती करीत. गोधन सांभाळत. गोपालन करणारा कृष्ण रथारूढ होऊन तत्त्वविवेचन करू शकतो हे संस्कृतीचे चित्र स्वामीजीना आवडत असे. आपल्या बालपणी श्रीकृष्णाचे चित्र पाहून आपणही रथारूढ होऊन जीवनाच्या कुरुक्षेत्रात नवी गीता सांगावी असे त्यांना वाटे.


विवेकानंदांच्या घरी एक घोडागाडी होती. जेव्हा मोटारी नव्हत्या तेव्हा धनिकांच्या दारी असे अश्वरथ दिसत. या रथांना एखादा चालक असे. तो रुबाबदार दिसे. त्याचे हे ध्यान बालविवेकानंदांना तेव्हा आवडे. ते आपल्या बालमित्रांना म्हणत : मी मोठेपणी असाच डौलात घोडागाडी हाकणार. वडिलांनी मुलाची ही आकांक्षा पाहून तिला दिशा दिली. ते म्हणाले : ''सारथीच होणार असशील तर श्रीकृष्णासारखा हो. आणि जगाला तूही एक गीता सांग''

विवेकानंद मनाशी गुणगुणत : आपणही श्रीकृष्ण व्हावयाचे जगाला नवी गीता सांगावयाची.


शिकागोचे व्यासपीठ हे त्यांचे कुरुक्षेत्र होणार होते. नियतीचा कुंचला कालपटावर काहीतरी रेखाटत होता. त्यातून प्रकटला विज्ञानयुगातील एक श्रीकृष्ण.


कुठे कलकत्ता? कुठे कन्याकुमारी? कुठे शिकागो?

( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती.

युवकांचा आदर्श - शिवाजीराव भोसले (भाग ४)


स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील काही नाट्यपूर्ण घटनांभोवती अनेकांचे मन घोटाळत रहाते. त्यांच्या विचारांची उत्तुंगता लक्षात घेतली जात नाही. रामकृष्णांचा दिव्य स्पर्श, शिकागोचे ते विख्यात भाषण, भगिनी निवेदिताचे भावसमर्पण अशा अनेक घटनांनी वाचक भारावून जातात. त्यांचे विचारधन हे दुर्लक्षित रहाते. स्वामी विवेकानंदांचे उपलब्ध साहित्य नऊ इंग्लिश खंडांत विस्तारले आहे. अजूनही काही भाग अप्रकाशित आहे.

स्वामी जन्मभर बोलत राहिले. गुडविनसारखे लघुलेखक त्यांचे शब्द झेलत राहिले. एखाद्या वॉल्डो बाई हाती पेन घेऊन त्यांया पायाशी बसल्या. स्वत: विवेकानंदांनी हाती लेखणी घेऊन लिहिली ती फक्त पत्रे. उरले-सुरले त्यांचे विचारधन कागदावर उमटले ते त्यांच्या शिष्यांमुळे.


स्वामी रंगनाथानंद हे त्यांच्या जीवनाचे भाष्यकार जगभर फिरले. वयाची 94 वषेर् पुरी करून नुकतेच कालवश झाले. त्यांचे अमोघ इंग्लिश वक्तृत्व पाहून थक्क झालेले श्रोते त्यांना विचारत : स्वामी हे भाषाप्रभुत्व, विचारप्रभुत्व कसे आणि कधी संपादन केले? यावर स्वामी रंगनाथजी म्हणत: ''मी कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर नाही. मात्र मी विवेकानंद साहित्य सुमारे साठ वेळा वाचून काढले आहे. या पारायणाने मला हे प्रभुत्व दिले.'' स्वत: स्वामीजी केवळ एक पदवीधर होते. तरीही त्यांनी जग जिंकले. ते कसे? ते आजन्म व्रतस्थ राहिले. ब्रिटानिका ज्ञानकोशाचे दहा खंड त्यांनी वाचले होते. ते सर्व त्यांच्या लक्षात होते. जगातील अनेक अक्षर साहित्यकृती त्यांनी आत्मसात केल्या होत्या.


समर्थ रामदास म्हणत : ''अभ्यासे प्रकट व्हावे। नाहीतर झाकोनी असावे। प्रकट होऊनी नासावे। हे बरे नव्हे।।'' तुकाराम महाराज हेच सांगून गेले : ''असाध्य ते साध्य करिता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे।।''


एका जागेवर सलगपणे, सहजपणे व सुखाने किमान तीन तास स्थिर राहिल्याशिवाय आसनसिद्धी प्राप्त होत नाही, असे पतजलींसारखे योगाचे अभ्यासक सांगतात.


स्वामी विवेकानंदांना ही बैठक साध्य झाली होती. एक परिभ्रमणशील परिव्राजक हा त्यांचा लौकीक होता. पण जेथे ते जातील, रहातील, असतील त्या जागी स्वामी लगोलग आसनस्थ होऊन वाचन, मनन, चिंतन, ध्यानधारणा या प्रक्रियांचा आश्रय घेत.


शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेतील ज्या पहिल्याच भाषणाने ते विश्वविख्यात झाले ते भाषण साडेचार मिनिटांचे व सुमारे पाचशे शब्दांचे आहे. या शब्दशक्तीला काय म्हणावे? ती आली कोठून? या प्रश्ानंचा मागोवा घेणारांना अंतर्मुख व्हावे लागेल.


स्वामीजी राजकारणापासून निग्रहपूर्वक दूर राहिले. राजकारणात शब्दांची फिरवाफिरव व भूमिकांची धरसोड फार घडते. स्वामीजींच्या वृत्तीत किंवा प्रकृतीत राजकारण मुळातच नव्हते. मात्र त्यांचे देशप्रेम निष्कलंक होते. ते म्हणत : ''दि सॉइल ऑफ इंडिया इज दि हायस्ट हेव्हन टु मी.'' भारताची धरती, रेती व माती मला स्वर्गासमान वाटते.


त्यांच्या लेखी भारत ही पुण्यभूमी होती. जीवन ही एक अनुभवयात्रा होती.


सुभाषचंद बोस म्हणत : आज स्वामीजी असते तर मी त्यांच्या पायाजवळ थांबलो असतो. विवेकानंद हे सुभाषचंदांचे दैवत होते.


विवेकानंद परदेशातून परत आल्यावर, एकदा काँग्रेस अधिवेशनासाठी कलकत्ता येथे गेलेले लोकमान्य टिळक बेलूर मठात जाऊन त्यांना मुद्दाम भेटले. महात्मा गांधींनी भेटीचा प्रयत्न केला; पण स्वामीजी आजारी असल्यामुळे त्यांची भेट घडू शकली नाही. बंगालमधले अनेक क्रांतिकारक त्यांचा 'राजयोग' एकाग्रतापूर्वक वाचत. तुरुंगात अडकून पडलेल्या देशभक्तांना विवेकानंदांचा मोठा आधार वाटे. रवींदनाथ टागोर मोठ्या भक्तिभावाने विवेकानंद चरित्राचे चिंतन करीत.


1963 साली देशभर विवेकानंदांची जन्मशताब्दी साजरी झाली. नंतर थोड्याच दिवसांनी कन्याकुमारी येथे स्वामीजींचे भव्य स्मारक उभे करण्यात आले. त्याच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान उपस्थित राहिले. प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी कन्याकुमारीच्या परिसरात दाखल झाले.

विवेकानंद राजकारणापासून दूर राहिले खरे; पण सर्व राजकारणी लोकांना ते वंदनीय वाटले. राजकारणी लोकांनी ज्याच्यापुढे नतमस्तक व्हावे असा परमविरक्त तपस्वी हा युवकांचा आदर्श ठरावा असे राजीव गांधी म्हणाले होते.


गढूळ राजकारणाला ज्यांच्या नामोच्चाराने निर्मळपणा प्राप्त व्हावा असे विवेकानंद स्वत: आजन्म राजकारणापासून दूर राहिले. विवेकानंदांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवादिन म्हणून पाळावा, या निष्कर्षाप्रत शासनही येऊन पोहोचले.

( क्रमश:)


- प्राचार्य शिवाजीराव भोसले

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती.

जीवनदर्शन घडवा! - शिवाजीराव भोसले (भाग ३)


जगातील सर्व मोठी माणसे कधी तरी लहान असतातच. 'लहानपण देगा देवा' अशी प्रार्थना करण्याचा मोह संतांनाही पडत असे.विवेकानंद पोरवयात स्वप्नरंजनात रमत. हा स्वप्नांचा फुलोरा मोहक होता. दोन परस्परविरोधी आकांक्षा रम्य कल्पनांच्या रूपात आलटून पालटून त्यांच्या डोळ्यांपुढे उभ्या राहत. त्यांच्या मनोराज्यात आपला अंमल गाजवीत आणि मग आपोआप धुक्याप्रमाणे धूसर होत व शेवटी मन निरभ्र होऊन स्वामी निवांतपणे झोपी जात.

एका कल्पनाचित्रात त्यांना उदंड ऐश्वर्याचे दर्शन घडे. आपण सत्ता व संपत्ती यांच्या बळावर सर्व प्रकारचा आनंद अनुभवत आहोत असे भासत असे. या दृश्यात ते कधी भान हरपून जात. याउलट काही क्षण असे येत की, त्यांना आपले विरक्त व सन्यस्त जीवन दिसे. हाती दंड, कमंडलू व नित्य तरुतलवास असा आभास होत असे. विशेष म्हणजे यामधले एक स्वप्न पुढे विरून गेले. न सरता मागे उरले ते विरक्त जीवनदर्शन. तेच त्यांचे जीवनसार ठरले.


या विरक्त जीवनात दोन प्रेरणा प्रबल आणि प्रभावी होत गेल्या. उदंड ज्ञनसंपादन आणि साक्षात ईश्वरदर्शन या त्यांच्या आकांक्षा मनात मूळ धरून वाढत, विस्तारत गेल्या. विवेकानंदांची अभ्यासाची एक बैठक होती. त्याचप्रमाणे ध्यानाची एक जागा होती. अभ्यासाच्या खोलीत ग्रंथाच्या राशी दिसत. जवळच एखादा तंबोरा असे. ध्यानाचा कोपरा निवांत असे. विवेकानंदांनी भारतीय शास्त्रीय संगीताची संथा घेऊन उस्तादांच्या दारी धरणे धरले होते. त्यांचे गीतगायन हे अनेकांच्या जीवनातले एक आकर्षण होते. त्यांची व्यासंगाची एक अढळ बैठक होती. अवघड वाटणारी युक्लीडची भूमिती त्यांनी एकलव्याच्या एकाग्रतेने एकाच सलग बैठकीत आत्मसात केली. त्यांना ध्यानाचा छंद होता. कोणत्याही क्षणी ते डोळे मिटून ध्यानस्थ होत. काही वेळा डोळे उघडे राहत व समोर काही दिसू लागले. पोरवयात त्यांना भगवान बुद्धांचे दर्शन घडले होते. ध्यानस्थ असताना समोरच्या भिंतीतून एक तेजस्वी सन्यस्त एकदम प्रकटल्यासारखे दिसले. स्वामींशी काही हितगूज करण्याचा भाव या सन्यस्ताच्या मुदेवर होता. पोरवयाचे स्वामी भयचकित होऊन खोलीबाहेर पडले. क्षणभर त्यांना वाटले की हे भगवान बुद्ध असावेत. स्वामी परत ध्यानाच्या जागी आले. तेव्हा बुद्ध अंतर्धान पावले होते.


त्यांना वारंवार असे अनुभव येत. पण स्वामी त्यांच्या आहारी जात नसत. त्यांना अढळ सत्य हवे होते. एखाद्या निसरत्या अनुभवाने वेडावून जाणे त्यांच्या वृत्तीत नव्हते. वैज्ञानिकाची जिज्ञासा आणि साशंकता त्यांच्या वृत्तीत होती. देव त्यांना हवा होता. पण त्याच्या अस्तित्वाचा निविर्वाद प्रत्यय येत नव्हता. कोलकात्यात अभ्यासमंडळे होती. ब्राह्मासमाजासारख्या संस्था होत्या. केशवचंद सेनांसारखे समाजधुरीण होते; पण निविर्वाद व निरभ्र जीवनदर्शन घडवू शकणारे कोणी अधिकारी भेटत नव्हते. वय वाढत गेले. वाचन वेगाने घडू लागले. मनात कल्पनांचे कल्लोळ माजू लागले. जीवन नावाचे काव्य ओळी-ओळीने नजरेसमोरून सरकू लागले; पण त्याचा पुरता अर्थबोध घडेना. 'कोणाच्या आधारे करू मी विचार


कोण देईल धीर माझ्या जीवा''


ही तुकाराम महाराजांची अवस्था विवेकानंदांच्या वाट्याला आली.


या अवस्थेत असताना त्यांना रामकृष्ण परमहंस भेटले. त्यांचे सहज दर्शन घडले. पुढे त्यांचा अनुग्रह आणि कृपाप्रसाद लाभणार होता. काळ आपला आराखडा तयार करीत होता.


या जगात विवेकानंद जन्माला यावेत; त्यांना रामकृष्ण परमहंस भेटावेत, या अतूट संबंधातून एक अद्भुतरम्य नाते निर्माण व्हावे हे एक नवल नव्हे काय? त्या दोघांत दोन ध्रुवांचे अंतर होतं. विवेकानंद सुदृढ बांध्याचे होते. रामकृष्ण फाटक्या अंगाचे होते. रामकृष्णांचे शिक्षण सुरुवातीजवळच संपले होते. बंगाली मूळाक्षरांपलीकडे त्यांची पावले पडली नाहीत.


शाळेत जाऊन देवाची भेट होईल का? ती होणार नसेल तर नकोच ती शाळा असे त्यांना वाटे. या उलट त्यांच्या जन्मगावी असणारी एक धर्मशाळा त्यांना फार आवडे. तीर्थयात्रेला निघालेले अनेक पारमाथिर्क व यात्रिक तेथे थांबत. रामकृष्णांचा चिमणा जीव त्यांच्या आसपास घोटाळत असे. त्यांच्या सेवेत रमत असे. आरती करत असे. गाणी म्हणत असे. देवादिकांची नाटके बसवून साधुसंतांना व गावातील भाविकांना रिझवीत असे. त्याला अधूनमधून भास होत असत. त्या भासात देव दिसे.


हा मुलगा आपल्या साधनेच्या बळावर रामकृष्ण परमहंस झाला. त्याला पुढे उपदेशाचा पान्हा फुटला. जे आपण पाहिले, जाणले, अनुभवले ते कोणाला तरी सांगावे असे त्याला उत्कटतेने वाटू लागले; पण सांगणार कोणाला? लोकांना मनोरंजन हवे होते. आर्त निवारण हवे होते. त्यांना जीवनदर्शन नको होते. लोक सुखापायी वेडे होतात. रामकृष्ण देवापायी वेडे झाले होते. आपल्या या वेळात त्यांना कोणीतरी वाटेकरी हवा होता. उत्तम भक्तिगीते म्हणणाऱ्या त्या नरेंदात त्यांना या वेडाची लक्षणे दिसली.


या वेड्यापायी ते स्वत:च वेडे झाले. वारंवार म्हणू लागले : तू दक्षिणेश्वरी येत रहा. मला संसारी माणसांची बोलणी ऐकून वीट आला आहे. तुझी नजर देवाकडे आहे. तू माझ्या नजरेसमोर रहा.

( क्रमश:)


- प्राचार्य शिवाजीराव भोसले

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती.

पूर्ततेचा क्षण - प्राचार्य शिवाजीराव भोसले ( भाग २ )


विवेकानंदांची विचारमग्नता वयाबरोबर वाढत राहिली. तिला अंतर्मुखतेचे एक अस्तर होते. या अंतर्मुखतेला ध्यानाचे रूप प्राप्त होऊ लागले. तल्लीन होता होता विवेकानंद आत्मलीन होऊ लागले. त्यांना अंतरीची एक वेगळी वाट सापडली. आत्म्याकडून परमात्म्याकडे जाण्याची आकांक्षा जागी झाली. या प्रवासात देव हा ध्रुवतारा झाला. तो तसा अंधुक होता; पण त्याचे विलक्षण आकर्षण वाटू लागले. भली भली माणसे देवाच्या सख्यत्वासाठी जिवलगांच्या ताटातुटी पत्करतात असे त्यांनी वाचले, ऐकले होते.

वाचन हा त्यांचा एक विसावा होता. तसे ते ग्रंथवेडे होते. अखंड ग्रंथसंवाद हा त्यांचा मनोधर्म वयाबरोबर वाढत राहिला. त्यांनी पोरवयात काय काय वाचावे? जॉन स्टुअर्ट मिल, स्पेन्सर, कांट, हेगेल, फ्रेंच राज्यक्रांतीवरचे ग्रंथ, होली आणि वर्डस्वर्थ यांची कविता! गहनगंभीर ग्रंथ आवडीने वाचणारा एक विद्याथीर् अशी प्रसिद्धी त्यांना मिळाली होती. हर्बार्ट स्पेन्सर या तत्वज्ञाशी त्यांनी पत्रव्यवहार केला. त्यांची धडाडी व धिटाई मोठी होती.


पोरवयात ते ब्राह्मा समाजाकडे आकषिर्त झाले. दगडामधला देव त्यांनी नाकारला. गुरू हा शब्द पुसून टाकला. केशवचंद सेनांची भाषणे ऐकली. देवेन्दनाथ टागोरांची भेट घेतली. या बुद्धिनिष्ठ चळवळीचे मूळ देशाच्या संस्कृतीत नव्हते. विवेकानंदांना भाबडेपण पसंत नव्हते. अंधश्रद्धेचे पंगुत्व त्यांना नको होते.


मात्र एक गोष्ट त्यांना उपजत बुद्धीने आवडत असे. ती म्हणजे आचारविचारांची शुचिर्भूतता! आपल्या जीवनाला कोठेही मलीनतेचा स्पर्श त्यांनी घडू दिला नाही. या निष्कलंक जीवनपद्धतीमुळे त्यांची काही सामथ्येर् वाढीस लागली. चित्ताची एकाग्रता, स्मरणशक्तीची प्रखरता, उदंड, उत्साह, नि:स्पृहता, निर्भयता हे स्वभावगुण वाढीस लागले. ब्रह्माचर्य जणू जन्मोजन्मी त्यांना सोबत करीत होते.


या काळात जावयाच्या शोधार्थ असणारे, स्वरूपसंपन्न मुलींचे सधन पालक मोठमोठाली प्रलोभने दाखवून आणि आश्वासने देऊन विवेकानंदांना विवाहप्रवृत्त करू पाहत. या बाबतीत विवेकानंद अविचल होते. वडिलांच्या आर्जवानेही ते विरघळले नाहीत. हा पोलादी स्वभाव जन्मभर टिकून राहिला. व्रतस्थ जीवनाचे आकर्षण हा त्यांचा उपजत गुण होता.


ब्रह्माचर्य पालनाचे महिमान त्यांना मान्य होते. त्यांची प्रखर आकलनशक्ती व अढळ स्मरणशक्ती हे व्रतस्थ जीवनाचे परिणाम होते. या आदर्श जीवनाचे एक प्राप्तव्य होते. त्यांना देवाचे दर्शन हवे होते. देवाचे अस्तित्व हे एक पारमाथिर्क सत्य असेल तर याची देही ते अनुभवले पाहिजे, असा ध्यास त्यांच्या मनाने घेतला; पण हे घडणार कसे? एकदा त्यांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य हेस्टी हे विवेकानंदाच्या वर्गावर गेले. एक प्राध्यापक रजेवर गेले होते. त्यांचा तास आपण घ्यावा व विद्यार्थ्यांशी संवाद साधावा असे प्राचार्य हेस्टी यांना वाटले. इंग्लिश या विषयात रमणारे व रंगणारे प्राचार्य वर्डस्वर्थच्या निसर्गकाव्याकडे वळले. 'एक्सर्शन' या नावाची कविता ते वर्गाला समजावून देऊ लागले. कवीला लागणारी भावसमाधी ही एक अद्भुतरम्य अवस्था असल्याचे त्यांनी विशद केले. 'या प्रकारची भावसमाधी जो वारंवार अनुभवतो, असा एक महापुरुष मी दक्षिणेश्वरला पाहिला आहे. तुम्ही त्याला भेटू शकता, पाहू शकता.' असे त्यांनी विद्यार्थ्यांना सुचविले. विवेकानंदाना या अनुभवसिद्ध पुरुषाच्या दर्शनाची ओढ लागली.


कोण हे रामकृष्ण? कालीचे एक उपासक व श्रेष्ठ साधक! स्वत: देव पहाणारे व इतरांना तो दाखवू शकणारे एक अधिकारी पारमाथिर्क! विवेकानंदांचा चुलतभाऊ रामचंद दत्त हा रामकृष्णांचा भक्त होता. त्याने विवेकानंदांना अनेकदा आणि आग्रहपूर्वक सुचविले होते की, लग्न करणार नाहीस म्हणतोस. तुला काही भव्यदिव्य करायला हवे. मग उगाच अंधारात ठेचाळत राहू नकोस. देव प्रत्यक्ष पहाणारा व इतरांना त्याचे दर्शन घडवू शकणारा तो दक्षिणेश्वरचा महापुरुष जवळून पाहा. त्याचा अनुग्रह संपादन कर. त्या कल्पवृक्षाच्या छायेत काही काळ काढ. तुला देव भेटेल.


रामकृष्ण परमहंसांची थोरवी अनेकांनी अनुभवली होती. विवेकानंदांना त्यांच्याविषयी कुतूहल वाटू लागले होते. योगायोगाने त्याच्या पूर्ततेचा क्षण सहज चालून आला. सुरेंदनाथ मित्र नावाच्या एका निकटवतीर् मित्राकडे एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. तसा तो एक धर्मसोहळा होता. या पवित्र प्रसंगी रामकृष्ण परमहंसांना प्रार्थनापूर्वक पाचारण करण्यात आले होते. या सोहळ्यात नरेंदाचे गीतगायन हा एक सुखद कार्यक्रम होता. नरेंदचे भावभक्तीगीत ऐकताना रामकृष्ण तल्लीन झाले. त्यांना गाणे आवडले. गायक पण आवडला. त्यांनी नरेंदाची उत्कटतेने विचारपूस केली. 'तू एकदा दक्षिणेश्वरी ये' असे मोठ्या मायेने म्हटले. त्या गाण्याने रामकृष्णाचे मन मोहरून आले. गाण्यापेक्षा गायकाने त्यांना वेडे केले. त्या देवगुणी गायकास त्यांनी फिरफिरून ऐकवले 'तू माझ्याकडे दक्षिणेश्वरी मुद्दाम ये, न चुकता ये, लवकरात लवकर ये.'

प्राचार्य हेस्टी यांनी ज्याच्या श्रेष्ठत्वाची ग्वाही दिली तो महापुरुष आपणास बोलावणे करतो आहे, हे नवल नव्हे काय? यालाच का म्हणतात देवाची कृपा?

( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती.

एक ध्यास विवंचनेचा! - प्राचार्य शिवाजीराव भोसले (भाग १)


स्वामी विवेकानंद हा एक विचार होता, आचार होता, उच्चार होता. त्यांच्या जीवनाला ज्ञानाची व ध्यानाची बैठक होती. धर्म आणि ग्रंथ यांच्या आधाराने या सर्वापलीकडे असणारे जीवनाचे विराट आणि उदात्त रूप आपण शोधावे व मानवकुलाचा प्रवास त्या दिशेने घडावा अशी अपेक्षा आणि आकांक्षा बाळगून पावले टाकणारे एक कर्मयोगी, भक्तियोगी, ज्ञानयोगी म्हणजे विवेकानंद!



लौकिक अर्थाने स्वामीजी केवळ एक पदवीधर होते. कलकत्ता विद्यापीठाचे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले ते त्या काळचे एक विद्याथीर् होते. पुढे ते व्यासंगपुरुष म्हणून मान्यता पावले. त्यांचे आगळेपण असे की, त्यांना एक पुस्तक कधीही दोनदा वाचावे लागले नाही. ब्रिटानिकाचा ज्ञानकोश त्यांच्याही काळी होता. त्याचे दहा खंड त्यांनी सहज स्मृतिगत केले होते. गणित, शास्त्र, साहित्य अशा सर्व शाखांत त्यांच्या विचारांची गती विलक्षण होती.

' जीवन' हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. जगात देव आहे का? तो कोणी पाहिला आहे का? मला तो कोणी दाखवू शकेल का? पुस्तकी पांडित्यापलीकडचा परतत्य स्पर्श कोणी अनुभवला आहे का? ही प्रश्नावली समोर ठेवून त्यांनी दशदिशांचा धांडोळा घेतला. कोडे माझे कुणी उकलील का? असे साकडे ते सर्वांना घालत. जीवनाचा बोध घडावा म्हणून त्यांनी विरक्ताचे उपाधीमुक्त जीवन स्वीकारले. त्यांचे वडील आणि आजोबा कायदेपंडित होते. स्वामींना तेवढी मजल मारून कलकत्याला हायकोर्टात उभे राहता आले असते. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, असामान्य वक्तृत्व, लोकविलक्षण भाषाप्रभुत्व अशी गुणसंपदा लाभलेला हा युवक अनेकांच्या नजरेत भरला. एक 'स्थळ' म्हणून त्यांच्याकडे पाहणारा धनिक पित्यांचा एक वर्ग तेव्हा कलकत्त्यात होता.

पण विवेकानंदांच्या नजरेपुढे एकच स्थळ होते. त्याचे नाव जीवन! या जीवनाचा कोणी निर्माता आहे का? तो असेल तर त्याचे दर्शन घडेल का? ज्याने देव पाहिला असा कोणी देवमाणूस जगात असेल का? पण माणसाने मुद्दाम पहावा असा देव तरी या जगात असेल का? घराघरात देव्हारा असतो; पण देव कोठेच नसतो. तरी पूजापाठ चालूच राहतात. यालाच जगरहाटी म्हणतात. हे असेच चालणार का? याचि देही, याचि डोळा मला हे जाणावयाचे आहे; पण माझ्याही अगोदर ज्यांनी हे पाहिले, अनुभवले असे कोणी महाभाग भेटतील काय? ही स्वामींची विवंचना होती.

अनेक समकालीनांना, थोरामोठ्यांना हा नरेंदनाथ विश्वनाथ दत्त नावाचा युवक भेटत होता. त्यांच्याशी संवाद, संभाषण करीत होता. देवेंदनाथ टागोर, केशवचंद सेन अशा समकालीन सत्पुरुषांना, विचारवंतांना तो भेटत होता.

या युवकाची ही जिज्ञासा अनेकांना एक प्रकारची व्यवहारशून्यता वाटत होती. या मुलाचे ज्यांना कौतुक वाटे, ते एवढेच म्हणत : 'या प्रश्नांना निर्णायक उत्तरे नाहीत. उगाच वेळ वाया घालवू नकोस.'


विवेकानंद आग्रही होते, निश्चयी होते. 'याचि देही, याचि डोळा' त्यांना हे जाणून घ्यावयाचे होते. त्यांच्या जीवनप्रश्नावलीत महत्त्वाचा प्रश्न होता : देव आहे का? तो असेल तर कोणी तो प्रत्यक्ष पाहिला आहे का? मला तो दिसेल का? निदान कोणी तो दाखवू शकेल का? देवाचा धावा करणारे अनेकजण असतात; पण ते संभ्रमाच्या आवर्तात सापडतात. शेवटी तुकारामासारखा संतही म्हणतो : 'मज हा संदेह झाला दोही सवा। भजन करू देवा अथवा नको' विचारी मनावर येणारे अभ्र कसेही असले तरी त्यामुळे आसमंत अंधारून येते. आत्म्याची काळोखी रात्र ती हीच! विवेकानंदांच्या वाट्याला ती आली होती. या रात्रीच्या काळोखातून प्रकाशाच्या दिशेने हा साधक पावले टाकत होता. त्याची प्रार्थना होती : ''तमसो मा ज्योतिर्गमय।''

सुखासुखी ओढवून घेतलेले हे दु:ख होते. त्यात दुदैर्वाचा भाग नव्हता. आपल्याच स्वभावगुणांचा तो परिणाम होता. ज्या वयात मुलांनी खावे, प्यावे, ल्यावे, नाचावे, बागडावे, गमतीजमती कराव्या त्या वयात असे कशाचे तरी डोहाळे लागावे हा एक विनोद होता.


' शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ यांच्या मनाला लागणारी विवंचना हा त्यांच्या मोठेपणाला फुटलेला पाझर असतो. सुमार माणसे सुखी असतात. खुळे लोक खळखळून हसतात.


ऐहिक सुखाची तृष्णा नसणे, अधिक विचारापायी मानसिक यातना अनुभवणे व या यातनांच्या शरपंजरी पडून एखाद्या ध्यासापायी श्वास सोडणे हा ज्यांच्या पत्रिकेतील योग असतो तेच पुढे ज्ञानयोगी ठरतात. त्यांच्या साधनेच्या प्रकाशात जनसामान्यांची पावले जीवन मार्गावरून पडत राहतात.

- प्राचार्य शिवाजीराव भोसले

लिट्टेच्या म्होरक्याचा पुण्यात वावर; तरुणांसमोर भाषण ठोकले, स्फोटक 'सीडी'ही दाखविली

लिट्टेच्या म्होरक्याचा पुण्यात वावर; तरुणांसमोर भाषण ठोकले, स्फोटक 'सीडी'ही दाखविली


(11-10-2010 : 11:58:30)



(ताजेश काळे)

पुणे, दि. ९ : श्रीलंकेतील 'लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम' (लिट्टे) तमीळींच्या स्वतंत्र देशासाठी लढणाऱ्या संघटनेचा श्रीलंकेत पाडाव झाला असला तरीही ही संघटना पुनुरुज्जीवित करण्याचे काम भूमिगत पद्धतीने सुरू आहे. श्रीलंकेच्या लष्कराबरोबर झालेल्या संघर्षातून वाचलेले अनेक अतिरेकी संघटनेच्या प्रचारासाठी भारताच्या अनेक शहरांमध्ये फिरत आहेत.या मोहिमेचा भाग म्हणून नुकताच मारला गेलेला एलटीटीईचा सर्वेसर्वा व्ही. प्रभाकरनचा जवळचा साथीदार पी. व्यंकटेश हा ऑगस्ट महिन्यात पुणे शहरात येऊन गेल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.


व्यंकटेशने एका कार्यक्रमात सहभागी होऊन 'श्रीलंकेतील तामिळांची स्थिती' या विषयावर भाषण ठोकले. त्याने तरूणांना स्फोटक 'सीडी' दाखविल्याचेह उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.


पुण्यातील डाव्या विचारसरणीच्या एका सामाजिक संघटनेने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सदाशिव पेठेत कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात विविध वक्त्यांनी भाषण करून श्रीलंकेतील तामिळांच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. त्यातील एका खास वक्त्याकडे सर्वांचे लक्ष होते. हा वक्ता म्हणजे, पी. व्यंकटेश होता. कार्यक्रमात तरूणांची संख्या अधिक असल्याने व्यंकटेशने आपला विषय मांडताना सीडीही दाखविली. या सीडीत नेमके काय होते, हे समजू शकले नाही. पुण्याहून व्यंकटेश हा बंगळूरला निघून गेला.


हा कार्यक्रम पार पडल्यानंतर गुप्तचर शाखेला व्यंकटेश येऊन गेल्याची माहिती मिळाली. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली. कर्नाटक पोलिसांनी पुणे पोलिसांशी संफ साधून व्यंकटेशच्या मुक्कामाचा तपशील घेतला. पुण्यातील कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सामाजिक संघटनेच्या अध्यक्षांना बोलावून पोलिसांनी चौकशी केली. व्यंकटेशने दाखविलेली सीडी कुठे आहे, त्यात कुठली स्फोटक माहिती होती, असेही त्यांना विचारण्यात आले. मात्र ही सीडी गायब झाल्याने पोलिसांच्या हाती लागू शकली नाही. गुप्तचर यंत्रणेने या अध्यक्षांचा मोबाईल क्रमांक स्कॅनवर ठेऊन त्यावर कोणाचा संफ होतो, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच, त्यांनी हा क्रमांक बंद केला. त्यामुळे पोलिसांना अद्यापही व्यंकटेशचा ठावठिकाणा सापडला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.






सामाजिक संघटनेच्या अध्यक्षांचा इन्कार


संबंधित सामाजिक संघटनेच्या अध्यक्षांशी संफ साधला असता, त्यांनी 'श्रीलंकेतील तामिळांची स्थिती' या विषयावर दोन महिन्यांपूर्वी कार्यक्रम घेतल्याचे मान्य केले. मात्र लिट्टेचा म्होरक्या पी. व्यंकटेश येऊन गेल्याचा त्यांनी इन्कार केला. कार्यक्रमात चेन्नई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक मणीवंदन सहभागी झाले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

जय हो !!!!!!

भारताकडून पाकचा ७-४ गोलने धुव्वा


(11-10-2010 : 12:07:41)

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू झाल्यापासून प्रथमच प्रेक्षकांनी संपूर्ण भरलेल्या मेजर ध्यानचंद आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियममध्ये भारताने पाकिस्तानचा ७-४ गोलने पराभव करून उपांत्य फेरीत पराभव केल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष करून स्टेडियम डोक्यावर घेतले.सुरुवातीपासूनच आत्मविश्वास व आक्रमक खेळ करणाऱ्या भारतीय संघातील ड्रॅग फ्लिकर संदीप सिगने २ गोल नोंदवून पाक संघाला धक्का दिला. योग्य समन्वय, नियोजनबद्ध रचलेले डाव यामुळे भारतीय खेळाडूंनी हा विजय प्राप्त केला. पूर्वार्धातच भारतीय संघाने ४-२ ने आघाडी घेतली होती. या वेळी संदीप सिगने तिसऱ्या व ११ व्या, शिवेंद्र सिगने १९ व ६० व्या, सरवनजित सिगने २० व्या, दानिश मुज्तबाने ४१ व्या व धरमवीर सिगने ४६ व्या मिनिटाला गोल केले. पाकिस्तानकडून मोहम्मद इमरानने २७ व्या, मोहम्मद रिजवान २९ व ५७ व्या व शकील अब्बासीने ६८ व्या मिमिटाला गोल केले. सामना संपल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी, क्रीडामंत्री एम.एस. गिल, आयोजन समितीचे अध्यक्ष खा. सुरेश कलमाडी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.