संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Monday, October 11, 2010

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती.

श्रीकृष्णासारखा सारथी हो! - शिवाजीराव भोसले (भाग ५)


स्वामी विवेकानंद हे धर्म आणि राष्ट्र यांचे अभिमानी होते. मात्र या अभिमानात अंधत्वाचा भाग नव्हता. शिकागोच्या सर्व धर्म परिषदेत त्यांनी हिंदु धर्माचे स्वरूप विशद केले. पण त्याच वेळी अन्य धर्मांना अभिवादन केले. आपल्या शेवटच्या व्याख्यानात विश्वधर्माची आवश्यकता व श्रेष्ठता या कल्पनेचे विवरण त्यांनी केले.

आज आढळणारे नानाविध धर्म हे एकाच मूलधर्माचे स्थलकालसापेक्ष आविष्कार होत. नाना रंगरूपाच्या माणसांच्या ठायी आढळणारे 'माणूसपण' हे समान असते. अनेक अन्नपदार्थांत एकच जीवनसत्व असू शकते. त्याप्रमाणे सर्व धर्मांना समान असे जे मूलभूत चिंतन आणि आचरण हेच त्यांचे सत्त्व व सार होय. अशा सारभूत धर्माच्या दिशेने आपली पावले पडली पाहिजेत. या धर्माच्या क्षेत्रात विशिष्ट पोथी, ग्रंथ किंवा गुरू यांची गरज उरणार नाही.

we want to lead mankind to the place where there is neither the vedas, nor the Bible, nor the koram (इंग्लिश खंड 6, पृष्ठ 416)


स्वामीजींच्या विचारांची दिशा अशी होती. धर्माभिमानाला धर्मान्धतेची अवकळा येता कामा नये ही त्यांची उत्कट अपेक्षा होती.


ज्याने त्याने स्वधर्मात राहून आपला उत्कर्ष साधावा आणि अन्य धर्मांचा यथोचित गौरव करावा अशा व्यापक भूमिकेवरून स्वामीजींनी अखिल धर्मजीवनाचा वेध घेतला. ते म्हणत: विज्ञानयुगात धर्म हा विज्ञानाशी विसंगत नसावा. जे प्रयोगसिद्ध आणि निविर्वाद असते ते नाकारणे ही मूढताच होय. धर्मयात्रांच्या नावाने जे प्रदर्शन घडते त्यात धर्म कोठेही नसतो.


अशा प्रकारे विचारमंथन करणाऱ्याने सर्व धर्मांचा मनोभावे व आदरपूर्वक अभ्यास करावयास हवा. त्याचे डोळे उघडे व मन जागे हवे. आरोग्याचे नियम डावलून तीर्थस्थानी गढूळ पाण्यात डुंबत राहणे हा धर्म नव्हे. गोरगरिबांनी घाम गाळून मिळविलेला पैसा दक्षिणेच्या नावाखाली लुबाडणे हा पण धर्म नव्हे.


कोणीही उठून कोणाच्याही भजनी लागणे म्हणजे धर्माचरण नव्हे. एखाद्या सुमार व्यक्तीचे देव्हारे माजवून तिच्या दारी दाटी करणे म्हणजे धर्मनिष्ठ असणे नव्हे. हे प्रतिपादन तसे परखड होते. स्वामीजी हे तत्त्वनिष्ठ व तर्कनिष्ठ होते.


एखाद्या विचारसभेत ते आनंदाने सहभागी होत. पण स्वत:चेच महत्त्व वाढविणारे उत्सव साजरे करण्याचा मोह त्यांना कधी पडला नाही. कोणीही आपला किती वेळ घालवावा आणि इतरांचा किती वेळ घ्यावा याचे भान हरपणे ही धर्मक्षेत्रातली एक विकृती मानावी लागेल. विकृती हा शब्द आरोग्याचा अभाव सूचित करतो.


ज्ञानसंपादन, योगसाधन, समाजसेवा ही परस्परपूरक असावीत. त्यात विरोध नसावा. पूवीर् ऋषी आणि मुनी रानावनांत राहत. शेती करीत. गोधन सांभाळत. गोपालन करणारा कृष्ण रथारूढ होऊन तत्त्वविवेचन करू शकतो हे संस्कृतीचे चित्र स्वामीजीना आवडत असे. आपल्या बालपणी श्रीकृष्णाचे चित्र पाहून आपणही रथारूढ होऊन जीवनाच्या कुरुक्षेत्रात नवी गीता सांगावी असे त्यांना वाटे.


विवेकानंदांच्या घरी एक घोडागाडी होती. जेव्हा मोटारी नव्हत्या तेव्हा धनिकांच्या दारी असे अश्वरथ दिसत. या रथांना एखादा चालक असे. तो रुबाबदार दिसे. त्याचे हे ध्यान बालविवेकानंदांना तेव्हा आवडे. ते आपल्या बालमित्रांना म्हणत : मी मोठेपणी असाच डौलात घोडागाडी हाकणार. वडिलांनी मुलाची ही आकांक्षा पाहून तिला दिशा दिली. ते म्हणाले : ''सारथीच होणार असशील तर श्रीकृष्णासारखा हो. आणि जगाला तूही एक गीता सांग''

विवेकानंद मनाशी गुणगुणत : आपणही श्रीकृष्ण व्हावयाचे जगाला नवी गीता सांगावयाची.


शिकागोचे व्यासपीठ हे त्यांचे कुरुक्षेत्र होणार होते. नियतीचा कुंचला कालपटावर काहीतरी रेखाटत होता. त्यातून प्रकटला विज्ञानयुगातील एक श्रीकृष्ण.


कुठे कलकत्ता? कुठे कन्याकुमारी? कुठे शिकागो?

( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले

No comments:

Post a Comment