संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Tuesday, October 12, 2010

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती.

पॅट्रियट मंक - शिवाजीराव भोसले (भाग ६)


 स्वामी विवेकानंद हे मातृभूमी आणि स्वधर्म यांचे अभिमानी होते. पण या अभिमानात अंधत्वाचा किंवा हटवादाचा भाग नव्हता. त्यांचा धर्मविचार व्यापक होता. शिकागो परिषदेत त्यांनी हिंदू धर्माचे महिमान सांगितले हे खरे. पण अन्य धर्मांचेही गुणगान केले व शेवटी विश्वधर्माचे जयगान केले.



धर्म या कल्पनेची व्याप्ती आणि पावित्र्य विशद करताना ते अनेकदा म्हणाले होते की, सर्व मानवजातीला आपल्या छत्रछायेत सामावून घेणारा विश्वधर्म ही जगाची गरज आहे. संकुचित बुद्धीने धर्मांध होणे व्यर्थ आहे.


जगातील सर्व प्रचलीत धर्म हे एकाच नित्य धर्माचे स्थलकालसापेक्ष असे आविष्कार होत.


धर्मग्रंथांच्या आधाराने सर्व धर्मांपलिकडे जाणे व व्यापक अशा भूमिकेवरून जीवनदर्शन घेत राहणे हेच धर्माचे खरे प्रयोजन आहे. याला मोक्ष हे नाव शोभून दिसते.


काशी येथील एका मठाधिपतींनी स्वामीजींना हवी असणारी एका धर्मग्रंथाची प्रत नाकारली. तेव्हा उद्वेगाच्या भरात स्वामीजी त्या अधिपतींना म्हणाले : ''धर्म ही मठाधिपतींची मिरास नव्हे. खरा धर्म सर्वांचा व सर्वांसाठी असतो. धर्मग्रंथ म्हणजे सामाजिक दस्तऐवज होत. अनेक धर्मांध व्यक्तींना हे उमगले नाही. त्यामुळे महात्मा फुले यांना सार्वजनिक सत्यधर्म शोधावा लागला आणि डॉ. आंबेडकरांना धर्मांतराची घोषणा करावी लागली.


विवेकानंदांचा अभ्यास, साधना आणि व्रतस्थ जीवन हे त्यांचे सार्मथ्य होते. त्यांची ज्ञानाची व ध्यानाची बैठक अढळ होती. त्यांची अशी श्रद्धा होती की, प्रत्येक व्यक्तीच्या ठायी असणाऱ्या दिव्यत्वाच्या प्रकटीकरणाचे विविध मार्ग शोधणे हेच प्रत्येक धर्माचे कर्तव्य आहे. धर्माच्या मूलभूत प्रयोजनाचे विस्मरण घडणे व हटातटाने जटा धारण करणाऱ्यांच्या हाती समाजाच्या भवितव्याची सूत्रे जाणे हे धर्मदुदैर्व होय.


स्वामीजी एका व्रतस्थ साधकाचे जीवन जगले. रामकृष्ण सेवा संघाची स्थापना करून त्यांनी उदात्त विचारांना गती देणारी एक यंत्रणा उभी केली.


रामकृष्ण संघ हे विवेकानंदाचे मोठे योगदान होय. कलकत्त्यापासून कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची विवेकानंद केंदे व अनेक जीवनव्रती अविरत कार्यरत आहेत. विवेकानंद हे एक व्यक्तिमत्त्व राहिले नाही. ते एक तेजस्वी जीवनदर्शन झाले आहे.


आपल्या देशयात्रेची समाप्ती त्यांनी कन्याकुमारीच्या त्या विस्तीर्ण शिलाखंडावर केली. तीन दिवस व तीन रात्री एकाकी दशेत त्या जागी स्वामीजी विचारमग्न अवस्थेत बसून राहिले. तेथे यांना एक स्फुरण घडले.


पूवेर्चे धर्मज्ञान आणि पश्चिमेचे विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या सहयोगातून एक आदर्श जग अस्तित्वात यावे. भारताची अध्यात्मविद्या प्रगत राष्ट्रांना समजावून द्यावी. त्यामुळे त्यांच्या जीवनातील व्यग्रता कमी होईल आणि त्याचे मन जीवनमूल्यावर एकाग्र होईल. त्यांनी आपल्या अनिवार आकांक्षांपायी इतरांच्या अस्तित्वाला व अस्मितेला छेद देणारी वृत्ती सोडून द्यावी. भारतात स्त्रियांचा आदर केला जातो. पण स्त्रीत्वाचा विकास घडावा यासाठी एखादी योजना आखली जात नाही. स्वतंत्र संस्था काढल्या जात नाहीत. मंत्र आणि सुभाषिते यांतील पूजनीयता प्रत्यक्षात प्रकट होत नाही.


विवेकानंदांच्या व्याख्यानाने, व्यक्तिमत्त्वाने आणि विशुद्ध आचरणाने प्रभावित झालेल्या प्राचार्या मार्गारेट नोबेल या भगिनी निवेदिता म्हणून भारतीयांशी एकरूप झाल्या. 'पूर्व आणि पश्चिम' यांच्या सहयोगाचे स्वप्न स्वामीनी आपल्या विचारसमाधीत पाहिले. ही समाधी त्यांनी कन्याकुमारी येथे तीन सागरांच्या संगमस्थानावर असणाऱ्या त्या प्रचंड खडकावर अनुभवली. चार एकरांचे क्षेत्रफळ लाभलेला, एखाद्या बेटाप्रमाणे भासणारा व आज विवेकानंद स्मारकाने शोभायमान झालेला तो 'विवेकानंद रॉक' एका जागतिक तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून बसला आहे.


येथे विवेकानंदांना काही स्फुरण घडले. पैशाच्या धर्माच्या, जगाच्या भवितव्याचे दर्शन घडले. त्यांना एक नवी पदवी प्राप्त झाली. 'पॅट्रियट मंक' म्हणून इतिहासाने त्यांच्या नावाची नोंद केली.

( क्रमश:)


- प्राचार्य शिवाजीराव भोसले

No comments:

Post a Comment