संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Monday, October 11, 2010

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती.

पूर्ततेचा क्षण - प्राचार्य शिवाजीराव भोसले ( भाग २ )


विवेकानंदांची विचारमग्नता वयाबरोबर वाढत राहिली. तिला अंतर्मुखतेचे एक अस्तर होते. या अंतर्मुखतेला ध्यानाचे रूप प्राप्त होऊ लागले. तल्लीन होता होता विवेकानंद आत्मलीन होऊ लागले. त्यांना अंतरीची एक वेगळी वाट सापडली. आत्म्याकडून परमात्म्याकडे जाण्याची आकांक्षा जागी झाली. या प्रवासात देव हा ध्रुवतारा झाला. तो तसा अंधुक होता; पण त्याचे विलक्षण आकर्षण वाटू लागले. भली भली माणसे देवाच्या सख्यत्वासाठी जिवलगांच्या ताटातुटी पत्करतात असे त्यांनी वाचले, ऐकले होते.

वाचन हा त्यांचा एक विसावा होता. तसे ते ग्रंथवेडे होते. अखंड ग्रंथसंवाद हा त्यांचा मनोधर्म वयाबरोबर वाढत राहिला. त्यांनी पोरवयात काय काय वाचावे? जॉन स्टुअर्ट मिल, स्पेन्सर, कांट, हेगेल, फ्रेंच राज्यक्रांतीवरचे ग्रंथ, होली आणि वर्डस्वर्थ यांची कविता! गहनगंभीर ग्रंथ आवडीने वाचणारा एक विद्याथीर् अशी प्रसिद्धी त्यांना मिळाली होती. हर्बार्ट स्पेन्सर या तत्वज्ञाशी त्यांनी पत्रव्यवहार केला. त्यांची धडाडी व धिटाई मोठी होती.


पोरवयात ते ब्राह्मा समाजाकडे आकषिर्त झाले. दगडामधला देव त्यांनी नाकारला. गुरू हा शब्द पुसून टाकला. केशवचंद सेनांची भाषणे ऐकली. देवेन्दनाथ टागोरांची भेट घेतली. या बुद्धिनिष्ठ चळवळीचे मूळ देशाच्या संस्कृतीत नव्हते. विवेकानंदांना भाबडेपण पसंत नव्हते. अंधश्रद्धेचे पंगुत्व त्यांना नको होते.


मात्र एक गोष्ट त्यांना उपजत बुद्धीने आवडत असे. ती म्हणजे आचारविचारांची शुचिर्भूतता! आपल्या जीवनाला कोठेही मलीनतेचा स्पर्श त्यांनी घडू दिला नाही. या निष्कलंक जीवनपद्धतीमुळे त्यांची काही सामथ्येर् वाढीस लागली. चित्ताची एकाग्रता, स्मरणशक्तीची प्रखरता, उदंड, उत्साह, नि:स्पृहता, निर्भयता हे स्वभावगुण वाढीस लागले. ब्रह्माचर्य जणू जन्मोजन्मी त्यांना सोबत करीत होते.


या काळात जावयाच्या शोधार्थ असणारे, स्वरूपसंपन्न मुलींचे सधन पालक मोठमोठाली प्रलोभने दाखवून आणि आश्वासने देऊन विवेकानंदांना विवाहप्रवृत्त करू पाहत. या बाबतीत विवेकानंद अविचल होते. वडिलांच्या आर्जवानेही ते विरघळले नाहीत. हा पोलादी स्वभाव जन्मभर टिकून राहिला. व्रतस्थ जीवनाचे आकर्षण हा त्यांचा उपजत गुण होता.


ब्रह्माचर्य पालनाचे महिमान त्यांना मान्य होते. त्यांची प्रखर आकलनशक्ती व अढळ स्मरणशक्ती हे व्रतस्थ जीवनाचे परिणाम होते. या आदर्श जीवनाचे एक प्राप्तव्य होते. त्यांना देवाचे दर्शन हवे होते. देवाचे अस्तित्व हे एक पारमाथिर्क सत्य असेल तर याची देही ते अनुभवले पाहिजे, असा ध्यास त्यांच्या मनाने घेतला; पण हे घडणार कसे? एकदा त्यांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य हेस्टी हे विवेकानंदाच्या वर्गावर गेले. एक प्राध्यापक रजेवर गेले होते. त्यांचा तास आपण घ्यावा व विद्यार्थ्यांशी संवाद साधावा असे प्राचार्य हेस्टी यांना वाटले. इंग्लिश या विषयात रमणारे व रंगणारे प्राचार्य वर्डस्वर्थच्या निसर्गकाव्याकडे वळले. 'एक्सर्शन' या नावाची कविता ते वर्गाला समजावून देऊ लागले. कवीला लागणारी भावसमाधी ही एक अद्भुतरम्य अवस्था असल्याचे त्यांनी विशद केले. 'या प्रकारची भावसमाधी जो वारंवार अनुभवतो, असा एक महापुरुष मी दक्षिणेश्वरला पाहिला आहे. तुम्ही त्याला भेटू शकता, पाहू शकता.' असे त्यांनी विद्यार्थ्यांना सुचविले. विवेकानंदाना या अनुभवसिद्ध पुरुषाच्या दर्शनाची ओढ लागली.


कोण हे रामकृष्ण? कालीचे एक उपासक व श्रेष्ठ साधक! स्वत: देव पहाणारे व इतरांना तो दाखवू शकणारे एक अधिकारी पारमाथिर्क! विवेकानंदांचा चुलतभाऊ रामचंद दत्त हा रामकृष्णांचा भक्त होता. त्याने विवेकानंदांना अनेकदा आणि आग्रहपूर्वक सुचविले होते की, लग्न करणार नाहीस म्हणतोस. तुला काही भव्यदिव्य करायला हवे. मग उगाच अंधारात ठेचाळत राहू नकोस. देव प्रत्यक्ष पहाणारा व इतरांना त्याचे दर्शन घडवू शकणारा तो दक्षिणेश्वरचा महापुरुष जवळून पाहा. त्याचा अनुग्रह संपादन कर. त्या कल्पवृक्षाच्या छायेत काही काळ काढ. तुला देव भेटेल.


रामकृष्ण परमहंसांची थोरवी अनेकांनी अनुभवली होती. विवेकानंदांना त्यांच्याविषयी कुतूहल वाटू लागले होते. योगायोगाने त्याच्या पूर्ततेचा क्षण सहज चालून आला. सुरेंदनाथ मित्र नावाच्या एका निकटवतीर् मित्राकडे एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. तसा तो एक धर्मसोहळा होता. या पवित्र प्रसंगी रामकृष्ण परमहंसांना प्रार्थनापूर्वक पाचारण करण्यात आले होते. या सोहळ्यात नरेंदाचे गीतगायन हा एक सुखद कार्यक्रम होता. नरेंदचे भावभक्तीगीत ऐकताना रामकृष्ण तल्लीन झाले. त्यांना गाणे आवडले. गायक पण आवडला. त्यांनी नरेंदाची उत्कटतेने विचारपूस केली. 'तू एकदा दक्षिणेश्वरी ये' असे मोठ्या मायेने म्हटले. त्या गाण्याने रामकृष्णाचे मन मोहरून आले. गाण्यापेक्षा गायकाने त्यांना वेडे केले. त्या देवगुणी गायकास त्यांनी फिरफिरून ऐकवले 'तू माझ्याकडे दक्षिणेश्वरी मुद्दाम ये, न चुकता ये, लवकरात लवकर ये.'

प्राचार्य हेस्टी यांनी ज्याच्या श्रेष्ठत्वाची ग्वाही दिली तो महापुरुष आपणास बोलावणे करतो आहे, हे नवल नव्हे काय? यालाच का म्हणतात देवाची कृपा?

( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले

No comments:

Post a Comment