संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Tuesday, October 12, 2010

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती.

खरा धर्म - प्राचार्य शिवाजीराव भोसले ( भाग १२ )


जगाच्या इतिहासात अनेक शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, देशभक्त, समाजसुधारक झाले. अनेक मुत्सद्दी व राजकारणी झाले व होतील. पण 'विवेकी संन्यासांचे आणि विश्वधर्माच्या उपासकांचे असे घराणे कोठे आढळणार नाही. सत्तेच्या राजकारणापासून कटाक्षाने दूर राहणे, जात, प्रांत, पक्ष, धर्म या अभिनिवेशांपासून मन मुक्त ठेवणे, ध्यानधारणा व समाजसेवा यांचा समन्वय साधणे, व्यक्तिगत संसार ही कल्पना मनावेगळी करणे, निर्मळ चरित्र व निष्कलंक ब्रह्माचर्य ही दैवी गुणसंपदा जपणे, स्त्रियांचे संघ, मठ व कार्यपद्धती स्वतंत्रपणे सांभाळणे, सूर्यास्तानंतर स्त्रियांच्या साधनेत व कार्यात व्यत्यय न आणणे अशा काही व्रतांचे पालन हे साधक करतात. सिनेमा, नाटक, टी.व्ही. याऐवजी ध्यान आणि उपासना यांचा अवलंब करतात. रात्रीचे भोजन किंवा पाटीर् हा प्रकार कोठे अनुसरला जात नाही. खेड्यापाड्यातून, गिरीकंदरातून औषधोपचाराची जमेल तेवढी सोय केली जाते. कोयना व किल्लारी भागांत घडलेल्या भूकंपाच्या वेळी रामकृष्ण संघाचे साधू सार्वजनिक संस्था आणि कार्यकतेर् यांच्याबरोबर कार्यरत राहिले. स्वामीजी एकदा म्हणाले होते : या देशात एक कुत्रा उपाशी आहे, तोपर्यंत आमचे सेवाकार्य चालतच राहणार. आमचा धर्म सेवापरायण आहे. ज्ञान, ध्यान व समाजसेवा यात कसलाही विरोध संभवू शकत नाही. व्यक्ती आणि समाज यांची उन्नती आणि उत्कर्ष, त्यांचे स्वास्थ्य व आरोग्य यांचा विचार सोडून मिटल्या डोळ्यांनी ध्यान करणे हा धर्म नव्हे. मठाधिपतींची मिरास व मंदिरातील आरास हा पोकळ डौल आहे. तो धर्मदोह आहे.

विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व संपन्न होते. त्याला अनेक पैलू होते. त्यांच्या प्रतिक्रिया संदर्भसापेक्ष होत्या. ते स्वत: घडले, वाढले त्यामागे अनेक शक्ती होत्या. त्यातल्या काही अंगभूत होत्या. काही आनुवंशिक होत्या तर काही परिस्थितीसापेक्ष होत्या.


ते शिकागोला गेले नसते, अमेरिकेत फिरले नसते, इंग्लंडमध्ये राहिले नसते तर एवढे प्रसिद्धीचे वलय त्यांना प्राप्त झाले नसते.


असामान्य भाषा प्रभुत्व, तेजस्वी व्यक्तिमत्त्व, उदंड व्यासंग या बाबी वजा केल्या तर केवळ गुरुकृपेला अर्थ प्राप्त झाला नसता.


विवेकानंदांच्या विचारांचा खरा अभ्यास त्यांच्या हयातीत पूर्णत्वाने घडला नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वलय आणि वर्तमानपत्रातील बातम्या यामुळे ते समकालीनापुढे तळपत राहिले.


मात्र त्यांची जीवनयात्रा संपल्यावर त्यांचे साहित्य अधिक प्रकाशात आले. त्यांच्या गुरुबंधूंनी व अन्य शिष्यांनी काही खंडांत त्याची बांधणी केली. सुमारे साडेचार हजार पृष्ठांत विस्तारलेले विचारधन ही कौतुकाची बाब आहे. त्यांच्या समग्र साहित्याच्या विविध भाषांतून प्रसिद्ध झालेल्या अनुवादित आवृत्ती आज सावकाशीने अभ्यासणे शक्य आहे.


विवेकानंदांच्या वाट्याला भ्रमंती फार आली. त्यामुळे त्यांना लेखनाची बैठक घालून आवर्जून आणि अहोरात्र लेखन करता आले नसावे.

पण त्यांचे शब्द कानामनाने टिपणारे व लगोलग त्याला लिखित रूप देणारे तत्पर शिष्य आणि शिष्या त्यांना भेटल्या हे भारतीयांचे भाग्य! स्वामींनी विपुल पत्रलेखन केले, ते आपल्या हस्ताक्षरात.

1893 ते 1897 या त्यांच्या तिकडच्या वास्तव्य काळात टेप किंवा व्हिडिओ रेकॉडिर्ंग उपलब्ध नसल्यामुळे स्वामीजींचे व्यक्तिमत्त्व आणि वक्तृत्व यांचे परिपूर्ण चित्रण घडू शकले नाही. पण जो अंश वाट्याला आला त्याला पूर्णत्वाचा गंध प्राप्त झाला आहे.

( क्रमश:)


- प्राचार्य शिवाजीराव भोसले

No comments:

Post a Comment