
आपल्या ठायी असणाऱ्या दिव्यत्वाचा शोध आणि बोध, इतरांच्या ठायी येणारा त्याचा प्रत्यय, सर्वधर्मांचा परस्पर संवाद, मोहापासून मुक्ती अथवा विरक्ती, जीवमात्राची शिवभावे सेवा : या तत्त्वांचा समुच्चय म्हणजे रामकृष्ण धर्म!
आदर्श व्यक्ती, समाज आणि जग यांच्या संवर्धनासाठी उपयोगी पडणारी ही आचार-विचारसूत्रे विवेकानंदांना गवसली. इतकेच नव्हे तर त्यांचे सर्व पारमाथिर्क हट्ट रामकृष्णांनी पुरविले. त्यांना देवीचे दर्शन घडविले. समाधीचे सुख मिळवून दिले. विवेकानंद गाभाऱ्यातील देवी मानत नव्हते. ती एक सजलेल्या पाषाणाची आकृती असे ते समजत. पण एकदा कौटुंबिक विवंचनांनी ग्रासलेले व अगतिकतेपोटी खिन्न आणि सुन्न झालेले विवेकानंद रामकृष्णांच्या आज्ञेने देवीला साकडे घालण्यासाठी कालीमंदिरात गेले. देवीच्या प्रत्यक्ष दर्शनाने आपले दु:ख विसरले. त्यांनी हात जोडून याचना केली ती विवंचना मुक्तीची नाही. आथिर्क मदतीची नाही. 'भक्ती, ज्ञान, विवेक आणि वैराग्य' यांची. त्यांना देवी दिसली. केवळ भासली नाही. काश्मीरच्या क्षीरभवानी मंदिरात, दक्षिणेकडे कन्याकुमारीच्या मंदिरात तिची भिन्न दर्शने घडली.
स्वामींनी पातंजल योग अभ्यासला होता. ते आसनस्थ होत. ध्यानधारणा करीत; पण समाधिसुखाचा लाभ त्यांना घडत नव्हता. रामकृष्णांच्या अखेरच्या आजारात ते जग सोडून जाण्यापूवीर्, काशीपूरच्या उद्यानात स्वामींना सुदीर्घ समाधीसुखाचा अनुभव घेता आला. परब्रह्मा हाताशी आले, अगदी कवेत आले. पण त्याच क्षणी रामकृष्ण म्हणाले : आता हे अनुभवाचे कपाट बंद करून त्याची किल्ली मी माझ्या हाती ठेवतो आहे. तुला या उदात्त आणि उत्तुंग अनुभवाच्या परीघाबाहेर राहून जीवमात्राची सेवा करावी लागेल. तुझे जगणे जगाच्या कल्याणासाठी घडावे असा माझा हट्ट आहे. श्ाी रामकृष्ण थोड्या दिवसांत गळ्यातला कॅन्सर वाढून वाढून हे जग सोडून गेले. जाता जाता म्हणाले : पूवीर् जो राम झाला, कृष्ण झाला तोच मी रामकृष्ण म्हणून वावरलो. देहत्याग घडला तरी मी तुम्हा साधकांबरोबर असेन. विवेकानंद, शारदामणी, आपले विरक्त युवाभक्त असा परिवार मागे ठेवून एका वेगळ्याच रूपात जगात नित्य नांदण्याच्या निश्चयाने रामकृष्णांनी अखेरचा श्वास सोडला.
या श्वासातून उभा राहिला तो रामकृष्ण-संघ. आज जगात अनेक राष्ट्रांत आपले काम करीत तो उभा आहे. न्यूयॉर्कपासून सिंगापूरपर्यंत, कोलकातापासून म्हैसूरपर्यंत जागोजाग त्याचे अस्तित्व जाणवते. आजन्म ब्रह्माचर्याचा अंगिकार करणारे, अनेक वर्षांच्या पूर्वतयारीनंतर दीक्षेस पात्र ठरलेले, इंग्लिश भाषेवर प्रभुत्व असणारे अनेक संन्यस्त तेथे आपणास भेटतात. पुणे, मुंबई, नागपूर, बेळगाव अशा नगरात पण त्यांचे दर्शन घडते. ज्ञानदान, समाजसेवा, मानवरूप माधवाची पूजा हेच त्यांचे कार्य! विवेकानंद नावाचा एक निदिध्यास अशा रीतीने आजही भूतलावर अखंडितपणे नांदतो आहे.
( क्रमश:)
- प्राचार्य शिवाजीराव भोसले
No comments:
Post a Comment