संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Tuesday, October 12, 2010

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती.

साधनेचा परिमळ - प्राचार्य शिवाजीराव भोसले (भाग १०)


एखाद्या नवलकथेत किंवा कल्पित कादंबरीतही ज्या प्रसंगांचा समावेश केला जाणार नाही ते रामकृष्णांच्या जीवनात घडत होते. कलकत्त्यात बुद्धिवादी लोकांचा एक गट होता. तो रामकृष्णांच्या अनुभवांची मानसशास्त्रीय मीमांसा करू पहात होता. त्याला रामकृष्णांचे भलेपण मान्य होते; पण अनुभव अमान्य होते. मृगजळाचा प्रवाह हा एक भास असतो. त्याच कोटीतली ही दर्शने होत, असे त्यांचे मत होते. रामकृष्ण आपल्या जगात रमले होते. त्यांना इतरांच्या अभिप्रायांची तमा नव्हती. त्यांच्या साधनेचा परिमळ सर्वत्र पसरू लागला. 1875 साली केशवचन्द सेन रामकृष्णांना भेटले. ते ब्राह्मा समाजी होते. मूतिर्पूजा मानत नव्हते. गुरू हे पद त्यांना अनावश्यक वाटत असे. मात्र रामकृष्णांचे निर्मळ जीवन त्यांना प्रभावित करीत असे. ते कालीच्या एका पुजाऱ्याला महत्व देतात ही गोष्ट अनेक अभ्यासकांना रूचत नसे.

विवेकानंदांना याच गोष्टीचे नवल वाटे. ते स्वत: ब्राह्मा समाजाचे सभासद झाले होते. त्यांना परमार्थाची बैठक हवी होती. बुद्धिनिष्ठ अशा ब्राह्मा समाजाकडून ती प्राप्त होईल या आशेने व ओढीने ते नियमितपणे ब्राह्मा समाजाच्या प्रार्थनासभांना जात. या सभेतील कांही व्यक्तींना रामकृष्णांचे आकर्षण वाटू लागले. कलकत्ता शहरातील अनेक मोठी माणसे रामकृष्णांच्या भेटीसाठी मुद्दाम जाऊ लागली. विवेकानंदांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य हेस्टी हेसुद्धा रामकृष्णांना भेटत.


एकदा वर्गात वर्डस्वर्थची कविता शिकवताना व भावसमाधी या स्थितीचे विवरण करताना प्राचार्य हेस्टी यांनी विद्यार्थ्यांना रामकृष्णांकडे जाऊन या व प्रत्यक्ष डोळ्यांनी पहा असे सुचविले.


प्राचार्य हेस्टी यांनी अनेक विदेशी विद्यापीठात व्याख्याने दिली होती. त्यांचे भाषाप्रभुत्व आणि विषयप्रभुत्व निविर्वाद होते. त्यांना नरेन्दनाथ दत्त हा बुद्धिमान विद्याथीर् अतिशय प्रिय होता. एकाच वाचनाने गहन ग्रंथ सहज स्मृतिगत करणारा असा विद्याथीर् मी कोठेच पाहिला नाही, असे ते म्हणत. आदर्श प्राध्यापक आदर्श विद्यार्थ्यांकडे ओढले जातात. विद्येच्या प्रेमात पडणारे अनेकदा परस्परांच्या प्रेमात पडतात. निरासक्त व निर्मळ जीवांना वाटणारे हे आकर्षण गुरुत्वाकर्षणाप्रमाणे स्वाभाविक असते.


विवेकानंदांना कोणी तरी मार्गदर्शक हवा होता. अवतीभवती विद्वान माणसे होती; पण ती ऐहिक वैभवामागे लागली होती. जीवनाचा अर्थ व परमेश्वराचे अस्तित्व अशा गोष्टींचा विचार त्यांना परवडत नव्हता.

विवेकानंदांचे आजोबा दुर्गाचरण दत्त वयाच्या पंचविसाव्या वषीर् संसारनिवृत्त झाले व घरदार सोडून रानावनात चालते झाले. त्यांचे वडील मात्र तसे व्यासंगी, रसिक; पण निरीश्वरवादी होते. माणसांना संसारातून व मुलाबाळातून उठवणारा देव ही मतिमंदांनी केलेली उठाठेव आहे असे त्यांना वाटे.


मुलाला त्यांनी शाळेत धाडले; पण अभ्यासाची सक्ती केली नाही. विचार कर. निर्भय रहा. जग पहा. जीवनाचा अनुभव घे. स्वत:चे निष्कर्ष स्वत: काढ. अनुभवाची उसनवारी करू नकोस. हे वडिलांचे सांगणे विवेकानंदांना आवडे. पालकांची प्रांजलता मुलांना बळ देते. आपला मुलगा सर्वत्र संचार करतो. थोरामोठ्यांना भेटतो. उत्तम गातो. कशाच्या आहारी जात नाही. कोणाच्या भजनी लागत नाही. या गोष्टींचा वडिलांना अभिमान वाटत असे. भावी जावई म्हणून त्याच्याकडे पाहणारे कांही धनिक पिते त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत याची त्याना कल्पना होती; पण या बाबतीत ते मुग्ध होते. नरेन्दाला लग्न नको, संसार नको हे त्यांच्या लक्षात आले होते. विरक्तीचे हे चंदन अधिक उगाळले तर काय होईल ते त्यांना कळत होते.

( क्रमश:)
- प्राचार्य शिवाजीराव भोसले

No comments:

Post a Comment