रामकृष्णांच्या जीवनात एक प्रकारचे झपाटलेपण होते. रामकृष्ण आणि विवेकानंद या दोघांच्याही जीवनात बालपणापासून एक समान ध्यास होता. त्यांना परमेश्वर हवा होता. अनेक पारमाथिर्क जीवनाच्या आरंभी भग्नमनोरथ होतात व मग भगवंताच्या भजनी लागतात. त्यांची भावभक्ती ही एक प्रकारची उपरती असते. याउलट कांही साधकांना बालपणापासून परमेश्वरप्राप्तीचा वेध लागतो. आद्य शंकराचार्य, समर्थ रामदास हे या कोटीतले होत. रामकृष्ण आणि विवेकानंद या दोघांचा स्वाभाविक ध्यास हाच होता.
विवेकानंदांनी ज्ञानार्जनात जीवनाचा कांही काळ वेचला. उत्कटतेने व एकाग्रतापूर्वक अभ्यास केला. ज्ञानविज्ञानाच्या विविध क्षेत्रात संचार केला. हे करीत असतानाच देवाचा धावा केला; पण देव दिसेना, भेटेना, कळेना ही त्यांची हळहळ होती.
रामकृष्णांनी विद्याव्यासंगाचा ध्यास घेतला नाही. मात्र देवाचा अखंड धावा केला. ते अनुभवाच्या एका उच्च पातळीवर लवकरच स्थिरावले. दक्षिणेश्वराच्या कालीचे साक्षात् दर्शन घडेपर्यंत ते तळमळले, तडफडले. पुढे कालीची त्यांना नित्य सोबत घडू लागली. इतके घडले तरी त्यांचे समाधान नव्हते. ते परमार्थसृष्टीतील कोलंबस होते. त्यांना नवनवीन अनुभवक्षेत्रांचा शोध घ्यावा असे वाटत असे.
दिवसा मंदिरात आणि रात्री स्मशानात रामकृष्णांची साधना चालत असे. रात्री अंगावरचे कपडेदेखील उपाधीवत लेखून ते टाकून, काळोखाचे वस्त्र परिधान करून दिगंबर दशेत देवाला साकडे घालीत. जगाच्या दृष्टीने हा सगळा खुळेपणा होता. निखळ, निर्मळ खुळेपणा! रामकृष्णांवर कालीची कृपा झाली व तिनेच त्यांचे पारमाथिर्क पालकत्व पत्करले. अनेकांना हा सगळाच संभ्रम वाटत होता.
रामकृष्णांची ही स्वैर साधना चालू असताना तिला शिस्त लावणारी एक करडी शिक्षिका त्यांच्या जीवनात अवतरली. तिचे नाव होते भैरवी योगिनी. ही भैरवी अधिकारी साधकाच्या शोधार्थ होती. तिची वणवण चालूच होती. गंगेच्या काठी तिला रामकृष्ण दिसले आणि तिला खूण पटली. रामकृष्णांनीही तिला ओळखले आणि लहान मुलासारखे ते तिच्या दिशेने धावले. कांही वषेर् भैरवी योगिनी रामकृष्णांचे मार्गदर्शन करीत होती. तिची मनातून खात्री होती की हा एक अवतार आहे. तंत्रमार्ग हा तसा बिकट! कांही वादग्रस्त आणि अशोभनीय क्रियाकांडांनी किचकट झालेला आणि काळवंडलेला! पण या मार्गावरून चालूनही जे तरतील आणि उरतील ते महात्मे होत. भैरवीने बंगालमधल्या प्रतिष्ठित पारमाथिर्कांच्या सभेत हे सिद्ध केले की, रामकृष्ण हा अवतार आहे. वैष्णवचरण व गौरी पंडित यांनी हाच निर्वाळा दिला. दोन वषेर् तंत्रमार्गावरचे सर्व टप्पे विचारात घेऊन भैरवीने रामकृष्णांच्या साधनेला उजाळा दिला. सुमारे सहा वर्षांची सोबत आणि संथा पुरी करून भैरवी काशीला परत निघून गेली. तिचीही कांही तऱ्हा होती. तिचे कोणाशी जमत नसे. रामकृष्ण याला अपवाद होते. 1866 साली, म्हणजे रामकृष्णांच्या तिसाव्या वषीर् तोतापुरी नावाचा एक वेदान्ती दक्षिणेश्वरी आला. तो निर्गुण ब्रह्मा मानत होता. मूतिर्पूजा करीत नव्हता. रामकृष्णांकडे पाहून तो प्रभावित झाला. त्याने रामकृष्णांना निविर्कल्प समाधी साधन समजावून दिले. यापुढे कांही वषेर् ही साधना करीत रहा असे तो म्हणाला; पण नवल असे की दोन-तीन दिवसांच्या बैठकीत रामकृष्णांनी भरारी घेतली व ते सहजसमाधी स्थितीपर्यंत पोहोचले. तोतापुरी थक्क झाला. जो सगुण उपासना मानत नव्हता, मंदिरात जात नव्हता, देवाला नमस्कार करीत नव्हता, ''अहं ब्रह्मा अस्मि'' या अवस्थेपर्यंत पोहोचला होता व ज्याने त्यासाठी चाळीस वषेर् घोर साधना केली होती त्याला रामकृष्णांची ही भरारी आश्चर्यजनक वाटली. परमार्थाचे आकाश रामकृष्णांपुढे थिटे पडले. इस्लाम हा मूतिर्वाचून उपासना करणारा ईश्वरनिष्ठांचा धर्म आहे, असे रामकृष्णांना वाटले. गोविंद राय नावाच्या एका साधकाने रामकृष्णांना नमाज पढावेत कसे हे शिकवले. रामकृष्ण सर्व हिंदू दैवतांना विसरून अल्लाचे ध्यान करू लागले. या अवस्थेत त्यांना एका दिव्य पुरुषाचे दर्शन घडले. बहुतेक ते पैगंबरसाहेब असावेत अशी कांही जाणत्यांनी ग्वाही दिली. 1874 साली येशू ख्रिस्त त्यांच्या जीवनात प्रकटले. अंतर्धान पावलेले अवतार रामकृष्णांवर प्रसन्न झाले.
- प्राचार्य शिवाजीराव भोसले
No comments:
Post a Comment