संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Tuesday, October 12, 2010

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती

मूर्तीच्या जागी सगुण हवेत - शिवाजीराव भोसले ((भाग ८)


विवेकानंदांना ग्रंथाचे वेड होते; पण जीवन हाच एक ग्रंथ आहे हे ते विसरले नव्हते. जीवनग्रंथाची पाने अनुभवाच्या अक्षरांनी भरली तरच त्याला अर्थपूर्णता येते. पढिकता किंवा पांडित्य जीवनाला शोभा आणू शकतात; पण जीवनाचे सार्थक साक्षात्काराने होते. उत्कट अनुभवाने ते घडते. हा अनुभव हा ज्याचा त्याने घ्यावयाचा असतो. ''अनुभवेवीण ज्ञान। हे अवघेचि अप्रमाण'' असा निर्वाळा साधुसंतांनी दिला आहे.

विवेकानंद हे तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते. मिल्ल या तत्त्वज्ञांचे कांही लेख वाचून व जगातील दैन्य, दु:ख पाहून त्यांचा ईश्वराच्या कर्तृत्वावरचा विश्वास डळमळला होता. त्याच्या अस्तित्वाविषयी ते साशंक झाले होते. देव नसेल तर तसा ठाम निश्चय झाला पाहिजे. तो असेल तर त्याचा साक्षात् अनुभव घेतला पाहिजे, असे त्यांचे विचारचक्र वेगाने फिरत राहिले. त्यांना केवळ वाचनात रस नव्हता. अनुभव नावाचे प्रमाण हेच काय ते विश्वसनीय असू शकते अशी त्यांची ठाम समजूत होती. ईश्वर हा अनुभवाचा विषय झाला पाहिजे. ईश्वराविषयी युक्तिवाद करणे हा त्याच्या प्रत्यक्ष प्राप्तीचा मार्ग नव्हे; पण मूळातच तो नसेल तर त्याचा अनुभव तरी कसा घेणार?


सगळेच अशुद्ध आणि अवघड झाले होते. हा विषय सोडून देता येत नव्हता. तो मनाचा हेका होता. तो उलगडून पहाणे शक्य नव्हते. हे कोडे कोणी उकलील का? हे स्वामींचे आर्त होते.


कांही समकालीन परमार्थपुरुष आपल्या ज्येष्ठत्वानिशी समाजप्रबोधन करीत होते. देवेन्दनाथ टागोर, केशवचन्द सेन असे काही प्रज्ञावंत होते. त्यांच्या प्रवचनसभा होत. उपासना मंडळे चालत; पण हे भावनिक समाधानाचे मार्ग होते. त्यात साक्षात् अनुभवाचा भाग नव्हता.


एकूण परिस्थिती जर अशी धूसर असेल व मानवी जीवनावर सतत संदेहाचे अभ्र दाटणार असेल, तर जीवनातला काळोख संपणार कसा? देव नसेल तर तो दिसणार कसा? पण जगातील प्रत्येक भाषेत देव हा शब्द आला कोठून आणि कसा?


हे सर्व आपले आपणच शोधावे लागेल. कोणी अनुभवदाता हा आपला त्राता होण्याची शक्यता दिसत नव्हती. प्रश्ान् पडत राहणे; पण ते न सुटणे म्हणजे केवळ चित्ताची काहिली होय. विवेकानंदांच्या वाट्याला ती आली होती. या काळोखात एक आशेचा किरण दिसून लागला. तो म्हणजे रामकृष्ण परमहंस! ''देव दिसू शकतो. मी तो रोज पाहतो. तुलाही हे देवदर्शन घडू शकेल. तुझे डोळे हे योग्याचे नेत्र आहेत. तू हताश होऊ नकोस. निराश होऊ नकोस. विचार सोडू नकोस. तू माझ्याकडे येत रहा. आज माझ्या डोळ्यांना जे स्पष्ट दिसते ते तुझ्या डोळ्यांना उद्या साक्षात् दिसेल. तुझे डोळे हे असामान्य अधिकारी पारमाथिर्काचे नेत्र आहेत.''


आरंभी एका समारंभप्रसंगी रामकृष्णांनी नरेन्दनाथ या विद्यार्थ्यास पाहिले. त्याच्या भावमधुर भक्तिगीतांनी ते भारावले. त्यानंतर त्यांनी त्याला दक्षिणेश्वराला येऊन जावयास सांगितले. पुढे पुढे हे भेटीचे योग वाढत गेले. पहिल्या एक-दोन भेटीत रामकृष्णांच्या स्पर्शाने कांही विलक्षण अनुभव आले. भावविवश न होता या अनुभवाचे कठोरपणे मूल्यमापन करताना विवेकानंदांना कसलीही हळहळ वाटली नाही.


विवेकानंदांना देव हवा होता. रामकृष्णांनी तो पाहिला होता. हे दर्शन तुलाही घडेल, असा आशीर्वाद त्यांनी विवेकानंदांना दिला होता. त्या प्रकारचे अनुभव विवेकानंदांना येऊ लागले होते; पण त्यांना ते निरभ्र व निविर्वाद वाटत नव्हते. शास्त्रज्ञाच्या जिज्ञासेने व साशंकतेने त्या अनुभवाकडे ते पहात होते.


पहिल्या भेटनंतर पुढची साडेपाच वर्षे गाठीभेटी, संवाद आणि वादविवाद हे सत्र चालतच राहिले. केशवचन्द सेनांनी व्यक्त केलेल्या भावनांमुळे अवघा बंगाल रामकृष्णांकडे वळला. अनेक सुविद्य, सुजाण, पारमाथिर्क रामकृष्णांच्या आश्रयाला आले.


प्रत्यक्ष अनुभवांच्या प्रकाशात साक्षात्कारमीमांसा करणारा हा अधिकारी पुरुष साक्षरतेच्या पहिल्याच पायरीवर थांबला होता. पांडित्याचा जिना त्याच्यापासून बराच दूर होता; पण अनुभवाचे आकाश त्याच्या खांद्यावर टेकले होते. तो अनुभवासाठी आसुसलेला होता. अन्य साधकांचे अनुभव पण अभ्यासत होता.


रामकृष्ण परमहंसाचे जीवन ही परमार्थाची उतारपेठ होती.


देवाच्या सख्यत्वासाठी त्यांनी बालपणापासून सर्व सुखांचा त्याग केला होता. कनक आणि कांता या दोन प्रलोभनांपासून ते आजन्म दूर राहिले. त्यांचे लग्न झाले होते. त्यांची पत्नी शारदामणी ही त्यांची साक्षात्कार सांगाती झाली होती. जगाच्या दृष्टीने सगळेच विचित्र होते. देव हवा होता तर लग्न कशाला करावयाचे? लग्न केले तर पत्नीचे सौभाग्य साधनेने कशाला सजवावयाचे? वैराग्याच्या आकाशात उपासनेच्या वावड्या उडवावयाच्या आणि बायकोला मूल टाळून चूल फुंकायला लावायची हा केवळ खुळेपणा नव्हे काय?


असे घडले होते हे खरे; पण यात कोणी कोणावर कांही लादले नव्हते. रामकृष्णांनी पत्नीचे स्वाभाविक हक्क मनाने मान्य केले होते. त्यांची तशी तयारी होती; पण शारदामणी हे रामकृष्णांच्या घरकुलातील देवीचे दुसरे रूप झाले. देहधर्मापलीकडे असणारे विशुद्ध भावनांचे देवघर हे शारदामणींचे स्थान ठरले. रामकृष्णांचे सर्व शिष्य त्यांना माताजी म्हणत.


रामकृष्णांचे मूळ नाव गदाधर चतजीर्. लहानपणापासून भावमग्न दशेत काळ कंठणारा एक मुलगा ही गावकऱ्यांच्या दृष्टीने त्यांची एक प्रतिमा! शाळेविषयी मनातून तिरस्कार. गावात असणाऱ्या मंदिरात आणि बाहेर असणाऱ्या धर्मशाळेत सततचे वास्तव्य. गंगास्नानासाठी जाणाऱ्या धर्मयात्रिकांच्या विसाव्याचे एक ठिकाण म्हणजे कामारपुकुर हे गाव. या गावातला हा एक मुलगा.


पुढे त्याला कलकत्त्याला जावे लागले. तेथे संस्कृत पाठशाळा चालविणाऱ्या त्याच्या वडिल भावाच्या हाताखाली मदतनीस म्हणून तो राहू लागला. योग असा की त्याला आणि त्याच्या भावाला राणी रासमणी नावाच्या एक सधन महिलेने बांधलेल्या कालीमंदिरात नित्य पूजाअर्चा करण्याचे काम मिळाले. तो सगळा मंदिर परिसर काली, शिव, विष्णु अशा अनेक दैवतांच्या उपासनेमुळे भावसंपन्न झाला होता. काली ही त्या परिसरातील प्रधान देवता होती. राणी रासमणी ही कोळी समाजातील होती. त्यामुळे तिच्याकडे काम करण्याची उच्चवणीर्यांची तयारी नव्हती. पौराहित्त्याअभावी मंदिरातील देव पूजाअर्चा, नैवेद्य याशिवाय गाभाऱ्यात स्थानबद्ध होणार होते. यातून सुटकेचा मार्ग काढला तो रामकृष्णांच्या भावाने. त्याने सांगितले : ''हा मंदिर परिसर एखाद्या शुचिर्भूत ब्राह्माणाला दान करा. मग हरकतीचा मुद्दा संपेल.'' हे घडले व लगोलग पोटाथीर् पुजाऱ्यांची परवड सुरू झाली. राणीने सर्वांना अंतरावर ठेवले. रामकृष्ण आणि त्यांचे बंधू या दोघांना हा मान दिला. मंदिर परिसरात त्यांच्या निवासाची सोय केली. रामकृष्णांनी अवघडलेल्या अंगाने हे काम पत्करले; पण लवकरच ते त्या कामात गढून गेले. पूजा पाठ ही एक आराधना होती. ती पोटासाठी आरंभलेली पारंपरिक कसरत नव्हती. रामकृष्णांना देव प्रत्यक्ष पहावयाचा होता, जाणावयाचा होता. ते करता यावे यासाठी ते साधनाभूमीच्या शोधार्थ होते. दिसेल त्या मंदिरात थांबत होते. पाणावलेल्या डोळ्यांनी मूतीर्कडे पहात होते. प्रसंगी तिच्याशी बोलत होते. कालीमंदिरात हे नित्याने घडू लागले, काली ही त्यांची माता झाली. तिच्याजवळ ते नानाप्रकारे हट्ट करीत. इतरांना जेथे केवळ मूतीर् दिसत होती, तेथे रामकृष्णांना सचेतन, सगुण, साक्षात् जगदंबा दिसत होती.

( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले

No comments:

Post a Comment