विवेकानंदांच्या वाट्याला आलेले आयुष्य चाळीस वर्षांपेक्षा थोडे कमीच होते. त्या जीवनाला प्राप्त झालेली परिमाणे विलक्षण होती. सामान्य माणूस एका गावी जन्माला येतो. शिक्षण, व्यवसाय, राजकारण अशा काही व्यापामुळे त्याला अनेक गावे पहावी लागतात. हे पाहणे वरवरचे असते. कोठे मुद्दाम राहणे व अवतीभवतीचा परिसर बारकाईने पाहणे घडत नाही. माणसे कोठून तरी निघतात व कोठे तरी पोहोचतात. थोडी थांबतात आणि पुन्हा त्याच मार्गाने परत फिरतात.
विवेकानंद काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरले. काही काळ हिमालयात राहिले. पदवीधर होईपर्यंत कलकत्ता हे त्यांच्या जीवनाचे केंद होते. रामकृष्ण परमहंसांचा सहवास त्यांना साडेपाच वषेर् लाभला. हा स्थैर्यकाल लवकरच संपला.
स्वामीजींना आपल्या गुरूच्या निर्वाणानंतर एक प्रकारची अस्वस्थता जाणवू लागली. त्या बरोबरच समाज आणि देश जवळून पाहण्याची इच्छा बळावली. मागे प्रपंच नव्हता. आई आणि भावंडे, आपले गुरुबंधू असे काही पाश होते; पण स्वामीजी त्यातून निग्रहपूर्वक बाहेर पडले आणि संन्याशाचे गाणे गात पुढे चालत राहिले. अयोध्या, वृंदावन, नैनिताल, ऋषिकेश, दिल्ली, मीरत, बडोदा, मुंबई, पुणे, कोल्हापूर, बंगलोर, म्हैसूर, बेळगाव, पणजी त्रिवेंदम, मदास, हैदाबाद अशा अनेक गावी आणि स्थानी त्यांचा रहिवास घडला. नंतर ते शिकागोला गेले. साडेतीन वषेर् त्यांनी विदेशात वास्तव्य केले. तिकडे व्याख्याने दिली, अभ्यासवर्ग चालविले, एक लहानसे शिष्यमंडळ उभे केले.
या त्यांच्या जीवनाला विलक्षण वेग होता. मोठी माणसे आपल्या एका आयुष्यात अनेकांचे अनेक जन्म अनुभवतात. जीवनदेवतेची नाना रूपे अभ्यासतात. ज्ञानकोशाचे खंड चाळणे, व्याकरणकारांची मते अभ्यासणे, स्वत: स्वतंत्र चिंतन करणे, लोकजीवनाशी अखंड संवाद साधणे या सगळ्या गोष्टी काही व्यक्तींना कशा साधतात ते कळत नाही.
विश्व हेचि माझे घर या वृत्तीने जगणे व त्याचवेळी आत्मलीन दशेत ध्यानधारणा करणे ही जीवनशैली असामान्य या कोटीतली आहे.
विवेकानंदांचे आगळेपण व अधिकार हा त्यांचा या जीवनशैलीत आहे.
परप्रांतात, परदेशात, परमुलुखात संचार करणे व परभाषेत लोकांशी संपर्क साधणे हे ज्यांना जमते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची परिमाणे विलक्षण असतात.
रोमा रोलाँसारख्या नोबेल पारितोषिकाच्या मानकऱ्याला रामकृष्ण-विवेकानंद ही चरित्रे लिहिण्याचा मोह पडला. विवेकानंदांच्या एकेका वाक्याने मी थरारून उठलो, कंपायमान झालो असे त्यांनी म्हटले आहे.
हे विचारात घेतल्यावर असे वाटते की, विवेकानंद हा एक अभ्यासविषय झाला पाहिजे.
विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवादिन म्हणून देशभर साजरा व्हावा अशी अपेक्षा देशाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली होती; पण स्मृतिदिन ही एक कवायत ठरण्याचा संभव असतो.
त्यांच्या जीवनात जे उत्कट आणि अनुकरणीय ते अगत्यपूर्वक अभ्यासले पाहिजे. विवेक आणि वैराग्य ही त्यांची बलस्थाने होती. अखंड आणि प्रचंड व्यासंग, निरंतर कार्यमग्नता हे त्यांचे स्थायीभाव होते. मद्य आणि मदिराक्षी यापासून ते निलेर्प राहिले. त्यांनी योगाभ्यास केला व पातंजल योग उत्तम इंग्लिशमधून इंग्रजांना समजावून दिला.
जो जो विवेकानंद अभ्यासले जातील तो तो आपले जीवन विवेकानंदमय व्हावे या आकांक्षेचे भरते येत राहील. स्वत: स्वामीजींची ही अपेक्षा किंवा तृष्णा नव्हती. ज्याने त्याने आत्मनिर्भर असावे व आत्मोन्नतीच्या मार्गाने जाऊन आत्मतृप्त व्हावे ही स्वामीजींची शिकवण होती.
जे आत्मरत, आत्मतृप्त व आत्मपर्याप्त असतील अशा व्यक्तींकडे समाजाचे नेतृत्व जावे. ज्यांना प्लेटो फिलॉसफर किंग, म्हणजे तत्त्वज्ञ राज्यकर्ता म्हणत असे अशा जाणत्या व्यक्तींची संख्या वाढणे हाच खरा उत्कर्षमार्ग आहे.
ध्यानधारण, विद्याव्यासंग, समाजसेवा ही साधनेची अंगे परस्परसंलग्न आहेत. व्यक्ती आणि समाज यातील अद्वैत हे एक दुर्लक्षित सत्य समजावून घेतले पाहिजे. आसन प्राणायम ही झाली व्यक्तिगत साधना. शिक्षण, आरोग्यसेवा, आपत्ती निवारण, शेती, पशुपालन या बाबी सामाजिक संदर्भात साकार होतात.
गुणवत्तेच्या संगोपनासाठी व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर कार्यरत राहिले पाहिजे. 'रामकृष्ण मठ' आणि 'रामकृष्ण मिशन' यांची स्थापना या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी झाली.
मठात राहून साधना करावी. वाचन, लेखन, प्रकाशन करावे. मिशन या माध्यमातून नानाविध सामाजिक प्रकल्प सिद्धीस न्यावेत. कोयना आणि किलारी भागातील भूकंपग्रस्तांचे पुनर्वसनाच्या दृष्टीने रामकृष्ण मिशनने केलेले काम म्हणजे विवेकानंदांच्या मनोरथाची पूर्तता करण्याचा एक प्रयत्न होय. देशाच्या इतिहासातील अन्य आचार्यांपेक्षा विवेकानंदांचे असे एक वेगळेपण मानावे लागते ते त्यांच्या क्रियाप्रवणतेमुळे.
( क्रमश:)
- प्राचार्य शिवाजीराव भोसले
No comments:
Post a Comment